देवेंद्र फडणवीस: विदर्भातील मुख्यमंत्री असूनही, कुपोषणाची समस्या 'जैसे थे' - मुंबई होयकोर्टाचा टोला #5मोठ्याबातम्या

कुपोषण समस्या

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. विदर्भातील मुख्यमंत्री असूनही कुपोषणाची समस्या 'जैसे थे': हायकोर्टाची टीका

राज्याला विदर्भातील व्यक्ती पाच वर्षं मुख्यमंत्री म्हणून लाभूनही या परिसरातील कुपोषणाच्या समस्येत मात्र काहीच फरक पडलेला नाही, अशी टीका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (5 नोव्हेंबर) लगावला.

कुपोषणाचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने दिलेल्या आदेशांचे काय झाले, असा प्रश्नही न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

अद्याप नवं सरकार स्थापन न झाल्यामुळे अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळू शकत नसल्याची नाराजीही न्यायालयाने या वेळी व्यक्त केली. केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढील सुनावणीच्या वेळी हजर राहून यापूर्वी दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबत न्यायालयानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

आजही कुपोषणाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या तशीच आहे. डॉ. अभय बंग, डॉ. राजेंद्र कोल्हे यांच्यासारखे तज्ज्ञ ज्यांचा या परिसरावर, कुपोषणावर अभ्यास आहे. त्यांचीही मदत सरकार घेत नाही, असं याचिकाकर्त्यांनी या सुनावणीवेळी न्यायालयाला सांगितलं. राज्य सरकारनं कुपोषण हळूहळू कमी होत असून कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट झाल्याचा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात आला.

2. PMC बँकेतून आता 50 हजार रुपये काढता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतून (PMC बँक) पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन आदेशानुसार आता पैसे काढण्याची मर्यादा 40 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

PMC

फोटो स्रोत, ANI

व्यवहारात अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेनं PMCवर निर्बंध लादले होते. त्यानुसार बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्या होत्या. ही मर्यादा रिझर्व्ह बँक हळूहळू सैल करत आहे.

23 सप्टेंबरला बँकेवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर आतापर्यंत पैसे काढण्याची मर्यादा चारवेळा वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला पैसे काढण्याची मर्यादा केवळ एक हजार रुपये इतकीच होती. ती नंतर वाढवून 10 हजार रुपये करण्यात आली. नंतर ही मर्यादा 25 हजार आणि 40 हजार पर्यंत वाढवली गेली. आता आता चौथ्यांदा वाढ करत ही मर्यादा आज ५० हजार रुपये करण्यात आली आहे.

3. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी (5 नोव्हेंबर) संध्याकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

राष्ट्रवादी नेते

फोटो स्रोत, Twitter/NCP

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी यासाठी निवेदन दिले.

"परतीच्या पवासाने नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करावे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज आणि वीज बिल माफ करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी," अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

4. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून धर्मगुरूंची भेट

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या निवासस्थानी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांनी मुस्लीम धर्मगुरू, विचारवंत आणि अभ्यासकांची भेट घेतली. निकालानंतर सामाजिक सलोखा आणि एकात्मता टिकवून ठेवण्याबद्दल या भेटीत चर्चा झाली. इंडियन एक्सप्रेसनं हे वृत्त दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कृष्ण गोपाळ, रामलाल यांच्यासोबत भाजप नेते शहानवाज हुसैन, शिया धर्मगुरु मौलाना सय्यद कालबी जावाद तसंच अन्य मुस्लीम विचारवंतही उपस्थित होते.

"सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय असेल त्याचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे. शांतता राखण्याचे आम्ही सर्वांना आवाहन करु," असं शिया धर्मगुरु मौलाना सय्यद कालबी जावाद यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

5. बँक घोटाळा प्रकरणी CBIचे देशभरात 190 ठिकाणी छापे

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) 35 बँकांमधील सात हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी देशभरातील 190 ठिकाणी मंगळवारी (5 नोव्हेंबर) छापे घातले. या कारवाईसाठी सीबीआयने तब्बल एक हजार अधिकारी नियुक्त केले होते. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

यातील सर्वाधिक छापे महाराष्ट्रात घालण्यात आले असून राज्यातील 58 ठिकाणी सीबीआय पथके पोहोचली होती. दिल्लीत 12, तमिळनाडू व मध्य प्रदेशात प्रत्येकी 17, उत्तर प्रदेशात 15, आंध्र प्रदेशात पाच, चंडीगड येथे दोन, केरळमध्ये चार ठिकाणी छापे घालण्यात आले.

सीबीआयने या घोटाळ्यांशी संबंधित कंपन्या आणि संस्थांचे संचालक तसंच प्रवर्तकांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)