जयंत पाटील: खातेवाटप जाहीर होण्याची जेवढी उत्सुकता तुम्हाला तेवढीच आम्हाला #5मोठ्या बातम्या

जयंत पाटील

फोटो स्रोत, Jayant Patil /FACEBOOK

फोटो कॅप्शन, जयंत पाटील
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. उद्धव ठाकरेंनी खातेवाटपाची यादी राज्यपालांना पाठवली आहे - जयंत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. NDTVनं ही बातमी दिलीय.

जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "संपूर्ण महाराष्ट्राला जशी मंत्रिमंडळ खातेवाटपाची प्रतीक्षा आहे, तशीच आम्हालाही आहे. अनेक पत्रकार मित्र त्याबद्दल फोन करून विचारणा करत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आज (शनिवार) सायंकाळी 7.30 वाजताच मंत्रिमंडळाची खातेवाटप यादी मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपाल महोदय यांना पाठवली आहे."

"राज्यपाल त्यावर लवकरच शिक्कामोर्तब करतील, अशी आशा आहे," असंही त्यांनी पुढे लिहिलंय.

दरम्यान, आज (रविवार) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या यादीला मंजुरी दिली आहे.

2. CAA : मोदी सरकारचं कलाकारांना निमंत्रण

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याप्रकरणी चर्चा करण्यासाठी मोदी सरकारनं बॉलिवूडच्या कलाकारांना भोजनाचं निमंत्रण दिलं आहे. हफिंग्टन पोस्टनं ही बातमी दिलीय.

मुंबईमधल्या एका हॉटेलमध्ये हे कलाकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यात चर्चा होणार आहे.

नरेंद्र मोदी आणि कलाकार

फोटो स्रोत, HYPE PR

फोटो कॅप्शन, काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी आणि बोलीवूडच्या कलाकारांची भेट झाली होती.

निमंत्रितांमध्ये करण जोहर, फरहान अख्तर, कबरी खान, रितेश सिधवानी आणि इतर कलाकारांची नावं आहेत. हे सगळे कलाकार उपस्थित राहतील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) कितीही विरोध झाला तरी केंद्र सरकार एक इंचही मागे हटणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं.

त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय की, "गृहमंत्र्यांनी एक इंचही मागे हटू नये. विरोधकच त्यांना मागे ढकलतील."

3. डिसेंबरमध्ये जोधपूरच्या दवाखान्यात 145 अर्भकांचा मृत्यू

कोटा येथील दवाखान्यात 100हून अधिक अर्भकांचा मृत्यू झाल्याची बातमी चर्चेत असताना डिसेंबर महिन्यात राजस्थानच्या जोधपूरमधील दवाखान्यात 145 अर्भकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

जोधपूरमधील उमेद हॉस्पिटल आणि MDM हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय समितीनं तयार केलेल्या अहावालानुसार 146 अर्भकांचा मृत्यू झाला आहे.

प्रातिनिधिक फोटो
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

या दोन दवाखान्यांमध्ये डिसेंबर महिन्यात एकूण 4,689 बालकांना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 3,002 अर्भक होते. त्यापैकी 146 अर्भकांचा मृत्यू झालाय.

4. बीड जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा विजय

बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या शिरसाट व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे विजयी झाले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

या निकालावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले, "आज नियतीनं पुन्हा न्याय केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत प्रस्थापित होत आहे, हा विजय निश्चितच जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळवून देणार आहे."

धनंजय मुंडे, पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

तर या अगोदर काही वेळापूर्वी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या जिल्हापरिषद निवडणुकीबाबत ट्वीट करून निकालाचं चित्र स्पष्ट असल्याचं सांगत पराभव स्वीकारला होता.

त्यांनी म्हटलं होतं, "राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेनं त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहेत."

5. मी राजीनामा द्यायचं ठरवलंय - काँग्रेस आमदार

जालन्याचे काँग्रेस आमदार कैलाश गोरंट्याल यांनी राजीनामा द्यायचं ठरवलं आहे. ANI या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे.

"मी आतापर्यंत तीनदा आमदार म्हणून निवडून आलो आहे आणि लोकांची सेवा करत आहे. असं असतानाही मला मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे मी आणि माझ्या समर्थकांनी राजीनामा द्यायचं ठरवलं आहे," असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.

ट्वीट

फोटो स्रोत, TWITTER

"पक्षाच्या पडत्या काळात मी काँग्रेससोबत राहिलो. संकटाच्या काळात मातब्बर नेते दुसऱ्या पक्षात गेले. तेव्हाही मी जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवली. राज्यमंत्री अर्जुन खोतकरांचा विक्रमी मतांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा विधासभेवर निवडून आलो. मात्र तरीही पक्षाने माझा विचार केला नाही, " असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)