ब्राह्मणांना अॅट्रोसिटी कायद्याचं संरक्षण देण्याची मागणी : #5मोठ्याबातम्या

न्याय

फोटो स्रोत, iStock

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. ब्राह्मणांना अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण देण्याची मागणी

ब्राह्मण समाजाला आरक्षण नको. मात्र, अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण द्या, अशी मागणी ब्राह्मण समाज मेळाव्यात करण्यात आली. हे वृत्त महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलं आहे.

माढामध्ये ब्राह्मण समाज सेवा संघाच्यावतीनं तालुक्यातल्या ब्राह्मण समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्राह्मण समाजानं आरक्षण मागितलं नाही.

राज्यात सुमारे दीडशे पुस्तकांमध्ये ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहून समाजाची बदनामी करण्यात आली असल्याचा आरोप मेळाव्यात करण्यात आला आहे. ब्राह्मण समाज पुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर समाजाला आरक्षण नको संरक्षण हवं आहे, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली.

2.संधी मिळाल्यास मुख्यमंत्री बनणार - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

माझ्या राजकीय जीवनात पक्षानं माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती मी यशस्वीपणे पार पाडण्याचं काम केलं आहे. मी आजवर कोणत्याही पदासाठी इच्छुक किंवा दावेदार नव्हतो. मात्र, माझ्या कामाच्या जोरावर मला महत्त्वाची पदं मिळत गेली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्यास मी ती का सोडेन, असं विधान महसूलमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटीलही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. ही बातमी लोकसत्ताने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.

3. नऊ वर्षांनंतर होणार शिक्षक भरती

राज्यातील शिक्षक भरतीला नऊ वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. येत्या 9 तारखेपासून पवित्र पोर्टलवरूनच राज्यातील 12 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही बातमी ई-सकाळच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर शुक्रवारी याबाबत सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार 9 ऑगस्टला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 16 ऑगस्टला उमेदवारांच्या मुलाखतीसह संस्थांसाठीची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

4. भारतीय अर्थव्यवस्थेची सातव्या क्रमांकावर घसरण

जगात पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय अर्थव्यस्थेची दोन स्थानांनी पिछेहाट झाली आहे. युनायटेड किंगडम आणि फ्रान्सने जागतिक अर्थव्यस्थांच्या यादीमध्ये भारताला मागे टाकले आहे. त्यांनी अनुक्रमे पाचवं आणि सहावं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आता भारत या यादीमध्ये सातव्या क्रमांकाला फेकला गेला आहे.

निर्मला सीतारामन आणि अनुराग ठाकूर

फोटो स्रोत, Twitter

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला होता.

त्यामुळेच ही आकडेवारी मोदी सरकार आणि सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. याबाबतचं वृत्त लोकसत्ताने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलं आहे.

5. तिहेरी तलाकचा राज्यातील पहिला गुन्हा ठाण्यात दाखल

ठाण्याजवळच्या कौसा मुंब्रामध्ये एका उच्च शिक्षित महिलेने मुस्लीम विवाह कायद्याअंतर्गत आपल्या पतीविरोधात तक्रार केली आहे. यानंतर तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिहेरी तलाक विरोधी कायदा बनल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे.

ही महिला एमबीए झालेली आहे. तिला 6 महिन्यांचा एक मुलगा आहे. पतीचं नाव इम्तियाज गुलाम पटेल आहे. तो 35 वर्षांचा आहे. गेल्यावर्षी त्याने आपल्या पत्नीला व्हॉट्सअ‌ॅपवर तलाक दिला होता.

तलाक दिल्यानंतर गेल्या वर्षीपासून तो दुसऱ्या महिलेसोबत लग्न करून राहत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. पतीसोबतच सासू आणि नणंद यांच्याबद्दलही या महिलेने छळ होत असल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबतचं वृत्त ई-टीव्ही भारतने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)