IT क्षेत्रातील 30 ते 40 हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता - मोहनदास पै : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. IT क्षेत्रातील 40 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता - मोहनदास पै
भारतीय अर्थव्यवस्थेतील सुस्ती कायम राहिली, तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या 30 ते 40 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकतात, अशी भीती इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) मोहनदास पै यांनी व्यक्त केली आहे. लाईव्ह मिंटने ही बातमी दिली आहे.
"IT क्षेत्रात प्रत्येक 5 वर्षांनंतर हजारो लोकांच्या नोकऱ्या या प्रकारे जातात. कारण, पाच वर्षांत IT क्षेत्रात मोठे बदल होत असतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांतून काढलं जातं," असं पै यांनी म्हटलं आहे.
"जेव्हा कोणतीही इंडस्ट्री पूर्ण सक्षम होते, तेव्हा मध्यम स्तरावर काम करणारे अनेक लोक आपल्या पगाराच्या तुलनेत कंपनीला नवं काही देऊ शकत नाहीत. याच कारणामुळे जगात प्रत्येक क्षेत्रात अनेक जणांना आपली नोकरी गमवावी लागते," असंही त्यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, "एखादी कंपनी विकसित होत असते, तेव्हा कर्मचाऱ्यांना बढती मिळत असते, तसंच त्यांच्या पगारातही वाढ होत असते. अशा परिस्थितीत कंपनीला यामुळे फारसा फरक पडत नाही. मात्र, जेव्हा कंपनीचा विकास थांबतो, तेव्हा व्यवस्थापनाला यावर विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत मध्यम आणि वरच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त पगार मिळत असतो, त्यामुळे त्यांच्यावर नोकरी जाण्याचं संकट ओढावतं."
2. कोल्हापूर-सांगली महापुराची मदत वाऱ्यावरच?
ऑगस्टमध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात आलेल्या पुरातील बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी 8 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली होती.

फोटो स्रोत, BBC/Swati Patil
सुप्रीम कोर्टात याबाबत 18 नोव्हेंबरला सुनावणी झाली. त्यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महापूरग्रस्तांना सरकारची मदत मिळाली नसल्याचं दिसून आलं.
"तत्कालीन सरकारनं 6813 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारनं फक्त 900 कोटी रुपये मंजूर केले. तेही अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनास मिळाले नाहीत," असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
महापुरासंदर्भात मुदतीत म्हणणं सादर न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला फटकारलं.
येत्या 4 आठवड्यांत उपाययोजनांबाबतचा अहवाल सादर न केल्यास दोन्ही सरकारनं त्यांच्या मुख्य सचिवांना न्यायालयीन सुनावणीसाठी हजर करावं, असे आदेशही न्यायालयानं दिले.
3. शेतकऱ्यांना केंद्राचं अर्थसहाय्य मिळण्यात अडचणी
अवेळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानीसाठी केंद्र सरकारच्या निकषांनुसार अर्थसहाय्य मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे राज्याच्या निधीतून भरपाई देण्यासाठी पावलं टाकण्यात येत आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

साडेचार हजार कोटी रुपये भरपाईसाठी सध्या उपलब्ध आहेत, आणखी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडून संसदेला सादर करण्यात येणार आहे.
राज्याच्या विनंतीनुसार केंद्रीय पथक पुढील चार-पाच दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात दाखल होणार आहे.
4. सियाचीनमध्ये हिमस्खलन, 6 जवान ठार, 2 बेपत्ता
सियाचीनमध्ये हिमस्खलनामुळे बर्फाखाली गस्तीपथकाचे 8 जवान दबले होते. यातील 6 जवान ठार झालेत, तर 2 अजून बेपत्ता आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
उत्तर सियाचीनमध्ये जवानांची आठ सदस्यीय एक तुकडी बर्फाच्या वादळाच्या तडाख्यात सापडली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बर्फाचं वादळ आलं. या वादळात हे जवान अडकले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी जवानांची ही तुकडी गस्तीवर होती.
सियाचिन ग्लेशियर काराकोरम पर्वत रांग 20 हजार फूट उंचीवर आहे.
5. काश्मीरमध्ये शेतकऱ्यांचं 7 हजार कोटींचं नुकसान
5 ऑगस्टनंतरचे काश्मीरमधील सुरक्षा प्रतिबंध आणि नोव्हेंबरमधील अवकाळी बर्फवृष्टी याच्यामुळे सफरचंदाच्या उद्योगाचं जवळपास 7 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. द वायर मराठीनं ही बातमी दिलीय.

शेतकरी नेते राजू शेट्टी, योगेंद्र यादव आणि व्ही. एम. सिंग यांच्या इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीच्या (AIKSCC) बॅनरखालील प्रतिनिधीमंडळामध्ये काश्मीर दौरा केला.
त्यांच्या मूल्यांकनानुसार, "5ऑगस्ट नंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षेसाठी जी बंधनं लादली गेली, त्यामुळे वाहतूक उद्योग तसंच खरेदी-विक्रीच्या बाजारपेठा यांच्यावर हंगामाच्या सुरुवातीलाच मोठा परिणाम झाला. पेअर, चेरी आणि द्राक्षं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं जवळजवळ संपूर्ण नुकसान झालं."
दरम्यान, सरकारच्या स्वतःच्या अंदाजानुसार 23,640 हेक्टरपैकी जवळपास 35% जमिनीवरील पिकांचं बर्फवृष्टीमुळे नुकसान झालं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























