'अमित शाह यांनी नरेंद्र मोदींपेक्षा वेगळी प्रतिमा निर्माण केलीय' -दृष्टिकोन

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
- Author, प्रदीप सिंह
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
आज सगळीकडे अमित शाह चर्चेत असले, तरी त्यांनी वाईट काळही पाहिला आहे. तसंच काँग्रेस सरकारच्या काळात त्यांच्यावर गुजरातमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती. पण, आता ते या आरोपांपासून मुक्त झाले आहेत.
काँग्रेस सरकारच्या काळात भाजपामध्ये अमित शाह यांच्यापासून दूर राहायंच आहे अशा व्यक्तींची कमतरता नव्हती.
संसदीय बोर्डाच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्याकडे पाहत विचारलं होतं, "आपण कधीपर्यंत अमित शाह यांना पाठीशी घालणार आहोत?"
या बैठकीत उपस्थित नरेंद्र मोदींनी म्हटलं, "असं तुम्ही काय म्हणत आहात? पक्षासाठी अमित शाहांनी दिलेलं योगदान आपण कसं विसरु शकतो?"
अरुण जेटलीकडे पाहत त्यांनी म्हटलं, "अरुणजी तुम्ही तुरुंगात जा आणि अमित शाह यांची भेट घ्या. पक्ष बरोबर आहे, हे त्यांना कळायला हवं."
यानंतर त्या बैठकीत या मुद्द्यावर कुणीच काही बोललं नाही.
अरुण जेटलींनी तुरुंगात जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अमित शाह यांच्यावर गुजरातमध्ये जाण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर ते दिल्लीत आले.
दिल्लीत अमित शाह जास्त लोकांना ओळखत नव्हते. राजकारणाशिवाय दुसरी कोणती गोष्ट त्यांना पसंत नाही. त्यावेळी कमीतकमी 2 जण अमित शाह यांच्यासोबत दिवसभर राहतील, अशी व्यवस्था अरुण जेटलींनी केली होती.
दिल्लीतील सुरुवातीचे दिवस
शाह जितके दिवस दिल्लीत राहिले, तितके दिवस त्यांचं दुपारचं जेवण अरुण जेटली यांच्यासोबत व्हायचं. त्यावेळी राजनाथ यांच्याजागी नितीन गडकरी पक्षाचे अध्यक्ष झाले होते. अमित शाह त्यांना भेटायला जात तेव्हा 2 ते 3 तास वाट पाहावी लागायची.
पण, अमित शाह यांनी कधी कुणाकडे तक्रार केली नाही. दिल्लीत राहत असतानाही ते दिल्लीतल्या राजकीय प्रवाहापासून दूर होते.

फोटो स्रोत, Getty Images
2013च्या सुरुवातीला पुन्हा एकदा राजनाथ सिंग यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. मोदींच्या सांगण्यानुसार राजनाथ सिंग यांनी अमित शाह यांना पक्षाचे महामंत्री म्हणून नियुक्त केलं.
त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा त्यांना उत्तर प्रदेशविषयी काय माहिती आहे, असे प्रश्न उपस्थित झाले. पण, असं असलं तरी पहिल्याच बैठकीत उत्तर प्रदेशच्या भाजप नेत्यांना कळालं की अमित शाह काय चीज आहे ते.
उत्तर प्रदेशातील यश
बैठकीच्या सुरुवातीला कोणकोणती लोकसभेची जागा जिंकता येऊ शकते, याविषयी सदस्यांनी चर्चा करायला सुरुवात केली.
यावेळी अमित शाह म्हणाले, "तुम्हा लोकांनी कोणतीही जागा जिंकून आणण्याची आवश्यकता नाही. हे सांगा की, तुमच्यापैकी कोण किती बूथ जिंकून देऊ शकतो. मला बूथ जिंकणारे हवेत, जागा जिंकून देणारे नाही."
त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालानं अमित शाह यांना राष्ट्रीय राजकारणात स्थानापन्न केलं. या यशामुळे पक्षाध्यक्षपद मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला.

