विरल आचार्य: रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरनी का दिला राजीनामा?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

फोटो स्रोत, HORACIO VILLALOBOS - CORBIS

फोटो कॅप्शन, विरल आचार्य
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच राजीनामा दिलाय. विरल आचार्य यांच्याविषयी मीडियात आलेल्या वृत्तांना RBIने दुजोरा दिलाय.

गेल्या सात महिन्यांत दुसऱ्यांदा असं झालंय की रिझर्व्ह बँकेच्या एखाद्या उच्चाधिकाऱ्याने आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडलंय. या आधी RBIचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी डिसेंबरमध्ये वैयक्तिक कारणं देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

रिझर्व्ह बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाळ यांनी एका जाहीर पत्रकात म्हटलंय, " काही वैयक्तिक कारणांमुळे आपण 23 जुलै 2019नंतर आपल्या पदावर काम करू शकणार नसल्याचं काही आठवड्यांपूर्वीच डॉक्टर आचार्य यांनी रिझर्व्ह बँकेला एक पत्र लिहून कळवलं होतं. त्यांच्या या पत्राविषयी संबंधित अधिकारी विचार करत आहेत."

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

फोटो स्रोत, Press release

फोटो कॅप्शन, प्रेस रिलीज

23 जून 2017 रोजी विरल आचार्य यांनी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदाचा पदभार स्वीकारला होता. आचार्य यांनी 6 जून रोजी झालेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीच्या काही आठवड्यांपूर्वीच राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.

भाषणांमुळे चर्चेत

सरकार RBIच्या स्वायत्ततेसोबत तडजोड करत असल्याचा आरोप करत मोदी सरकारला खडे बोल सुनावल्याने RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून विरल आचार्य 26 ऑक्टोबर 2018मध्ये चर्चेत आले. रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाच्या बैठकीच्या तीनच दिवसांनंतर त्यांचं हे भाषण झालं होतं.

जे सरकार आपल्या केंद्रीय बँकांच्या स्वायत्ततेचा आदर राखत नाही त्यांना कधी ना कधी बाजारपेठांच्या रागाला सामोरं जावंच लागतं, असं त्यांनी आपल्या सुमारे दीड तासाच्या भाषणात म्हटलं होतं.

RBI आणि मोदी सरकार यांच्यातल्या नात्यातला हा तणाव असल्याचं त्यावेळी मानण्यात आलं होतं.

या भाषणाच्या काही काळ आधीच सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद झाले होते . व्याज दरात कपात करण्यात यावी, बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांना म्हणजे NBFCना जास्त पैसे देण्यात यावी, अशी सरकारची अपेक्षा होता. यासोबतच RBIने आपल्याकडील रिझर्व्हचा काही हिस्सा सरकारला द्यावा अशीही सरकारची इच्छा होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, ऊर्जित पटेल यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.

पण असं करण्यास तेव्हाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी नकार दिल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. असंही म्हटलं जात होतं सरकारने आरबीआयच्या बोर्डावर त्यांच्या मर्जीतल्या सदस्यांची नेमणूक केली, जे बैठकीमध्ये उघडपणे डेप्युटी गव्हर्नरांकडे नाराजी व्यक्त करत.

कोण आहेत विरल आचार्य?

भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य हे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक होते. डेप्युटी गव्हर्नरपदासाठी अर्ज केलेल्या 100 पेक्षा जास्त लोकांमधून विरल आचार्य यांची निवड करण्यात आली.

स्टर्न बिझनेस स्कूलमध्ये 2009 सालापासून आचार्य अर्थशास्त्र विषय शिकवायचे. याआधी ते लंदन बिझनेस स्कूल (LBS)मध्ये अर्थशास्त्र शिकवायचे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

फोटो स्रोत, STERN.NYU.EDU

फोटो कॅप्शन, विरल आचार्य

काही वर्षांपूर्वी विरल आचार्य यांनी 'यादों के सिलसिले' या नावाचा एक म्युझिक अॅल्बमही काढला होता.

अर्थशास्त्राच्या दुनियेत येण्याआधी त्यांनी 1995मध्ये IIT मुंबईमधून पदवी मिळवली. यानंतर त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून फायनान्समध्ये PhD केली आणि नंतर लंडन बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

'युरोपियन सिस्टिमॅटिक रिस्क बोर्ड'च्या वैज्ञानिक सल्लागार समितीचेही विरल आचार्य सदस्य होते. सेबी आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचेही विरल आचार्य सदस्य होते.

रिझर्व्ह बँकेमध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. यातल्या दोघांना पदोन्नतीच्या माध्यमातून हे पद मिळतं. इतर दोघांपैकी एक बँक व्यावसायिक असतो तर एक पद अर्थशास्त्र तज्ज्ञाचं असतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)