चंद्रकांत पाटील : उद्धव ठाकरे सरकार पाडण्याची गरज नाही ते आपोआप पडेल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, FACEBOOK
आजचे पेपर आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. सरकार पाडण्याची गरज नाही ते आपोआप पडेल- चंद्रकांत पाटील
"राज्यामध्ये 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जवळपास एक महिन्याने सरकार स्थापन करायला गेला. त्यानंतर खातेवाटप करण्यासाठी एक महिन्याचा काळ गेला. त्यामुळे हे अनैसर्गिक सरकार पाडण्याची गरज नाही ते आपोआपच पडेल", असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
"या सरकारने फसवी कर्जमाफी केली आहे. 2001 ते 2016 पर्यंतची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी भाजप सरकारने केली होती. त्यामुळे या अनैसर्गिक सरकारने 2016 नंतरची अट लावून कोणती कर्जमाफी केली", असा प्रश्न त्यांनी विचारला. या सरकारला अजूनही एकर आणि हेक्टरची माहिती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
"या सरकारचे खातेवाटप, बंगलेवाटप, पदवाटप झाले, महामंडळ वाटप होईल. मात्र हे सरकार शेतकऱ्यांना काहीच देऊ शकत नाही", असा आरोप त्यांनी केला. ते इंदापूर कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.
2. आता देशात खासगी रेल्वे
देशात लवकरच खासगी कंपन्याकंडून चालवण्यात येणाऱ्या रेल्वे विविध मार्गांवर धावणार आहेत. त्यासाठी नियमांचा मसुदा निती आयोगाकडून करण्यात आला आहे. खासगी रेल्वेगाड्यांसाठी महत्त्वाच्या तरतुदी त्यामध्ये आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या तरतुदींनुसार खासगी रेल्वे गाड्यांना स्वतःचे कर्मचारी नेमता येतील. त्याबरोबरच या गाड्यांचा कमाल वेग ताशी 160 किमी ठेवण्याला मंजुरीही मिळाली आहे. ज्या मार्गांवर खासगी रेल्वेगाडी धावणार आहे, त्या मार्गांवर 15 मिनिटांच्या काळात भारतीय रेल्वेला आपली गाडी सोडता येणार नाही असंही त्या मसुद्यात लिहिलं आहे. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.
या प्रकल्पानुसार देशात 100 मार्गांवर 150 खासगी रेल्वेगाड्या धावणार आहेत. त्यासाठी 22 हजार 500 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
3. शांततेत आंदोलने कशी करायची ते तरुणांकडून शिका - मुंबई उच्च न्यायालय
शांततेत आंदोलन करून आपल्या आवाजाची ताकद अधिकाधिक कशी वाढवायची याचे धडे आताची तरुणाई देत आहे. इतर लोकांनी त्यांच्याकडून ते शिकायला हवं, अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या आंदोलनाची दखल घेतली आणि त्याचं कौतुक केले.

फोटो स्रोत, ANI
शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे की मनोरंजनाचे मैदान आहे याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच्या सुनावणीच्या दरम्यान न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने या आंदोलनाचे कौतुक केलं.
राज्य सरकार शिवाजी पार्कचे विश्वस्त आहे. त्यामुळे ते मैदान खेळाव्यतिरिक्त इतर कामांसाठी उपलब्ध करायचे असेल तर त्यात न्यायालयाने हस्तक्षेप का करावा, असं न्यायालयानं यावेळेस विचारले. हे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केलं आहे.
4. आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे पालकमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार याच्याकडे पुणे जिल्ह्याचं तर आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्यासह गडचिरोलीचं पालकमंत्रिपद आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दिलिप वळसे-पाटील यांच्याकडे सोलापूरचं, तर बच्चू कडू यांच्याकडे अकोल्याचं पालकमंत्रिपद असेल. जयंत पाटील सांगलीचे, सुभाष देसाई औरंगाबादचे, शंकरराव गडाख उस्मानाबादचे, अमित देशमुख लातूरचे, तर यशोमती ठाकूर अमरावतीच्या पालकमंत्री असतील. एबीपी माझाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
5. कांद्यापाठोपाठ खाद्यतेलही महागलं
केंद्र सरकारने पामतेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील सर्व खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत असल्यामुळेही दर वाढत आहेत.
भारतात खाद्य तेलाच्या एकूण मागणीपैकी 60 टक्के तेल आयात केलं जातं. त्यात निम्मं प्रमाण पाम तेलाचं असतं. पामतेल महागलं की त्याचा इतर तेलांच्या दरावही परिणाम होतो. सूर्यफुलाच्या तेलाचे दर आता 105 ते 125 रुपये प्रतिलिटर झाले आहेत तर शेंगदाण्याचे तेल 125 ते 175 प्रतिलिटर झालं आहे. महाराष्ट्र टाइ्मसने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























