इरफान पठाण निवृत्त, हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त; जलाज सक्सेनाचा नंबर लागणार का?

जलाज सक्सेना, हार्दिक पंड्या, इरफान पठाण

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, जलाज सक्सेनाला संधी मिळणार?
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

जलाज सक्सेना हे नाव तुम्ही ऐकलंय का? भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमधलं भारीभक्कम नाव. जलाज एक तप म्हणजे बारा वर्षांहून अधिक वर्ष खेळतोय. अनेक वर्षं मध्य प्रदेशकडून खेळल्यानंतर आता तो केरळ संघाकडून खेळू लागला आहे.

जलाजचे काही रेकॉर्ड्स आवर्जून नोंद घेण्यासारखे आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ६००० रन्स आणि ३०० विकेट्स अशी कामगिरी करणारा जलाज १९वा भारतीय खेळाडू ठरला.

आधीच्या १८पैकी सगळे भारतासाठी खेळले परंतु जलाजच्या नशिबी टीम इंडियाची कॅप नाही. एका मॅचमध्ये शतक आणि ८ विकेट्स हा दुर्मीळ विक्रम जलाजने दोनदा केला आहे. मुळातच अशा रेकॉर्ड्ससाठी वर्षानुवर्षं सातत्यानं चांगलं खेळावं लागतं. जलाजने बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध केलं आहे.

जलाज सक्सेना, हार्दिक पंड्या, इरफान पठाण

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, जलाज सक्सेना शतक झळकावल्यानंतर

जलाज पाट्या टाकल्यासारखा खेळत नाहीये, प्रत्येक सीझनमध्ये खोऱ्याने रन्स करतोय, बक्कळ विकेट्स मिळवतोय. रणजी करंडक, विजय हजारे करंडक, दुलीप ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टीट्वेन्टी स्पर्धा अशा देशात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत रन्सचे आणि विकेट्सचे अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत.

जलाज ऑलराऊंडर आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करतो. स्पिन बॉलिंग टाकतो, ऑलराऊंडरच्या व्याख्येनुसार बॅट्समन असा असावा की जो बॉलिंग करू शकतो किंवा बॉलर असा असावा की जो बॅटिंगही करू शकतो. दिग्गज ऑलराऊंडर त्यांच्या संघात प्युअर बॅट्समन किंवा प्युअर बॉलर म्हणून खेळू शकतात. जॅक कॅलिस, फ्लिनटॉफ, बेन स्टोक्स, लान्स क्लुसनर ही याची उदाहरणं.

जलाज सक्सेना, हार्दिक पंड्या, इरफान पठाण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इरफान पठाणने शनिवारी निवृत्ती जाहीर केली.

कपिल देव हे भारताचे सर्वोत्तम ऑलराऊंडर. त्यांच्यानंतर भारतीय संघाचा ऑलराऊंडरचा शोध सुरूच आहे. मनोज प्रभाकर, इरफान पठाण यांचं नाव घेतलं जातं. पण विविध प्रयोगांमुळे दोघांचीही कारकीर्द भरकटली. स्टुअर्ट बिन्नीला खेळवण्याचा प्रयोग फसला.

जलाज सक्सेना, हार्दिक पंड्या, इरफान पठाण

फोटो स्रोत, BCCI

फोटो कॅप्शन, जलाज सक्सेनाला बीसीसीआयने सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून गौरवलं आहे.

दरवर्षी बीसीसीआयतर्फे पुरस्कार दिले जातात. जलाजला तीनवेळा फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या ऑलराऊंड प्रदर्शनाकरता लाला अमरनाथ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. बीसीसीआय पुरस्कार देतं, पण निवड समितीला तो टीम इंडिया मटेरिअल वाटत नाही. जलाज भारतीय संघाकडून न खेळण्याची कारणं स्पष्ट दिसतात. टीम इंडियासाठी बॅटिंग हा बालेकिल्ला होता, आहे. त्यामुळे बॅट्समन ऑलराऊंडर अशी आवश्यकता फारशी नव्हती.

फास्ट बॉलर्सना त्यांच्या दोन स्पेल्सदरम्यान चांगल्या लाईन अॅंड लेंथवर बॉलिंग करू शकेल, विकेट काढू शकेल असा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर हवा होता. फास्ट बॉलर्सना इंज्युरीची शक्यता जास्त असते. त्यांचा रनअप बघता बरीच ऊर्जा खर्च होते. त्यामुळे तशा ऑलराऊंडरची गरज होती. कुंबळे-हरभजन आणि नंतर अश्विन-जडेजा यांनी टेस्टमध्ये दबदबा राखला. वनडेत युझवेंद्र, कुलदीप, अक्षर पटेल, अमित मिश्रा, जयंत यादव, राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर असे स्पिनर्स टीम इंडियाला मिळत गेले. या कोणाकडून रन्सची फार अपेक्षा नसते. त्यामुळे जलाजचा त्या जागेसाठी विचार झाला नाही.

