सांगली कोल्हापूर पाऊस: 'हा तर मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार'

फोटो स्रोत, Getty Images
'स्टीकरसंदर्भात मी बोलणार नाही. अन्नधान्याचं वाटप करणं हे सरकारचं काम आहे. महाराष्ट्र सरकार एवढं लिहिलेलं पुरेसं आहे. लोकांचा सरकारवर विश्वास असतो. कोणाच्याही फोटोची आवश्यकता नाही', असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
गिरीश महाजनांच्या पूरपर्यटन सेल्फीनंतर पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या अन्नधान्याच्या पॅकेट्सवर स्वत:चे फोटो असलेले स्टीकर लावल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं की, 'अन्नधान्याच्या पाकिटावर फोटो लावणं म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे.'
पाकिटावर कुणीही फोटो लावू नये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. "परिस्थिती बिकट आहे. कुणीही राजकारण करू नये. राजकारण करायला दुसरीकडे पुष्कळ जागा आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांना मदत कशी करता येईल हे पाहूया," असं मुख्यमंत्री म्हणाले.
अलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत पहिल्या दिवसापासून कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. त्यांच्याही अडचणी आहेत. कर्नाटक सरकारने हळूहळू विसर्ग वाढवून 5 लाख 30 लाख क्युसेक केला आहे. दोन्ही राज्य पूर्णपणे एकमेकांना मदत करत आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं.
मदतीबाबत काय म्हणतात मुख्यमंत्री?
पाऊस प्रचंड झाला. 2005 वेळी सांगलीत 31 दिवसांमध्ये 217 टक्के पाऊस पडला होता. 2019 मध्ये 9 दिवसात 758 टक्के पाऊस पडला आहे. तीन पट पाऊस केवळ नऊ दिवसात पडला आहे. कोल्हापूरचा विचार केला 31 दिवसात 159 टक्के पाऊस. 2019 मध्ये 9 दिवसात 480 टक्के पाऊस. 9 दिवसात तिप्पट पाऊस पडला. सांगलीत 95 बोटींद्वारे मदतकार्य सुरू आहे. 484 किमी रस्ते पावसामुळे खराब आहेत.
27 हजार हेक्टर शेतजमिनीला पुराचा फटका बसला आहे. पावणेदोन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. पूरग्रस्तांना रोख पैसे देण्याचं आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली जाईल. जनावरं गमावलेल्या आणि जमिनीचं नुकसान झालेल्यांनाही मदत पुरवण्यात येईल. शेतीतला गाळ काढण्यासाठी प्रतिहेक्टरी 13 हजार रुपयांची मदत पुरवली जाईल. प्रत्येक गावात एक डॉक्टर आणि दोन फार्मासिस्ट नेमण्यात येईल.
निवडणुकांचं काय?
निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारलं असता ते म्हणाले, निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय निवडणूक आयोग घेतं. परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.
सांगली आणि परिसरातील कुटुंबांना सरकारतर्फे प्रति कुटुंब 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र अन्नधान्यांच्या पोत्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दक्षता समिती इचलकरंजी सुरेशरावजी हाळवणकर यांची छायाचित्रं आहेत.

पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदताीत सरकार जाहिरातबाजी करत असल्याचा आरोप नेटिझन्सनी रोष व्यक्त केला आहे.
पूर परिस्थिती ओसरल्यानंतर मदतीसंदर्भात शासन निर्णय आल्यानंतर तातडीने बैठक घेऊन आम्ही धान्याची मदतीसाठी पॅकेट्स तयार केली. रेशन दुकानदारांनी हे फोटो लावले. ही मदत शासनाची आहे. रेशन दुकानदारांच्या कमिटीला मी बोललो आहे. महाराष्ट्र शासन लिहिणं अपेक्षित आहे. मात्र रेशन दुकानदारांनी हे फोटो लावले. आता ते स्टिकर काढण्याबाबत सांगितले जाईल असं स्पष्टीकरण सुरेश हाळवणकर यांनी दिलं आहे. त्यांनी याप्रकारावर दिलगरी व्यक्त केली आहे.
अन्नधान्याच्या पोत्यांवर नेत्यांची छायाचित्रं हा मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. हे अतिशय संतापजनक आहे. सरकारच्या पैशावर अशाप्रकारे जाहिरातबाजी करणे योग्य नाही. जनता या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं.
सरकार प्रसिद्धीसाठी वाटेल ते पावलं उचलत आहेत. कार्यकर्त्यांना छुप्या पद्धतीने हे स्टीकर लावायला सांगितले असतील असा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
'सरकारची प्राथमिकता कशाला? तर स्टीकर छापायला. स्टीकर छापण्यासाठी पूरग्रस्तांना तब्बल 2 दिवस मदत दिली नाही. लेकरं-बाळं उघड्यावर पडली. यांना मात्र स्वत:चे फोटो टाकत स्टीकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिकटवण्यात तत्परता दाखवायची आहे. शोबाजी पायी उपाशी माराल लोकांना', अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी राग व्यक्त केला आहे.
दरम्यान माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पूरग्रस्तांना दिलेल्या अन्नधान्य पॅकेट्सवर त्यांचे छायाचित्र आहेत.
जयंत पाटील यांच्याकडूनही पूरग्रस्तांना मदत पुरवण्यात येत आहेत. यावर त्यांची छायाचित्रं आहेत.
निवडणुका पुढे ढकला- राज ठाकरे
'सत्ताधाऱ्यांना पक्षप्रवेश, राजकीय यात्रांमधून सरकारला वेळ नाही. त्यांनी कोल्हापूर, सांगलीवर लक्ष केंद्रित करा. पुरामुळे हजारो लोकांना फटका बसला. माणसं मृत्युमुखी पडली आहेत. जनावरं दगावली आहेत. राज्यातली परिस्थिती बघता निवडणुका पुढे ढकला' अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
'भाजपला सत्तेचा माज आलाय. चार दिवसांनंतर सरकारला जाग आली. पूरपरिस्थिती असताना पहिल्याच दिवशी लष्कराला पाचारण करायला हवं होतं. कोण किती दिवस पाण्यात होतं, यावर मदत ठरवणार का? माणुसकी आहे की नाही?', असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























