देवेंद्र फडणवीस म्हणतात रिफायनरी कोकणातच होणार #5मोठ्याबातम्या - विधानसभा निवडणूक

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.
1. देवेंद्र फडणवीसः रिफायनरी कोकणातच होणार
शिवसेनेचा विरोध असणारा तेल रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार असून महिन्याभरात मी स्वतः त्याची घोषणा करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट नमूद केले आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
'विधानसभा निवडणुकीत फार चुरस नसून काय होईल ते स्पष्टच दिसते आहे. तसेच, यावेळी कमळ या चिन्हावर मतदान होणार असल्याने आम्हाला बंडखोरीचाही फार फटका बसणार नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा आम्हीच सत्ता स्थापन करणार यात मला काही अडचण वाटत नाही,' असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या मुलाखतीमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणातच होईल. जिथे लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल तिथे हा प्रकल्प होईल. महिन्याभरात मी याबाबत स्वत: घोषणा करणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
2. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात घेणं हा भ्रष्टाचारच
ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्ट राजवटीचा ठपका देवेंद्र फडणवीस ठेवतात त्याच सरकारमधील ढीगभर नेत्यांना भाजपमध्ये घेतले हा राजकीय वर्तनातील आणि वैचारिक भ्रष्टाचारच आहे अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"खरे तर फडणवीस सरकारने प्रसारमाध्यमांचे आभार मानायला हवेत की, त्यांच्या सरकारने-मंत्र्यांनी जो भ्रष्टाचार केला तो त्या प्रमाणात बाहेर नाही आला. हे सरकार भ्रष्टाचारमुक्त आहे तर मग चिक्की प्रकरण काय होते? सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित संस्थेचे कर्जप्रकरण, अनुदान लाटण्याचा प्रयत्न हे सारे काय होते? महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विधानसभेत कागदपत्रांनिशी जमिनीच्या व्यवहाराबाबत आरोप झाले. अशी अनेक उदाहरणे देता येतील." अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली आहे.
3. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुरुंगात असलेल्या आमदाराकडून 53 लाख हस्तगत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या रमेश कदम यांच्याकडून पोलिसांनी 53 लाख 46 हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे. तब्येत बरी नाही असे सांगून तसेच ठाण्यामध्ये एक महत्त्वाचे पार्सल घ्यायचे आहे असे सांगत कदम यांनी पोलिसांना घोडबंदर रोडवरील एका फ्लॅटमध्ये नेले. तेथे पोलिसांनी छापा टाकला असता कदम यांच्याकडून ही रक्कम हस्तगत केली.
वैद्यकीय तपासणीसाठी कदम यांना रुग्णालयात नेले त्यानंतर मित्राकड़ून महत्त्वाचे पार्सल घ्यायचे आहे असे सांगत त्यांनी पोलिसांना घोडबंदरला नेण्याची विनंती केली. तेथिल फ्लॅटमधून पार्सल घेण्याच्या तयारीत असतानाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि कासारवडवली पोलिसांनी त्यांना पकडले. पार्सलची तपासणी केली असता त्यामध्ये 53 लाख 46 हजार रोकड आढळून आली. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
4. मतदानासाठी शासकीय तसेच खासगी कर्मचाऱ्यांना सुटी
खासगी कार्यालये, आस्थापन, दुकाने, कारखाने आणि अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी भरपगारी सुटी किंवा सवलत देण्यात यावी असे निर्देश राज्य कामगार आयुक्तांनी दिले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राज्य शासनाने याविषयी परिपत्रक काढले असून त्यानुसार सर्व दुकाने, खासगी कार्यालये, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृहे आदी ठिकाणी काम करणारे मतदानादिवशी सवलतीसाठी किंवा भरपगारी सुटीसाठी पात्र असतील. एबीपीमाझानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
5. आज प्रचाराचा शेवटचा दिवस
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी राज्यात विविध राजकीय पक्षांनी अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमित शाह यांची सकाळी खानदेशात तर दुपाकी अकोले, कर्जत-जामखेड येथे सभा होणार आहे.
राज ठाकरे यांची ठाण्यात सकाळी 10 वाजता तर त्याचवेळी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड-शो होईल. आगित्य ठाकरे यांची मुंबईत बाईक रॅलीही आज आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार त्यांच्या प्रचाराची सांगता बारामतीमध्ये करतील तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साताऱ्यात दहिवडी येथे सभा घेतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मालाडमध्ये असतील तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. लोकमत न्यूज 18 ने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























