कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे मुंबईत कोट्यवधींचा चुराडा, जगभरातले शेअर बाजार गडगडले

आयआरसीटीसी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय अर्थव्यवस्था
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

2008च्या जागतिक आर्थिक संकटानंतर पहिल्यांदाच जगभरातल्या शेअरबाजारांसाठी हा आठवडा अतिशय कठीण गेलाय.

सेंसेक्स कोसळल्याने तब्बल 5 लाख कोटींच्या गुंतवणूकदार संपत्तीचं (Investor Wealth) नुकसान झाल्याचं इकॉनॉमिक टाईम्स आणि मिंटने म्हटलंय. मुंबई शेअरबाजारात सलग 6 दिवस घसरण झालेली आहे. 

कोरोना व्हायरसचा फैलाव आता जगभरातल्या अनेक देशांमध्ये झालेला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी चीनबाहेर कोव्हिड-19 चे जास्त रुग्ण आढळलेले आहेत.

नायजेरियात पहिला रुग्ण आढळलेला आहे, तर दक्षिण कोरियात तब्बल 256 रुग्ण आहेत.

युरोपातही याची लागण झाल्याने त्याचे पडसाद गुरुवारी अमेरिकन आणि युरोपियन शेअरबाजारांवर उमटले.

परिणामी आज सकाळी ट्रेडिंग सुरू झाल्यावर आधी आशियान शेअर बाजार आणि पाठोपाठ मुंबई शेअरबाजार गडगडला.

आज ट्रेडिंगला सुरुवात झाल्यानंतर सेंसेक्स 1100 अंकांपेक्षा जास्त खाली कोसळला तर निफ्टीही 11,300च्या खाली होता.

दिवसअखेर सेंसेक्स 1448 अंक  तर निफ्टी 431 अंक कोसळून बंद झाला. 

'भविष्यातही होऊ शकतो परिणाम'

कोरोनाव्हायरसचं निदान झाल्याला आता महिने उलटलेले आहेत. पण या कोव्हिड-19चे जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असलेले आणि भविष्यात होऊ शकणारे मोठे परिणाम आता लक्षात यायला लागले आहेत.

म्हणूनच जागतिक अर्थव्यवस्था आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

शेअर बाजार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

चीनमधल्या कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मध्यंतरीच्या काळात कमी झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थांना काहीसा दिलासा मिळाला होता.

पण आता चीनबाहेरचं या कोव्हिड -19चं प्रमाण वाढतंय. दक्षिण कोरिया, इटली आणि जपानमध्ये याचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चिंता व्यक्त करण्यात येतेय.

गुरुवारी अमेरिकेत वॉल स्ट्रीटवर डाऊ जोन्स निर्देशांक 1200 अंक घसरला होता. इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात इतकी मोठी घसरण नोंदवण्यात आली.

यामुळे शुक्रवारी जपान, ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि चीनच्या शेअरबाजारांत मोठी घसरण झाली.

मास्क घातलेली तरुणी

फोटो स्रोत, EPA

शुक्रवारी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये निक्केई 225 इंडेक्स 3% घसरला होता. गेल्या आठवड्याभरात या निर्देशांकाची 9% घसरण झालेली आहे.

तर ऑस्ट्रेलियाचा मुख्य निर्देशांक ASX200 मध्येही शुक्रवारी सकाळी 3.5% पेक्षा जास्त घसरण झालेली आहे.

कोरोना व्हायरस जगभर पसरलेला आहे. विशेषतः इटलीमध्ये या कोव्हिड -19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने जागतिक गुंतवणूकदार चिंता व्यक्त करत आहेत.

तर दुसरीकडे जपाननेही आपल्या शाळा मार्च अखेरीपर्यंत बंद केल्या असून देशातली 2 डिस्ने पार्कही आता दोन आठवडे बंद राहणार आहेत. यामुळे आशिया खंडातल्या शेअरबाजारांतही चिंतेचं वातावरण आहे.

कोरोनाव्हायरसचा फैलाव आला एका 'निर्णायक' टप्प्यावर येऊन ठेपल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय.

बीबीसी

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)