प्रकाश आंबेडकर म्हणतात, कलम 370 नंतर आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:
1. कलम 370 नंतर आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न - अॅड. आंबेडकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे. ज्याप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्यात आला त्याप्रमाणे महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडच्या निवडणुका संपल्यानंतर भाजप आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ही बातमी लोकमतने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.
पुण्यातील वडार समाजाच्या मेळाव्यानंतर आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. भाजपने वंचित समाजाला फक्त आश्वासनं दिली. त्यांना सत्ता नाही दिली. आरक्षणासंदर्भात मोहन भागवत हे समीक्षा झाली पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे ते आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाहीत, असं आंबेडकर म्हणाले.
2. अमोल कोल्हेंची उदयनराजेंवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. तुमच्याकडे आम्ही आदराने बघत होतो आणि तुम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलात, असा प्रश्न कोल्हे यांनी उदयनराजेंना विचारला आहे.

फोटो स्रोत, Twitter
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये आली होती. यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. ही बातमी जय महाराष्ट्र न्यूजने प्रसिद्ध केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार अवधूत तटकरे हे शिवसेनेत दाखल होणार असल्याचं टीव्ही 9 मराठीने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे असलेल्या अवधूत यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. येत्या 3 सप्टेंबरला ते शिवसेनेत अधिकृतरित्या दाखल होणार आहेत असं वृत्तात म्हटलं आहे.
3. शिवसेनेला जागावाटप प्रस्ताव अद्याप दिलेला नाही - मुख्यमंत्री
शिवसेनेला जागावाटपाचा कोणताही प्रस्ताव दिलेला नसून त्यादृष्टीने अजून कोणतीही चर्चा सुरू झाली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

फोटो स्रोत, Twitter
संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील युतीबाबत वेगवेगळी विधानं करत असताना युतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलेलं आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला जागावाटपाबाबत प्रस्तावच दिलेला नाही आणि चर्चाही सुरू नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
4. बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही, सुप्रिया सुळे भावनिक
विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते पक्ष सोडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी त्यांचे वडील शरद पवार यांना उद्देशून भावनिक वक्तव्य केलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
"कालच माझं शरद पवारांशी बोलणं झालं. बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही, असं मी त्यांना म्हणाले. तेव्हा असं का बोलतेस? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. आताचे 75 वर्षांचे वडिल मुलासाठी नको त्या माणसाकडे झुकतात," अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी पक्षातून जाणाऱ्या नेत्यांबद्दल दिली. ही बातमी झी 24 तासनं दिली आहे.
5. काश्मीर गुंतवणूक परिषद लांबणीवर
जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑक्टोबरच्या मध्यात होणार असलेली 'जागतिक गुंतवणूक परिषद' पुढे ढकलण्यात आली आहे. ही परिषद आता नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्याने तिथं जमीन घेणं शक्य झालं असून त्यामुळे उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी ही परिषद होणार होती.

फोटो स्रोत, Reuters
महिनाभरात काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत होईल, असं सांगत या परिषदेची घोषणा जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचे मुख्य उद्योग सचिव एन. के. चौधरी यांनी केली होती.
मात्र सर्वसामान्य लोकांवर असलेले काही निर्बंध, राजकीय नेत्यांची स्थानबद्धता आणि राजकीय कार्यकर्त्यांचा सुरू असलेला तुरुंगवास महिनाभरानंतरही कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिषद पुढे ढकलली गेली आहे.असं लोकसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