फोटो स्रोत, Getty Images
भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी पक्षाची संपूर्ण कार्यपद्धती बदलली. पदाधिकाऱ्यांपेक्षा बूथ कार्यकर्त्यांचं पक्षातील महत्त्व वाढीस लागलं.
राज्याचे प्रभारी राज्यमंत्री कधीतरीच राज्याच्या राजधानीपर्यंत जात असत. त्याच वेळेस हे दृश्य पाहायला मिळालं की, पक्षाचे अध्यक्ष सामान्य कार्यकर्त्याला भेटायला लागेल, इतकंच नाही तर त्यांच्या घरी जाऊन जेवण करायला लागले.
हैदराबाद दौऱ्याहून परतल्यानंतर राष्ट्रीय महामंत्री राम माधव यांनी तक्रार केली की, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षानं बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यापर्यंत जाणं योग्य आहे का?
"राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊ शकत नाही, असं पक्षाच्या घटनेत लिहिलं आहे का," असं उत्तर अमित शाह यांनी दिलं.
राजकीय विद्वानांना शह
अमित शाह ज्या राज्यातल्या बैठकीला उपस्थिती लावतात, तिथल्या नेत्यांना अक्षरश: घाम फुटतो. याचं कारण त्यांना आधीच प्रत्येक मतदारसंघ, तिथले कार्यकर्ते आणि मुद्द्यांची कल्पना असते.
यासाठी त्यांना लॅपटॉप अथवा नोटबूक बघावी लागत नाही. निवडणुकीदरम्यान त्यांनी पक्षाच्या तंत्राशिवाय स्वत:चं एक तंत्र विकसित केलं. यामध्ये बूथवरील कार्यकर्ता ते कॉल सेंटर या सगळ्यांचा समावेश असतो.
या कामासाठी निवड करताना दोन गोष्टी लक्षात घेतल्या जातात. एक म्हणजे अधिकाधिक तरुणांना जोडता यावं आणि दुसरं म्हणजे सगळे जण विचारांशी एकनिष्ठ असले पाहिजेत.

फोटो स्रोत, Getty Images
2019च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानं युती केली, तेव्हा राज्यातून भाजप हद्दपार होईल, असंच सगळ्यांना वाटलं होतं.
या युतीला कोणत्याही स्थितीत तोडावं, असं माणनारा एक वर्ग पक्षात होता.
तर अमित शाह यांचं म्हणणं होतं, "ही लढाई आणि ती जिंकण्यासाठीचे प्रयत्न जोमानं करायला हवेत. यामुळे जास्त तोटा होणार नाही. जागेविषयी विचार करणं सोडून द्या, 50 टक्के मतं मिळवण्याचं ध्येय समोर ठेवावं."
त्यांनी सगळ्या राजकीय तज्ज्ञांना खोटं ठरवलं. लोकसभा निवडणुकीतील यशानं त्यांना गृह मंत्रालयात स्थान मिळवून दिलं.
सामान्यपणे गृहमंत्रिपद हे सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असतं. राजनाथ सिंग यांना या पदावरुन हटवण्यात येईल का, असा प्रश्न होता. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ठरवलं की, याची काही गरज नाही.
राजकीय उत्तराधिकारी
5 ऑगस्टला राज्यसभेत जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा रद्द करणारं आणि केंद्रशासित प्रदेश बनवण्याचं विधेयक संमत झालं, तेव्हा पंतप्रधानांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याविषयी अप्रत्यक्षरित्या सांगितलं.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच हे विधेयक आणण्याची तयारी सुरु होती. या विधेयकाच्या मसुद्यावरून पीडीपीसोबतची युती कधी आणि कशी तोडायची, याची योजना अरुण जेटली, अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी तयार केली होती.
अरुण जेटली यांनी तीनदा तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांना बोलावलं आणि विधेयकाचा मसूदा समजावून सांगितला. तसंच त्यांना काय बोलायचं आहे, तेसुद्धा सांगितलं. पण, यादरम्यान पुलवामा हल्ला झाला आणि सरकारनं बालाकोट हवाई हल्ल्याचा निर्णय घेतला. यासाठी हे विधेयक टाळण्यात आलं.
पंतप्रधानांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जबाबदारी अमित शाह यांना सोपवली आणि स्वत: पडद्यामागे गेले.

फोटो स्रोत, Getty Images
नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात आलं आणि पारित झालं, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आले नाही. अमित शाह हेच संसदेत पक्षाचे नेते म्हणून भूमिका मांडत होते.
या दोन्ही वेळी अमित शाह यांनी पक्ष आणि देशाला आपल्या कौशल्यामुळे चकित केलं. संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांच्या कामगिरीची देशाला पहिल्यांदा ओळख झाली.
मोदी आणि शाह यांच्या संबंधांना समजणं अवघड काम आहे. अमित शाह हे नरेंद्र मोदींचे ऑल्टर इगो आहेत, असं एका अर्थानं म्हणता येईल.
नरेंद्र मोदींचा अमित शाह यांच्यावर प्रचंड विश्वास आहे, तर मोदींना काय हवंय, हे अमित शाह यांना चांगलंच समजतं. राजकारणात अशी जोडी मिळणं दुर्लभ असतं.
गेल्या 6 महिन्यांत अमित शाह ज्यापद्धतीनं राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहेत, ते बघितल्यास हे म्हणणं चुकीचं नाही ठरणार की, नरेंद्र मोदींच्या प्रतिमेहून वेगळी त्यांनी स्वत:ची अशी वेगळी छाप उमटवली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























