धुळे: ऊसतोड मजुरांची गाडी बोरी नदीत कोसळली, 7 ठार

धुळे, अपघात

फोटो स्रोत, Anil Borade

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

धुळे जिल्ह्यातील विंचूर इथल्या नदीत गाडी कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी-शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली.

मध्य प्रदेशच्या सेंधवा इथून मजुरांची एक गाडी ऊसतोडीसाठी उस्मानाबादला येत होते. तेव्हा धुळे जिल्ह्यातल्या शिरूर गावाजवळील विंचूर फाट्यावर ही गाडी पोहोचली आणि तितक्यात बोरी नदीच्या पुलावर वाहनचालकाचं गाडीवरचं नियंत्रण गेल्याने हा अपघात झाला.

पुलावरून खाली कोसळल्यानं गाडी चक्काचूर झाली आणि त्यातील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 1 पुरुष, 1 महिला आणि 5 बालकांचा समावेश आहे.

गाडीला अपघात

फोटो स्रोत, Anil Borade

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मध्यप्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील धवल्यागिर गावातील 24 मजूर आपल्या मुलांसह M.H. 25 P 3770 क्रमांकाच्या गाडीमध्ये उस्मानाबादला ऊसतोडीसाठी चालले होते.  धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपुढील विंचूर शिवारातील बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी नदीपात्रात पडली आणि त्यात 7 जणांचा मृत्यू झाला."

गाडी

फोटो स्रोत, Anil Borade

हा अपघात मध्यरात्री झाल्यानं रात्री उशिरापर्यंत बचत बचावकार्य सुरू होतं. किरकोळ आणि गंभीर जखमींना तात्काळ धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारारसाठी दाखल करण्यात आलं आहे.

'...डॉक्टरांनासुद्धा रडायला आलं'

अपघात झाला तेव्हा मदतीसाठी फोन वाजला तो सचिन थोरात यांचा. 108 क्रमांकाच्या सरकारी रुग्णवाहिकेचे चालक असलेले थोरात सांगतात, "शिरूर चौफुलीच्यापुढे अपघात झाल्याचा आम्हाला 108ला कॉल आला. अवघ्या 15 मिनिटांत आम्ही तिथं पोहोचलो. घटनास्थळी पोहोचून परिस्थिती बघितली. पिकअप गाडी पुलाच्या खाली पडली होती. गाडीत लहान मुलं, महिला होत्या, पुरुष होते. यापैकी 20 ते 25 लोकांना आम्ही मेडिकल कॉलेजला हलवलं, तर 7 जण दगावले."

"परिस्थिती इतकी गंभीर होती की अक्षरश: पाण्यातून लहानलहान मुलांना पुलावर आणायचा प्रयत्न केला. तिथं मदतीला कुणीच नव्हतं. लहान मुलांचे हाल बघून डॉक्टरांनासुद्धा रडायला आलं, इतकी गंभीर परिस्थिती होती."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)