महाराष्ट्र सरकार बांधणार काश्मीरमध्ये रिसॉर्ट- जयकुमार रावल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Twitter
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:
1. काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार जमीन खरेदी
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जम्मू-काश्मीरमध्ये लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जागा निश्चित करण्यासाठी जमिनीच्या सर्वेक्षणाचं काम पुढच्या 15 दिवसात सुरू होईल.
जम्मू-काश्मीरमध्ये अजून आम्हाला जागा सापडलेली नाही. श्रीनगरमध्ये विमानतळाजवळ जागा शोधण्याचा विचार असल्याचं राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने प्रकाशित केली आहे.
"कलम 370 रद्द झाल्याने तिथं जागा विकत घेण्याचा प्रश्न सुटला आहे. महाराष्ट्रातील जनतेला गिर्यारोहणामध्ये रस असल्याने MTDC लेहमध्येही गिर्यारोहणाबंधीचे रिसॉर्ट सुरू करण्याचा विचार करत आहे. दोन्ही मिळून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे," असं जयकुमार रावल म्हणाले.
"या रिसॉर्टच्या माध्यमातून अमरनाथ यात्रा आणि वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मदत केली जाईल," अशी माहिती MTDCच्या अधिकाऱ्यांनी दिली.
2. कृष्णेच्या पाण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सरकार एकत्र
कृष्णा खोरेल्या पाण्याचे संबंधित चार राज्यांना समान वाटप करावे, या आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या भूमिकेला एकत्रितपणे विरोध करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांच्या बैठकीत घेण्यात आला. ही बातमी लोकमतने दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter
कृष्णा खोऱ्यातील पाण्याचं वाटप पूर्वीपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि पूर्वीचा संयुक्त आंध्र प्रदेश या राज्यांना होतं. आता या पाण्याचे समान वाटप चार राज्यांमध्ये करण्यात यावं, अशी भूमिका घेत आंध्र प्रदेश आणि तेलंगणाने तशी याचिका कृष्णा खोरे पाणी लवादाकडे केली आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेतल्यावर सिद्धरामय्या आणि फडणवीस यांच्यात बैठक झाली. तेव्हा कृष्णा खोऱ्यातील पाण्यासह धरणांच्या पाण्याच्या नियोजनाबाबत एकत्रितपणे काम करण्याची भूमिका दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली.
3. दर 5 पैकी एका मुद्रा लाभार्थ्यानेच सुरू केला नवा व्यवसाय
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्या पाचपैकी एका लाभार्थ्यानेच नवीन व्यवसाय सुरू केला असल्याची माहिती कामगार मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. याबाबतचा अहवाल मंत्रालयाने अद्याप सार्वजनिक केलेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मुद्रा योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या कर्जातून फक्त 20.6 टक्के इतक्या लाभार्थ्यांनी नवे व्यवसाय सुरू केले. इतर लाभार्थ्यांनी आपला प्रस्थापित व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज काढले असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. ही बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
4. डी.के. शिवकुमार यांना अटक
कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते डीके शिवकुमार यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही बातमी हिंदुस्थान टाईम्स मराठीने दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter
ईडीकडून त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये डीके शिवकुमार यांच्यासह आणखी दोघांवर आर्थिक गैरव्यहाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
5. राज्यात साखर टंचाईचे सावट
कोल्हापूर-सांगली-सातारा भागात आलेल्या महापुरामुळे सुमारे 100 लाख टन ऊस वाया गेला असून त्यामुळे साखरेच्या उत्पादनातही 12 ते 13 लाख टनांची घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यावर साखर-टंचाईचे दाट सावट आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
गेल्या वर्षी राज्यात 11.65 लाख हेक्टर क्षेत्रावर 952 लाख मेट्रिक टन ऊस झाला. त्यातून 107 लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या साखरेचा प्रश्न निर्माण झाला. साखर मोठय़ा प्रमाणात पडून राहिल्याने साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे थकले. त्यामुळे राज्यातील साखर उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेले 20 लाख शेतकरी अडचणीत आले.
देशातही जवळपास हीच परिस्थिती असल्याने केंद्र सरकारने शिल्लक साखरेच्या प्रश्नात दिलासा देण्यासाठी निर्यात अनुदान जाहीर केले. त्यामुळे मुळात काही प्रमाणात शिल्लक साखरेचे प्रमाण घटणार आहे. त्यात या पूरसंकटाची भर पडली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























