उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पायी वारी करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याला शपथविधीचं निमंत्रण #पाचमोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

प्रमुख वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी पायी वारी करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याला शपथविधीचं निमंत्रण

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून अनवाणी चालत विठुरायाला साकडं घालणाऱ्या शेतकरी दाम्पत्याला शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचं विशेष निमंत्रण मिळालं आहे.

ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील बनाळी येथील शेतकरी संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रुपाली यांनी शिवसेनेचा आणि तेही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बनाळीपासून पंढरपूरपर्यंत अनवाणी चालत येऊन देवाला नवस केला होता.

तीन दिवसांचा वेळ त्यांना यासाठी लागला होता. पंढरपुरात येऊन त्यांनी विठ्ठलास साकडे घालून चंद्रभागेचा कलश आणि तुळशी उद्धव ठाकरे यांच्या अवकाळी नुकसान पाहणी दौऱ्याच्यावेळी त्यांना दिले होते.

बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर आता उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून सावंत दाम्पत्याला यासाठी निमंत्रण आलं आहे. आज सकाळीच सावंत पुन्हा पंढरपूरला येऊन विठूरायाच्या चरणावर नतमस्तक झाले. आपण घातलेल साकड देवाने पूर्ण केले. आता शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचे बळ शिवसेना मुख्यमंत्र्यांना मिळू दे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

2. साध्वी प्रज्ञा पुन्हा वादात, गोडसेला लोकसभेत म्हणाल्या 'देशभक्त'

बुधवारी लोकसभेमध्ये एसपीजी संशोधन विधेयकावर चर्चा करताना महात्मा गांधी यांचे खूनी नथुराम गोडसे यांना 'देशभक्त' नावाने संबोधलं. याला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. ही बातमी न्यूज18 लोकमतने दिली आहे.

साध्वी प्रज्ञा

फोटो स्रोत, ANI

सदनामध्ये जेव्हा डीएमके सदस्य ए. राजा यांनी चर्चा करताना गोडसेचं उदाहरण दिलं. तेव्हा प्रज्ञासिंग आपल्या जागेवर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की, 'देशभक्तांची उदाहरणं देऊ नका'. त्यानंतर या दरम्यान संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रज्ञासिंग यांनी खाली बसण्यासाठी इशारा केला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कॉंग्रेस सदस्यांना शांत बसण्याचे आवाहन केले.

3. इस्रोच्या कार्टोसॅट-3चं यशस्वी प्रक्षेपण

इस्रोने इतिहास रचला असून 1625 किलो वजनाच्या 'कार्टोसॅट-3' उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. पीएसएलव्ही सी 47 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने 'कार्टोसॅट-3' उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

उपग्रह

फोटो स्रोत, ISRO

'कार्टोसॅट-3' उपग्रहासह अमेरिकेतील 13 व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आलं. पृथ्वीची छायाचित्रं काढण्यासाठी, तसंच नकाश निर्मितीसाठी 'कार्टोसॅट-3' उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.

4. दीव दमण आणि दादरा नगर हवेली होणार आता एकच केंद्रशासित प्रदेश

दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली मिळून आता एकच केंद्रशासित प्रदेश करण्याचं विधेयक लोकसभेत मांडलं गेलं आहे. दोन्ही सदनांची मंजूरी मिळल्यानंतर तयार होणाऱ्या केंद्रशासित प्रदेशाचं नाव दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीव असेल. ही बातमी नवभारत टाईम्सने दिली आहे.

दोन्ही केंद्रशासित प्रदेशांचं विलिनीकरण झाल्यानंतर देशातल्या केंद्रशासित प्रदेशांची संख्या 8 होईल.

दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली या दोन्ही भागात फक्त 8 किलोमीटरचं अंतर आहे.

सरकारचं म्हणणं आहे की यामुळे साधनसंपत्तीची बचत होईल.

दरम्यान, माजी पंतप्रधानांचे कुटुंबीय जर त्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहात नसतील तर त्यांना SPG कमांडोचं संरक्षण पुरवण्यात येणार नाही अशी दुरुस्ती सुचवणारं स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (सुधारित) विधेयकही लोकसभेत मांडण्यात आलं. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

तसंच, जे कुटुंबीय त्यांच्यासोबत राहातात त्यांनीही पाच वर्षच सुरक्षा मिळेल.

5. शिवाजी पार्कात ही प्रथा नको : मुंबई हायकोर्ट

''उद्याच्या शपथविधी सोहळ्याविषयी आम्ही काही बोलणार नाही. मात्र, शिवाजी पार्कवरील सार्वजनिक मैदानावर अशाप्रकारचे कार्यक्रम करण्याची प्रथा पाडू नये. अन्यथा शिवाजी पार्कमध्ये असे कार्यक्रम करण्याची परवानगी मागण्यासाठी अनेक जण सरसावतील'', अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने बुधवारी सरकारी प्रशासन व मुंबई महापालिकेला कानपिचक्या दिल्या. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव, महापरिनिर्वाणदिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन अशा विविध कार्यक्रमांसाठीही शिवाजी पार्कची आवश्यकता भासत असल्याने राज्य सरकारने यासंदर्भात धोरण ठरवले. त्यानुसार, शिवाजी पार्कच्या वापरासाठी वर्षभरातील 45 दिवस हे विविध कार्यक्रमांसाठी निश्चित करण्यात आले आहेत.

त्यापैकी सहा दिवस हे प्रसंगानुरूप सरकारकडून निश्चित करण्यात येईल, अशा कार्यक्रमांसाठी राखीव आहेत. त्याअंतर्गत गुरुवारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमाला मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)