अमित शाह यांचं गृह मंत्रालय: देशात ‘टुकडे टुकडे गँग’बद्दल माहिती नाही #5मोठ्याबातम्या

अमित शाह

फोटो स्रोत, PTI

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'टुकडे टुकडे गँग'विषयी कुठलीही माहिती नाही - गृह मंत्रालय

देशात 'टुकडे टुकडे गँग' सक्रिय असल्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असं उत्तर केंद्रीय गृह मंत्रालयाने माहिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिलं आहे.

देशातील अशांततेला टुकडे टुकडे गँग जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. या अनुषंगाने माजी पत्रकार आणि कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अशा गँगबाबत माहिती मागितली होती.

'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

'टुकडे टुकडे गँग' कधी आणि कशी अस्तित्वात आली? या गँगचे सदस्य कोण आहेत? या गँगवर बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली बंदी का घातली जात नाही, असे प्रश्न साकेत गोखले यांनी अर्जात विचारले होते.

26 डिसेंबर 2019 रोजी साकेत यांनी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गृह मंत्रालयाने उत्तर दिले असून अशी कोणतीही गँग अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अमित शहा यांनी जाहीर सभेत 'टुकडे टुकडे गँग' हा शब्दप्रयोग वापरला. त्यांनी या बोलण्याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. अन्यथा ते जनतेशी खोटं बोललं आणि जनतेची दिशाभूल केली म्हणून जाहीर माफी मागायला हवी, असं गोखले यांनी म्हटलं आहे.

2. भारतीय मंदीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

भारतीय मंदीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, याचा दाखला देत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने 2019 वर्षासाठीचा जागतिक विकासदर 2.9 टक्क्यांपर्यंत खाली आणला.

भारताचा विकासदर 4.8 असा पुनर्लेखित करण्यात आला. बिगरबँकीय वित्तीय क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मरगळ, यामुळे असं झाल्याचं जागतिक नाणेनिधीने म्हटलंय.

'इकॉनॉमिक टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मंदी, व्यवसाय

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आर्थिक मंदी

दावोस इथं होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनापूर्वी 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक' हा बहुचर्चित अहवाल सादर केला.

"भारतासह उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थांमधील नकारात्मक धक्के प्रतिबिंबित होतात, ज्यामुळे येत्या दोन वर्षांसाठीच्या वाढीच्या अंदाजाचे पूनर्मूल्यांकन करणं भाग पडलं. काही प्रकरणांमध्ये वाढलेला सामाजिक असंतोषही प्रतिबिंबित झाला आहे," असे नाणेनिधीने म्हटलं आहे.

3. CAA विरोधी मोर्चात मुंबईत 10,000 महिला सहभागी

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या मोर्चाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 10,000 महिला सहभागी झाल्या होत्या. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने हे वृत्त दिलं आहे.

मुंबई सिटिझन कोरम या स्वयंसेवी संघटनेने हा मोर्चा आयोजित केला होता. यावेळी खासदार सुप्रिया सुळे तसंच सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड उपस्थित होत्या. मुंबई सेंट्रल इथल्या YCMA मैदानावर हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान जोपर्यंत काँग्रेस सत्तेत आहे, तोपर्यंत राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला जाणार नाही, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं.

"भाजप हा मुस्लिमांचा सर्वांत मोठा शत्रू आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून रोखा, असा महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांचा आग्रह आहे. त्यामुळेच काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला," असं त्यांनी सांगितलं.

नांदेडमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाला मार्गदर्शन केलं.

4. आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्या होणार

सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने तीन राजधान्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. विशाखापट्टणम प्रशासकीय, कुरनूल न्यायविभागाची तर अमरावती कार्यकारी राजधानी असणार आहे. मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला.

'लाईव्ह मिंट'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, अमरावतीमधील जमिनीचे प्रश्न तसंच आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट ऑथॅरिटी अक्टमध्ये सुधारणा यावरही चर्चा झाली. जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति महिना 2,500 रुपयांऐवजी 5,000 रुपये देण्यात येणार आहेत.

5. झोमॅटोचा उबर ईट्सवर ताबा

घरपोच फूड डिलिव्हरी करणाऱ्या 'झोमॅटो' या कंपनीने 'उबर ईट्स' कंपनीवर मालकी मिळवली आहे. 35 कोटी डॉलर्सला हा सौदा झाल्याची चर्चा आहे.

उबर इट्सने यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

ऑल स्टॉक डीलमध्ये झोमॅटोने उबर टेक्नॉलॉजीच्या उबर इट्स कंपनी ताब्यात घेतली आहे. उबर इट्सचे झोमॅटोत 10 टक्के शेअर्स असतील.

2017 मध्ये उबर इट्सने भारतात सुरुवात केली. मात्र भारतात कंपनीला जम बसवता आला नाही. स्विगी आणि झोमॅटो कंपन्यांनी फूड डिलिव्हरी अॅपचं मार्केट व्यापलं आहे.

दरम्यान, झोमॅटोने उबर ईट्स विकत घेतल्याने उबर ईट्स अॅपवरून ग्राहकांना आजपासूनच ऑर्डर करता येणार नाही. त्यासाठीचे सर्व ऑर्डर, डिलेव्हरी पार्टनर आणि सहभागी रेस्टॉरंट्स झोमॅटोकडे ट्रान्सफर करत असल्याचं झोमॅटोने एका प्रसिद्धीपत्रकात सांगितलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

BBC Indian Sportswoman of the Year
फोटो कॅप्शन, BBC Indian Sportswoman of the Year

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)