उद्धव ठाकरे यांचं सरकार 50 दिवसही चालणार नाही: रामदास आठवले #5मोठ्याबातम्या

रामदास आठवले

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया...

1) महाविकास आघाडी सरकार 50 दिवसही चालणार नाही - रामदास आठवले

महाविकास आघाडीचे सरकार 50 वर्षे चालेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असले, तरी हे सरकार 50 दिवसही चालणार नाही, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यवतमाळमध्ये म्हणाले. झी चोवीस तासनं ही बातमी दिलीय.

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन व्हावे, अशी इच्छाही आठवलेंनी व्यक्त केलीय.

सावरकरप्रेमी शिवसेनेचा पाठिंबा काँग्रेसने काढावा आणि शिवसेनेने सावरकरविरोधी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालवू नये असं आवाहन देखील आठवलेंनी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात गेले असताना, तिथं म्हणाले होते की, हे सरकार पाच वर्षेच काय, पुढची 25 वर्षे टिकेल.

2) आम्ही हिंदुत्ववादी, धर्मांतर केलं नाहीये - उद्धव ठाकरे

आम्ही आजही हिंदुत्ववादीच आहोत, धर्मांतर केलेलं नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये घेण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्या ते बोलत होते.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter/@OfficeofUT

हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावरणारी जी मंडळी आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

"मी मुख्यमंत्री नाही तर आज कुटुंबप्रमुख म्हणून भेटायला आलो आहे. जे शिवधनुष्य हाती घेतलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या साथीने पेललं आहे. आव्हान मोठं आहे, मात्र छोटी आव्हानं आपण स्वीकारत नसतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

3) PMC बँक घोटाळा - ईडीकडून पहिलं आरोपपत्र दाखल

पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या पीएमएलए कोर्टात ईडीनं सात हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. मुख्य आरोपी आमि HDIL ग्रुपचे प्रमुख राकेश आणि सारंग वाधवान या पिता-पुत्रांविरोधात प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली आरोप लावण्यात आलेत. इकोनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिली.

पीएमसी बँक

फोटो स्रोत, Getty Images

पीएमसी बँकेतला घोटाळा समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वाधवान पिता-पुत्रांना अटक केली होती.

ईडीनं घोटाळ्याची चौकशी सुरू केल्यानंतर पीएमसी बँकेत 6 हजार 700 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं. यात खातेदारांची जवळपास 73 टक्के रक्कम बुडाल्याचे उघड झाल्यानंतर आरबीआयनं पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आणि प्रशासकाची नेमणूक केली.

4) अयोध्येत चार महिन्यात गगनचुंबी राम मंदिर उभारणार: अमित शाह

अयोध्येत येत्या चार महिन्यात गगनचुंबी राम मंदिर उभारणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी रांचीतल्या जाहीर सभेत सांगितलं. लोकमतनं ही बातमी दिलीय.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह यांनी पाकुर आणि गोड्डा या दोन जिल्ह्यात सभा घेतल्या. त्यावेळी सभांमधून त्यांनी अयोध्या निकालावर भाष्य केलं.

अमित शाह

फोटो स्रोत, Twitter/@AmitShah

दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं, राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक घरातून एक एक वीट गोळा करणार आहोत. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

"राम मंदिर काही केवळ मंदिर नसेल, तर राष्ट्रीय मंदिर असेल, जे भगवान रामाच्या जन्मस्थळी उभारलं जाईल. हे मंदिर रामाचा आत्मा असेल. हे मंदिर जगात भारताच्या लोकशाही आणि न्यायव्यवस्थेच्या कणखरपणाचा संदेश देईल," असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

5) CAB च्या अंमलबजावणीस नकार म्हणजे संघराज्य पद्धतीला आव्हान - राजनाथ सिंह

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची अंमलबाजवणी करण्यास राज्यांनी विरोध करणं म्हणजे भारताच्या संघराज्य पद्धतीला आव्हान देण्यासारखं आहे, असं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं. झारखंडमध्ये प्रचारादरम्यान टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

राजनाथ सिंह

फोटो स्रोत, Twitter/@rajnathsingh

"कायद्याची अंमलबजावणी करण्याशिवाय कुठल्याही राज्याला पर्याय नाहीय. त्यासाठी ठरवून दिलेले नियम पाळावेच लागतील. सर्व राज्यांनी देशाच्या संघराज्य पद्धतीचा आदर केला पाहिजे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनं तयार झालेल्या कायद्याबाबत कुठलंही राज्य आपला स्वत:चा वेगळा अजेंडा राबवू शकत नाही," असंही राजनाथ सिंह म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या अंमलबजावणीस नकार दिलाय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)