अजित पवारांसह 76 नेत्यांवर पाच दिवसांत गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे आदेश #5मोठ्याबातम्या

अजित पवार

फोटो स्रोत, Hindustan Times/getty images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. अजित पवारांसह 76 नेत्यांवर पाच दिवसांत गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे आदेश

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 2500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी येत्या पाच दिवसांत बँकेचे तत्कालीन संचालक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, दिलीपराव देशमुख, पांडुरंग फुंडकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह 76 संचालकांवर गुन्हा नोंदवा, असे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) गुरुवारी दिले.

या 76 जणांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकमतच्या वेबसाईटने ही बातमी प्रकाशित केली आहे.

या बँक घोटाळ्यात सकृतदर्शनी या सर्वांविरोधात 'विश्वसनीय पुरावे' आहेत, असे मत न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

2. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने स्क्रिनिंग कमिटीची स्थापना केली आहे. अध्यक्ष म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांची नेमणूक करण्यात आल्याचे पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य सिंधिया यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या निवडीनंतर आता राज्यात काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही बातमी झी 24 तासने आपल्या बेवसाईटवर प्रकाशित केली आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सहा जणांची एक समिती नेमली आहे. या समितीची प्रमुख पदाची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर हरिश चौधरी, मनिकम टागोर, मल्लिकार्जून खर्गे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी यांचाही समितीत समावेश आहे.

3. कृत्रिम पावसाची स्वप्ने दाखवू नका - अशोक चव्हाण

मराठवाड्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग अपयशी ठरत असतील तर सरकारने वस्तुस्थिती स्वीकारावी आणि जनतेला खोटी स्वप्ने दाखवणे बंद करावे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण

फोटो स्रोत, Getty Images

कृत्रिम पावसासंदर्भातील प्रयोगांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, जगभरात कृत्रिम पावसासाठी प्रयोग केले जातात. महाराष्ट्रातही अनेक वर्षांपासून हे प्रयोग सुरू आहेत. या प्रयत्नांना कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. पण मराठवाड्यात सातत्याने हे प्रयोग होत असताना अद्याप अपेक्षित यश प्राप्त झालेले नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने आपल्या बेवसाईटवर प्रकाशित केली आहे.

4. वाघांच्या शिकारीचे सर्वाधिक प्रमाण भारतात

जगभरातील एकूण वाघांपैकी 56 टक्के वाघ भारतात असले तरी वाघांच्या शिकारीचे सर्वाधिक प्रमाणदेखील भारतातच आहे. व्याघ्र अवयवांच्या जप्तीच्या एकूण घटनांपैकी सुमारे 40.5 टक्के घटना या भारतातील आहेत. वन्यप्राणी आणि वनस्पतींवर काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था 'ट्रॅफिक'ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

वाघ

फोटो स्रोत, AFP Contributor/getty images

2000 ते 2018या 18 वर्षांच्या काळात जगभरातील 32 देशांतून दोन हजार 359 वाघांच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले. यात प्रामुख्याने हाडे, कातडी याचा समावेश आहे. यापैकी एक हजार 86 घटना या 13 आशियाई देशातील आहेत. या तेरा देशात दरवर्षी सरासरी 60 जप्तीच्या घटना नोंदवण्यात आल्या. वाघाव्यतिरिक्त अस्वल आणि हत्तीचे अवयव देखील मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले.

दरवर्षी सुमारे 58 वाघांची शिकार त्याच्या कातडीसाठी केली जाते. 2016 पासून हे प्रमाण अधिक वाढले आहे. 2016 ते 2018 या कालावधीत सरासरी वार्षिक 44 टक्क्यापासून ते 73 टक्क्यार्यंत हे प्रमाण वाढले आहे. ही बातमी लोकसत्ताने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

5. प्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांची सुट्टी, विक्रम राठोड यांची निवड

माजी सलामीवीर फलंदाज विक्रम राठोड हे भारतीय क्रिकेट संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक असतील. ते संजय बांगर यांची जागा घेतील, तर भरत अरुण आणि आर श्रीधर अनुक्रमे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.

संजय बांगर

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR/getty images

एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्त्वातील समितीने या पदांसाठी प्रत्येकी तीन-तीन नावांची शिफारस केली होती आणि सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ज्या प्रशिक्षकाचं नाव वरच्या स्थानावर होतं, त्याची निवड करण्यात आली. ही बातमी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)