जलाज सक्सेना, हार्दिक पंड्या, इरफान पठाण

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, जलाज सक्सेनाला 2015मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने संघात समाविष्ट केलं.

जलाज फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये इमाने इतबारे खेळत असताना टीम इंडियाची बॉलिंग आघाडी बळकट झाली. इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह हे पंचक दिवसेंदिवस भेदक होत चाललंय. त्यामुळे त्यांच्यातच स्पर्धा प्रचंड आहे. त्यामुळे बॉलिंग ऑलराऊंडर जागेची गरज कमी होत चालली आहे. जलाज भारतीय अ संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स अशा संघाकडून तो खेळला आहे. परंतु फारशी संधीच मिळाली नाही.

जलाज खेळत असतानाच हार्दिक पंड्या क्रिकेट पटलावर अवतरला. बडोद्यासाठी खेळणारा हार्दिक सुरुवातीला स्पिनरच होता, पण कोचच्या आग्रहाखातर तो फास्ट बॉलिंग करू लागला. दे दणादण स्टाईल बॅटिंग, उपयुक्त फास्ट बॉलिंग, अफलातून फिल्डिंग यामुळे हार्दिक आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग झाला.

जलाज सक्सेना, हार्दिक पंड्या, इरफान पठाण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हार्दिक पंड्या

बडोदा आणि मुंबई इंडियन्ससाठीच्या कामगिरीची दखल घेऊन निवडसमितीने त्याची टीम इंडियासाठी निवड केली. आपल्या स्किलसेटचा वापर करत त्याने टीम इंडियाला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

मात्र खेळापेक्षा हार्दिकच्या पॉप स्टाईल राहणीमानाची चर्चा असते. तो जन्माने भारतीय, मनाने कॅरेबियन आहे असं त्याचे सहकारी म्हणतात.

गेल्या वर्षी कॉफी विथ करण कार्यक्रमात आक्षेपार्ह बोलण्यामुळे त्याच्यावर बंदीची कारवाई झाली होती. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिकने सर्बियन गर्लफ्रेंडशी एन्गेज होत असल्याचा व्हीडिओ शेअर केला. दोन दिवस या जोडीची सगळीकडे चर्चा रंगली होती.

जलाज सक्सेना, हार्दिक पंड्या, इरफान पठाण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हार्दिक पंड्या

हार्दिकने त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत स्वत:साठी टीम इंडियात स्थान निर्माण केलं. आजच्या घडीला हार्दिकच्या नावावर ११ टेस्ट, ४५ वनडे आणि ३८ ट्वेन्टी-२० मॅचेस आहेत. हार्दिक दुखापतग्रस्त झाल्यावर विजय शंकरला घेण्यात आलं. फास्ट बॉलिंग, चांगली बॅटिंग आणि व्यवस्थित फिल्डिंग असा विजयचा सीव्ही होता, पण विजय अपेक्षित प्रभाव पाडू शकला नाही. मोठे प्लेयर्स मॅचविनर असतात असं म्हटलं जातं. जलाज खेळत असताना मध्य प्रदेशने कोणत्याही स्पर्धेचं जेतेपद पटकावलं नाही. अर्थात क्रिकेट हा टीम आहे, फक्त जलाज चांगला खेळून उपयोग नाही. हार्दिकने स्वबळावर भारतीय संघाला, मुंबई इंडियन्सला जिंकून दिलं आहे.

2015-16 वर्षापासून रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत जलाज अव्वल स्थानी आहे.

जलाजने काही दिवसांपूर्वी ट्वीटर हँडलवर एका आकडेवारीचा उल्लेख केला. क्रिकइन्फो या क्रिकेटसंदर्भातील वेबसाईटने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत म्हणजे 2014 ते 2019 या कालावधीत जागतिक स्तरावर 3000 पेक्षा रन्स, दीडशेपेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या मोजक्या ऑलराऊंडर्समध्ये जलाजचं नाव तिसऱ्या स्थानी आहे.

इंग्लंडचा मोईन अली पहिल्या, जीतन पटेल दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे बेन स्टोक्सचं नाव जलाजच्या नंतर आहे.

हार्दिक दुखापतीतून बरा होऊन टीम इंडियात परतेल, दुसरीकडे कधीतरी टीम इंडियाची दारं उघडतील या आशेवर जलाज सक्सेना खेळतोच आहे. काही वेळेला स्वत:ला सिद्ध करणं पुरेसं नसतं, तुमची आकडेवारी बोलकी असूनही संधी दूर राहते.

३३व्या वर्षी जलाजच्या नावावर ११८ मॅचेस, ६२२४ रन्स, ३७चं अॅव्हरेज, १४ शतकं, ३२५ विकेट्स एवढी पुंजी आहे. निवडसमितीच्या 'स्कीम ऑफ थिंग्स'मध्ये येऊ असा विश्वास जलाजला आजही वाटतो. काही महिन्यांपूर्वी १५ वर्षं डोमेस्टिक क्रिकेट खेळलेल्या शाहबाझ नदीमने भारतासाठी पदार्पण केलं, तशी संधी जलाजला मिळणार का?

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)