आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रा: तेच मुद्दे, तीच आश्वासनं आणि बाळासाहेबांच्या नातवाला पाहायला आलेल्यांची गर्दी

- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहेत ना.. बाळासाहेब भारी माणूस होता. हे त्यांचे नातू आहेत तर होतील मुख्यमंत्री....! नांदेड जिल्ह्यातल्या सोहमेश्वरी गावांत राहणार्या 55 वर्षांच्या गंगूबाईंचे हे शब्द. आम्ही आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेबरोबर सोहमेश्वरी गावात पोहचलो होतो.
एरवी फक्त एसटी दिसणार्या गावांत 25-30 गाड्यांचा ताफा चिखल तुडवत पोहचला होता. एवढ्या गाड्या कशासाठी ते बघायला लोकांची गर्दी होती. गावं तसं छोटसं. गावातल्या महिला 1.30 ते 2.00 च्या सुमारास घरातली कामं उरकून आदित्य ठाकरेंना बघण्यासाठी बसल्या होत्या.
त्यांच्याशी बोलताना आदित्य ठाकरे कोण आहे तुम्हाला माहितीये का? हे विचारलं. बाळासाहेबांचा नातू आहे ना.. त्यालाच बघायला थांबलोय. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही असं आदित्य ठाकरे वारंवार सांगत असले तरी शिवसेना नेते हेच म्हणत आहेत की आदित्य हेच मुख्यमंत्री होणार.
याच पार्श्वभूमीवर मी या महिलांना विचारलं ते मुख्यमंत्री होतील असं शिवसेनेचे नेते म्हणताय...होतील का? महिलांच्या घोळक्यातल्या गंगूबाई थोडं थांबल्या आणि मग म्हणाल्या बाळासाहेबांचे नातू आहेत ना.. मग होतील मुख्यमंत्री..!
आदित्य ठाकरेंनी गोदावरीच्या पुलाचं भूमिपूजन केलं. सोहमेश्वरी गावापासून ते पूर्णा तालुक्याला जोडणाऱ्या पूलामुळे गावकर्यांचा 40 किलोमीटरचा प्रवास कमी होणार आहे. सर्व कार्यक्रम आटपून परभणीला पोहचायचं होतं. वेळ कमी असल्याने मंदिराच्या आवारात असलेल्या छोट्या मैदानात शिवसेना नेत्यांना वगळून थेट आदित्य ठाकरे भाषणाला उभे राहिले.
गावातल्या महिलांना बाळासाहेबांचा नातू म्हणून ते भाषण ऐकण्याचं कुतूहल, काहींना पूल कधी सुरू होणार या उत्तराची अपेक्षा.. काहींना कर्जमाफी, पीकविमा याच काहीतरी सांगणार अशी आशा...
जय महाराष्ट्र. म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. पांढरा कुर्ता घातलेले आदित्य स्टेजवर उभे होते. आज मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहे. ही यात्रा निवडणुकीसाठी नाही तर तुम्ही केलेल्या मतदानासाठी आभार मानायला आलो आहे. तुमचं प्रेम, आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे.

पीकविम्याच्या अडचणी येतायेत त्यासाठी तुम्ही शिवसेनेच्या केंद्रावर जा तुम्हाला माझे शिवसैनिक मदत करतील. ज्यांनी आम्हाला मतदान केलं ते माझे आहेतच पण ज्यांनी नाही केलं त्यांची मनं जिंकायची आहेत. तुमचे आशीर्वाद पाठीशी आहेत ना? असं म्हटल्यावर होय असा काहींचा आवाज आला. पण ठाकरी शैलीच्या भाषणाला मिळणाऱ्या जोरदार प्रतिसादाच्या तुलनेत हा आवाज कमीच होता. त्यानंतर आदित्य यांनी विचारलं हात वर करून सांगा कोण कोण माझ्याबरोबर आहे. तेव्हा मात्र शेतकऱ्यांनी हात वर केले.
तुमचे आशीर्वाद असेच राहूदे म्हटल्यावर टाळ्या वाजल्या आणि 10 मिनिटांत भाषण संपलं. दिवसभरात नांदेड शहरापासून ते गोदावरी गावापर्यंत आदित्य ठाकरेंचं हे तिसरं भाषण होतं. मुद्दे, वाक्यं तीच. फक्त लोकं बदललेली..! पीकविमा आणि कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारचं अपयश नाकारता येत नव्हतं.
पण पुन्हा तिचं आश्वासनं लोकांना मिळतं होती. आदित्य भाषण संपवून निघाले. गावातल्या तरूणांची सेल्फीसाठीची गर्दी होतीच. पण एखादा सेल्फी काढून आदित्य ठाकरे सुरक्षारक्षकांच्या कवचातून त्यांच्या मर्सिडीजपर्यंत पोहचले. त्यांच्या मागे तितक्याच वेगाने 25-30 गाड्या गेल्या.
आदित्य 1 किलोमीटरच्या छोट्याशा रस्त्यावरून मर्सिडीजमधून जनआशिर्वाद यात्रेच्या बसपर्यंत पोहचले. मग बसमधून सुरू झाला पुढचा प्रवास..

