'तो मला शोधेल, मला मारून टाकेल', दिल्ली पोलीस श्रद्धा वालकरचं रेकॉर्डिंग वाजवतात तेव्हा...

1. 'तो मला शोधेल, मला मारून टाकेल', दिल्ली पोलीस श्रद्धा वालकरचं रेकॉर्डिंग वाजवतात तेव्हा...
श्रद्धा वालकर प्रकरणात युक्तिवाद पूर्ण होताना श्रद्धा वालकरचं रेकॉर्डिंग कोर्टात सादर करण्यात आलं. त्यात ती ‘तो मला शोधेल, मला मारून टाकेल,’ असं ओरडताना ऐकू येत असल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा यांनी हे प्रकरण 25 मार्च पर्यंत पुढे ढकललं आहे.
विशेष सरकारी वकील अमित प्रसाद आणि मधुकर पांडे यांनी दिल्ली सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. आरोपी पुनावालाच्या विरोधात अनेक पुरावे गोळा झाले असून त्यातून संपूर्ण घटनाक्रम समोर येत आहे.
तर आरोपीचे वकील जावेद हुसैन यांनी या युक्तिवादाला उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला. 24 जानेवारीला दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं होतं.
2. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे आम्हाला आधीच माहिती होतं- संजय शिरसाट
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा संपूर्ण राज्याला धक्का बसला होता. मात्र ते मुख्यमंत्री होणार हे आम्हाला आधीच माहिती होतं, असा गौप्यस्फोट आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.
“हो मला माहिती होतं. तुम्ही मला एकनाथ शिंदेच्या जवळचं समजता ना? मग ही गोष्ट मला माहितीच होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे मला आधीच माहिती होतं. आम्हाला मुख्यमंत्रिपदाची लालसा नव्हती.
आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीपासून विभक्त व्हायचं होतं. आता जे मंत्री झालेत ते त्याच खात्याचे मंत्री होते. आम्ही काय वेगळं केलं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे जो मतदार दूर गेला होता तो आता जवळ यायला लागला आहे,” असं ते म्हणाले.
3. सोन्याचा भाव वधारला, एक तोळं सोनं आता 60 हजाराला

फोटो स्रोत, Getty Images
ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याच्या भावात सोमवारी प्रतितोळा 1 हजार 4०० रुपयांची वाढ होऊन तो 6० हजार 1०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. जागतिक पातळीवर झालेल्या भाववाढीचा परिणाम भारतीय बाजारांमध्ये बघायला मिळत आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
सोन्याचा भाव याआधी बाजार चालू असलेल्या दिवशी 58 हजार 700 रुपये होता. आता राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावाने आतापर्यंतची विक्रमी कामगिरी केली आहे.
चांदीच्या दरानेही सोमवारी मोठी उसळी घेत प्रतिकिलो 1 हजार 860 रुपयांची वाढ नोंदविली. त्यामुळे चांदीचा दरही 69 हजार 340 रुपयांवर पोहोचला आहे.
4. मेहुल चोकसींविरोधातली रेड कॉर्नर नोटीस मागे

फोटो स्रोत, Getty Images
इंटरपोलने फरार व्यापारी मेहुल चोक्सी याच्याविरोधात जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेतली आहे.
सीबीआयने या निर्णयाला दुजोरा दिलेला नाही. पण इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस मागे घेतल्याने मेहुल चोक्सीला आता जगभर मुक्तपणे प्रवास करता येणार आहे. याबाबतचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.
मेहुल चोक्सीने अलीकडेच अँटिग्वा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भारत सरकारला प्रतिवादी बनवलं होतं.
संबंधित याचिकेत चोक्सीने म्हटलं की, "दोन भारतीय गुप्तहेरांनी माझं अँटिग्वा येथून अपहरण केलं आणि जून २०२१ मध्ये आपल्याला जबरदस्तीने डॉमिनिका रिपब्लिकमध्ये नेलं. संबंधित गुप्तहेर ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’चे एजंट्स असण्याची शक्यता आहे."
5.मोदीसाहेब, भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचेस होवू द्याव्यात- शाहिद आफ्रिदी
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड जगातलं एक शक्तिशाली क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये क्रिकेटच्या मॅचेस होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, दोन देशांमधील संबंध पूर्ववत व्हावे यादृष्टीने प्रयत्न करावेत, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने केलं आहे.
त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच तशी गळ घातली आहे. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.
“जर एखाद्याशी मैत्री करायची असेल आणि समोरची व्यक्ती बोलत नसेल तर काय करावं? बीसीसीआय एक शक्तिशाली बोर्ड आहे. तुमच्याकडे जास्त ताकद असते तेव्हा जबाबदाऱ्याही तितक्याच असतात. बीसीसीआयने ही जबाबदारी घ्यावी,” असं तो म्हणाला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























