You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी...
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
संजय राऊत : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरण नेमकं काय आहे?
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ENFORCEMENT DIRECTORATE) पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक केली होती.
शिवसेनेत एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावर केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
9 नोव्हेंबर रोजी त्यांना जामीन मिळाला आहे,पत्राचाळ जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय आहे?
आणि याच्याशी संजय राऊत यांचा संबंध कसा आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
'या' दोन मराठी कुटुंबांनी देशाला दिले तीन सरन्यायाधीश
देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी सूत्रं हाती घेतली आहेत.
वडील आणि मुलगा दोघेही सरन्यायाधीश होण्याचा बहुमान चंद्रचूड कुटुंबाला मिळाला आहे. त्यांच्याआधी सरन्यायाधीश असलेले न्या. लळित हेदेखील मराठीच.
या दोन कुटुंबांमधून देशाला तीन सरन्यायाधीश मिळाले. वकिली व्यवसायात प्रस्थापित अशा या दोन कुटुंबांचे संबंध खूप जुने आहेत.
अगदी या दोन सरन्यायाधीशांच्या जन्मापूर्वीपासूनचे. वाचा त्यांची ही गोष्ट त्यांनीच सांगितलेल्या किश्श्यांमधून.
रत्नागिरी बारसू रिफायनरी : जागतिक ठेवा असणाऱ्या कातळशिल्पांचं काय होणार?
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोकणताल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ऑइल रिफायनरीची चर्चा सुरु झाली आहे.
अनेक पर्यावरणीय आक्षेप घेतले गेलेल्या या प्रकल्पाला राजकीय परिमाणही आहे. अगोदर शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष आणि आता महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर, शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशा संघर्षाचं निमित्त ठरु पाहणारा हा रिफायनरी प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे सातत्यानं चर्चेत आहे.
पण या प्रकल्पासमोरच्या प्रश्नांची क्लिष्टता केवळ राजकीय, पर्यावरणीय आणि स्थानिक अर्थकारणाची नाही, तर त्यासोबत त्याला कलेचंही एक परिमाण आहे. त्याविषयी अद्याप फार बोललं गेलेलं नाही आहे.
वरुण धवनला झालेला 'हा' आजार आहे तरी काय?
अभिनेता वरुण धवनने इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये दिलेल्या मुलाखत त्याला व्हेस्टिब्यूलर हायपोफंक्शन नावाचा आजार झाल्याचं म्हटलं होतं.
वरुणने यासंदर्भात सविस्तर ट्वीट करून माहिती दिली आहे.वरुणने लिहिलं आहे, "मित्रांना काही दिवसांपूर्वी मी एक मुलाखत दिली ज्यामध्ये तब्येत बरी नसल्याचं म्हटलं होतं. हे कळल्यावर तुम्ही सगळ्यांनी आपुलकीने विचारपूस केलीत.
तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी भारावून गेलो आहे. तुमच्या सदिच्छांमुळे मी 100 टक्के बरा होऊन परतेन याची खात्री वाटते. योगा, स्विमिंग, फिजिओ आणि जीवनशैलीत केलेल्या बदलांमुळे माझी तब्येत सुधारते आहे. सूर्यप्रकाश मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. देवाची कृपा आहे."
फेसबूकने 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
फेसबूकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने 13 टक्के लोकांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण 87,000 कर्मचाऱ्यांपैकी 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं आहे. मेटा कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे.
कंपनीचे अध्यक्ष मार्क झकरबर्ग यांच्या मते मेटाच्या इतिहासातला हा सगळ्यांत मोठा बदल आहे.गेल्या आठवड्यात ट्विटर कंपनीनेही अशीच कर्मचारी कपात केली होती आणि त्यामुळे मोठा गहजब झाला होता.
“हा सगळ्यांसाठी अतिशय कठीण काळ आहे याची मला कल्पना आहे. ज्यांच्यावर या निर्णयाचा परिणाम झाला आहे त्यांच्याबद्दल मला वाईट वाटत आहे.” असं मार्क झकरबर्ग यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)