काँग्रेसला आज नवा अध्यक्ष मिळणार? #5मोठ्याबातम्या

काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) काँग्रेसला आज अध्यक्ष मिळणार?

काँग्रेसला आज नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीची आज बैठक होणार असून, यात नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होऊ शकते. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे पद रिक्त होते.

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी एके अँटनी, अहमद पटेल यांसारख्या नेत्यांची बैठक पार पडली. काँग्रेस अध्यक्षपदाची लवकरात लवकर निवड करण्याचं या बैठकीत ठरलं. त्यानुसार आजच्या काँग्रेस कार्यकारिणीत नव्या अध्यक्षाच्या निवडीची शक्यता आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. वासनिक हे गांधी कुटुंबाचे एकनिष्ठ नेते मानले जातात.

2) अरूण जेटली 'एम्स'मध्ये

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना नियमित तपासणीसाठी काल रात्री एम्समध्ये दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने जेटलींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

अरुण जेटली

फोटो स्रोत, @ARUNJAITLEY

अरूण जेटली यांची प्रकृती आता स्थिर आहे, असं एम्सच्या डॉक्टरांनी प्रसिद्धपत्रक काढून माहिती दिली.

जेटलींना एम्समध्ये दाखल करताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रुग्णालयात धाव घेतली.

3) '26/11'सारख्या हल्ल्याची भीती, नौदल हायअलर्टवर

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर भारताच्या किनारपट्टीवरील भागात दहशतवादी हल्ला होण्याची भीती आहे. नौदलाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर नौदलाने सुरक्षाकवच अधिक कडक केले आहे. भारताच्या 7,517 किलोमीटरच्या समुद्र किनारपट्टीवरील तटरक्षक दलांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जाऊ शकते किंवा स्लिपर सेल्स सक्रीय केले जाऊ शकतात, असं लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

4) "निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर अशक्य"

निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर केला जाणार नाही, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. ही मागणी सुनील अरोरांनी फेटाळली.

ईव्हीएम

फोटो स्रोत, AFP / GETTY IMAGES

"मतदानाच्या जुन्या पद्धतीकडे पुन्हा वळणं शक्य नसून, सुप्रीम कोर्टानेही मतपत्रिकांचा वापर करण्यास वारंवार नकार दिलाय." असं अरोरा यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर व्हावा आणि त्यासाठी विरोधकांनी एकत्र यावं, यासाठी राज ठाकरे हे ममता बॅनर्जींना भेटले होते.

5) मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक धरणं कोरडीठाक

पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असताना, मराठवाड्यात मात्र धरणं कोरडी असल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातील 11 पैकी 7 धरणं कोरडी आहेत. सामनानं ही बातमी दिली आहे.

पावसाला सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतरही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडला नाही.

मराठवाडा विभागात आतापर्यंत केवळ 291.38 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या 37.4 टक्के एवढाच आहे. आतापर्यंत 369 मिमी पाऊस पडणं अपेक्षित होतं.

जायकवाडी, पैनगंगा, मानार आणि विष्णुपुरी या चार प्रकल्पातच मोठ्या प्रमाणात जीवंत पाणीसाठा असल्याचेही पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. तर येलदरी, निम्न दुधना, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरकणा आणि सिना कोळेगाव ही धारणं कोरडीठाक आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)