PMC बँक : दोन ऑडिटर्सना अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई #5मोठ्याबातम्या

पीएमसी बँक

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) PMC बँकप्रकरणी दोन ऑडिटर्सना अटक

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकप्रकरणी दोन ऑडिटर्सना अटक करण्यात आलीये. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीये. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिली आहे.

या ऑडिटर्सना आधी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या ऑडिटर्सनी बँकेच्या अनियमिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का, याची चौकशी करण्यात आली होती.

पीएमसी बँक

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईतील स्थानिक कोर्टात या दोन्ही ऑडिटर्सना हजर केलं जाईल, त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, हे दोन्ही ऑडिटर्स HDIL या रिअल इस्टेट फर्मशीही संबंधित असल्याचं चौकशीत समोर आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

2) भारताचं औद्योगिक उत्पादन 4.3 टक्क्यांपर्यंत घसरलं

भारतातील कमकुवत अर्थव्यवस्थेचं प्रतिबिंब औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकामध्ये उमटलं आहे. सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी नोंदवला गेलाय. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 4.3 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीये.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हा निर्देशांक जाहीर केला.

उद्योग

फोटो स्रोत, Getty Images

निर्मिती, कोळसा आणि पोलाद तसंच ऊर्जा क्षेत्रातल्या कमी निर्मितीमुळं सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादन घसरलं. तसंच, भारतातील औद्योगिक उत्पादन क्षेत्रांमधील 23 पैकी 17 क्षेत्रांची कामगिरी नकारात्मक राहिली आहे.

यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादनाचा दर 4.6 टक्के इतका होता.

दरम्यान, वाहन उद्योगात मात्र विक्री वाढल्यानं काहीसा दिलासा मिळालाय. ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहन विक्री 0.28 टक्क्य़ांनी वाढून 2 लाख 85 हजार 27 वर पोहोचलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीये.

3) दिल्लीत फी वाढीविरोधात JNU च्या शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं आहे. फी वाढ, ड्रेस कोड आणि संचारबंदी अशा मुद्द्यांना या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विरोध केला. लोकसत्तानं ही बातमी दिलीये.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

जेएनयूच्या कॅम्पसबाहेर झालेल्या निषेध मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्लीतल्या फ्रीडम स्वेअरपासून एआयसीटीई ऑडिटोरिअमपर्यंत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

गेल्या दोन आठवड्यापासून जेएनयूचे विद्यार्थी नव्या हॉस्टेल नियमावलीविरोधात आंदोलन करत आहेत. हॉस्टेलच्या फीमध्ये वाढ करण्यात आलीये. कर्फ्यू आणि ड्रेसकोड लागू करून निर्बंध लादले जात आहेत, असं जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा नेता आयशे सिंह याने सांगितलं.

4) 'बुलबुल' चक्रीवादळाची तीव्रता वाढली

बंगालच्या उपसागरात आलेलं 'बुलबुल' हे चक्रीवादळ दिवसागणिक तीव्र होताना दिसतंय. ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगानं ओडिशा, पश्चिम बंगालहून हे वादळ बांगलादेशकडे सरकत असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीये.

'बुलबुल' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगालमध्ये खबरदारी घेण्यात आलीये. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंदही ठेवण्यात आलं होतं. तसेच, किनारपट्टी भागातील जवळपास एक लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय.

बुलबुल चक्रीवादळ

फोटो स्रोत, Getty Images

या वादळामुळं पश्चिम बंगालच्या किनारी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. पूर्व मदिनापूर, पश्चिम मदिनापूर, हावरा, नदिया, हुगळी या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, ओडिशा राज्यात बुलबुल चक्रीवादळामुळं मोठं नुकसान झालंय. जनजीवन विस्कळीत झालं असून, बचावकार्य राबवलं जातंय. मात्र, अनेक भागात संपर्क तुटला आहे.

5) राम मंदिराच्या निर्मितीसाठी लोकनिधी जमवण्याचा विहिंपचा निर्णय

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय विश्व हिंदू परिषदेनं घेतला आहे. राम मंदिरासाठी लोकनिधी गोळा करण्यासह रामभक्तांची मदतही केली जाणार आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीये.

अयोध्या

फोटो स्रोत, Getty Images

"राम मंदिर उभारणीत हातभार लावण्यासाठी देशभरातील रामभक्तांना आवाहन केलं जाईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठीचा लढा हा असंख्य हिंदूंच्या श्रद्धा आणि भावनांशी जोडला होता. त्यामुळे ते सर्वजण थोडाफार हातभार लावतील," असं विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितलं.

लोकनिधीसंदर्भातील नेमका नियोजन काय असेल, याबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असंही बन्सल यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, देशभरातील 718 जिल्ह्यांमधून रामभक्तांचं शिष्टमंडळ अयोध्येत बोलावलं जाईल आणि अयोध्येच्या बांधकामासाठी मदत केली जाईल. कारसेवेसारखाचा हा भाग असेल, असेही संकेत बन्सल यांनी दिले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)