महाराष्ट्र सत्तास्थापना: काँग्रेस, NCP, शिवसेना यांची एकवाक्यता - 'लवकरात लवकर सरकार स्थापनेचा प्रयत्न'

शरद पवार, सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट हटावी आणि लवकरात लवकर सत्तास्थापना व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दिल्लीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकांनंतर सांगितलं.

आज महाराष्ट्राच्या दृष्टीने दिल्लीत राजकीय हालचालींना जरा वेग आला. आधी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन राज्यातील "विविध प्रश्नांवर चर्चा केली", असं सांगण्यात आलं.

त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, नसीम खान आणि जयराम रमेश यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आणि मग या सर्व काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर शरद पवार यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी बैठक झाली.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मलिक यांनी सांगितलं, "चर्चा अजूनही चालू आहे. आज किंवा उद्या चर्चा सुरू असेलच आणि महाराष्ट्राला लवकरच एक स्थिर सरकार मिळेल. गेल्या 21 दिवसांत महाराष्ट्रातली राजकीय अस्थिरता संपुष्टात येईल."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दुसरीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत हेही दिल्लीत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांबाबत ANI वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत म्हणाले, "तिकडे एक दुसरी मीटिंग राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सुरू आहे. त्यानंतर कदाचित पवार साहेब यांच्याबरोबर आमची बैठक होऊ शकते. आमचीही इच्छा आहे की महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट लवकरात लवकर हटावी आणि सरकार स्थापन व्हावं."

"हे तीन पक्षांचं सरकार असेल, हे मी स्पष्ट करू इच्छितो. त्यामुळे तीन पक्ष एकत्र येतील तर त्यासाठी एका समान किमान कार्यक्रमावर चर्चा करतोय. त्याला वेळ लागणारच. मग राष्ट्रपती राजवटीबद्दल चर्चा करावी लागेल, राज्यपालांची भेट घ्यावी लागेल, आमच्या पाठीशी उभे असलेल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या आणाव्या लागतील आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, ही आमची प्राथमिकता आहे. या सर्व गोष्टींना वेळ लागेल, पण येत्या दोन-पाच दिवसात ही पूर्ण प्रक्रिया पार पडेल," असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Facebook पोस्टवरून पुढे जा, 1

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 1

"दिल्लीतील हालचालींबद्दल उद्धव ठाकरेंशी सतत चर्चा सुरू आहे, त्यांना सर्व माहिती वेळोवेळी पुरवली जात आहे," असं ते पुढे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार का, असं विचारल्यावर ते म्हणाले. "उद्धव ठाकरेंनी सरकारचं नेतृत्व करावं, अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे, भावना आहे."

पवारांची मोदी भेट

तत्पूर्वी, शरद पवार यांनी बुधवारी दुपारी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रात ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, त्याबद्दलचं एक निवेदन पवार यांनी यावेळी मोदींना सादर केलं.

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट असल्यानं केंद्रानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी पवार यांनी मोदींकडे केली आहे.

दोन्ही नेत्यांची ही भेट 45 मिनिटं चालली. या बैठकीत कुठलही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.

पवार

फोटो स्रोत, Twitter / @Pawarspeaks

यावर विचारलं असता, शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, "त्यात काय एवढं? एका मोठ्या नेत्याने दुसऱ्या मोठ्या नेत्याची भेट घेतली आहे. आम्हीही मोदींची भेट घेतो. राज्याचे काही विषय आहेत, ज्याकडे केंद्राचं लश्र वेधणं गरजेचं आहे, त्यासाठी ते गेले होते. त्यांचं स्वागत करायला पाहिजे."

एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सत्तास्थापनेबाबत सकारात्मक दिसत असतानाच, मोदी पवार भेट अचानक घडून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचं पेव फुटलं आहे.

त्यातच, या आठवड्यात शरद पवारांनी केलेली वक्तव्यंसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी खेळी खेळणार का, असा संशय निर्माण करणारी आहे.