फोटो स्रोत, Aditya thackeray twitter
सोमेश्वर गावापासून लोहा तालुक्यात पोहचायचं होतं. लोह्यातल्या 26 गावांत अवेळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आहेत. लोह्यात पुन्हा शेतकऱ्यांबरोबर 'आदित्य संवाद' होता. आम्हीही आदित्य ठाकरेंबरोबर त्यांच्या बसमध्ये चढलो. बसमध्ये युवासेनेचे पदाधिकारी, नांदेडचे खासदार हेमंत पाटील, पालकमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि नुकतेच शिवबंधन बांधलेले सचिन अहिर होते.
अरूंद रस्त्यांमुळे बस हळूहळू पुढे जात होती. एसी बसच्या मोठ्या काचेच्या खिडकीचा निळा पडदा बाजूला सारून आदित्य ठाकरे लोकांना हात दाखवत होते. 4-5 किलोमीटरवर स्वागतं होत होती. काही बसमधून उतरून स्वीकारत होते तर काहींशी बसच्या दरवाजातून संवाद साधत होते. दुपारचे साडेतीन वाजले होते. आदित्यबरोबर आमचा संवाद सुरू झाला.
बसमधून बाहेर बघत किती छान हिरवळ दिसतेय ना! सगळीकडे छोटी छोटी पिकं दिसतायेत. ऐरवी मराठवाड्यात नुसती काळी जमीन दिसते. आता छान वाटतंय. मी असा मराठवाडा पहिल्यांदाच पाहतोय असं हसत आदित्य म्हणाले. पण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2 फूटांपर्यंत वाढणारी पिकं अजून छोटीशीच आहेत. कितीतरी क्विंटल निघणारं पिक आता अर्धच निघेल या चितेंत शेतकरी आहेत. याची कल्पना कदाचित आदित्य ठाकरेंना नसावी.
कॅमेरा रोल झाल्यावर राजकीय प्रश्न उत्तरं सुरू झाली.

फोटो स्रोत, Aditya thackeray twitter
ही यात्रा निवडणुकीसाठी नसून जनतेसाठी आहे. हे वारंवार आदित्य सांगत होते. पण दुसरीकडे निवडणूक लढवावी की नाही हेसुध्दा मी या यात्रेच्या माध्यमातून जाणून घेतोय. लोकसभेत किंवा विधानसभेवर निवडून जाणं ही लोकांची सेवा करण्याचं माध्यम आहे. माझी निवडणूक लढवण्याची तयारी आहे. जबाबदारी दिली तर पार पाडेन असं म्हणाले. तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहात का? या प्रश्नावर आदित्य हसले आणि राजकीय उत्तर पुढे केलं.
निवडणुकीनंतर या पदांचा विषय येतो. माझ्यावर शिवसेना नेत्यांचं प्रेम आहे. जनतेनेही ते प्रेम दिलं तर माझी तयारी आहे पण भगवा मुख्यमंत्री होणार हे निश्चित! देशात मोदींची अजूनही लाट आहे असं वाटतं? हा देश आशावादी आहे. मोदीजी उध्दवजी सगळेच आहेत. देशात लाट होती. पण यावर बनलेल्या सरकारने दिलेली आश्वासनं आम्ही पाळली. पीकविमा, कर्जमुक्ती आम्ही करून घेतली. जी नवी लोकं आमच्यासोबत येतायेत त्यांना घेऊन आम्ही नवा महाराष्ट्र बांधणार आहोत. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून लोकांचे प्रश्न जाणून घेणार आहे आणि ते सोडवणार आहे.
आदित्य ठाकरेंची मुलाखत 6 किलोमीटरच्या प्रवासात संपली. त्यानंतर रस्त्यात पुन्हा विद्यार्थ्यांकडून स्वागत मग पुढचा प्रवास. 21 किलोमीटरच्या प्रवासानंतर लोहा तालुक्यात पोहचलो. कर्जमुक्ती आणि पीकविम्याचं आश्वासनं आमच्या सरकारने पाळलं हे कॅमेर्यावर सांगणार्या आदित्य ठाकरेंनी सभेला पोहचल्यावर पीकविम्याचा प्रश्न सोडवण्याचं निवेदन स्वीकारलं आणि आदित्य संवादच्या भाषणासाठी पुढे गेले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