महाराष्ट्रासारखं महत्त्वाचं राज्य हातातून जाऊ नये, यासाठी "वेट अँड वॉच"ची भूमिका घेतलेले भाजपचे नेते पडद्यामागे कामाला लागले असल्याचं सांगितलं जातंय. आणि बुधवारी 'काही प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्र हातातून जाऊ नये म्हणून भाजपने शरद पवार यांना राष्ट्रपतिपदाची ऑफर दिली आहे', अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

त्यामुळे भाजप राष्ट्रवादीबरोबर जाणार, अशी शक्यता नाकारता येत नाही. "राज्यात आज जी काही राजकीय पार्श्वभूमी आहे त्यामुळे ही चर्चा स्वाभाविक आहे. मात्र, 'महाशिवआघाडी'ची चर्चा इतकी पुढे गेली आहे की ती मधेच थांबवून वेगळी चर्चा सुरू होईल, असं वाटत नाही," असं वाटत नसल्याचं वरिष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांचं म्हणणं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

देशपांडे पुढे सांगतात, "समजा महाशिवआघाडी होऊ शकली नाही आणि पुन्हा निवडणुकीची वेळ आली किंवा राज्यातली राष्ट्रपती राजवट पुढे सहा महिने सुरूच राहिली तर वेगळं चित्र असू शकेल. मात्र, भविष्यात काय होईल, हे आज सांगता येत नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाईल, अशी शक्यता आज तरी दिसत नाही."

सत्तस्थापनेबाबत सोनिया गांधी सकारात्मक - हुसेन दलवाई

"सत्तस्थापनेबाबत सोनिया गांधी सकारात्मक आहेत, त्या दिशेने काम सुरू आहे. काही मुद्द्यांवर चर्चा आवश्यक आहे, मात्र चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. आणि महाराष्ट्राला लवकरच शिवसेना-काँग्रेस-NCP असं सरकार पाहायला मिळणार आहे," असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई बीबीसीशी बोलताना म्हणाले.

"काँग्रेस हा सेक्युलर आणि राष्ट्रीय पक्ष आहे, शिवसेना वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे चर्चेला वेळ लागणारच. तोच जर नितीश कुमार किंवा रामविलास पासवान यांच्याशी चर्चा करण्याची गरज असती तर इतका वेळ लागला नसता, असंही ते बीबीसी मराठीच्या अभिजीत कांबळे यांच्याशी बोलताना म्हणाले.

पाहा हुसेन दलवाई यांच्याशी बातचीत

Facebook पोस्टवरून पुढे जा, 2

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 2

"मुस्लिमांच्या संबंधीचे प्रश्न, भीमा कोरेगाव, मुंबईच्या दंगली, अशा अनेक विषयांना मग हात घातला जाईल. पुढे चालून रामजन्मभूमी आणि अयोध्येचा मुद्दा, NRCचा मुद्दा, मुस्लिमांच्या शिक्षणाचा आणि आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येऊ शकतो. त्यामुळे सरकार बनवताना ते पाच वर्षं चालेल, या उद्देशाने ते बनवलं पाहिजे. म्हणून काँग्रेस असा तडकाफडकी निर्णय घेऊ शकत नाही," असंही ते म्हणाले.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार - संजय राऊत

राज्यातल्या सत्ता स्थापनेचं चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. येत्या 5-6 दिवसांमध्ये सर्व गोष्टी पूर्ण होतील, असं स्पष्ट करत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सरकार स्थापन होईल, असं राऊत यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

"विघ्नं दूर झाली आहेत. उद्या दुपारपर्यंत गोष्टी स्पष्ट होतील. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल," असं राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रपती राजवटीमुळे काही तांत्रिक गोष्टी असतात. कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. राज्यपालांना बहुमताचा आकडा साक्षीपुराव्यानिशी द्यावा लागतो. दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असं राऊत यांनी सांगितलं.

शरद पवारांनी देशाच्या पंतप्रधानांना भेटणं यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. विविध मुद्यांवर देशभरातले नेते त्यांना भेटत असतात. राज्याच्या स्थितीबद्दल पंतप्रधानांना माहिती द्यावी. राज्यातली शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे, असं त्यांनी पवार-मोदी भेटीवर म्हटलंय.

"अजित पवारांशी माझी प्रदिर्घ चर्चा झाली. महाराष्ट्रात लोकप्रिय सरकार येऊ नये असं वाटतं त्यांच्याकडून बेबनावाच्या बातम्या पेरल्या जातात," असं त्यांनी अजित पवारांबाबत येत असलेल्या बातम्यांबाबत म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)