You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
8 तासांची वनडे साडेपाच तासात आटोपली; भारतीय संघाचा दणदणीत विजय
न्यूझीलंडने दिलेलं 109 धावांचं लक्ष्य दोन विकेट्सच्या मोबदल्यात गाठत भारतीय संघाने दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडने वनडे मालिकेसाठी दहा वेळा भारताचा दौरा केला आहे पण अद्यापपर्यंत त्यांना एकदाही मालिका जिंकता आलेली नाही.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजी विभागाचं नेतृत्व हाताळणाऱ्या शमीला दिमाखदार कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 72 धावांची सलामी देत विजय सुकर केला. रोहितने 51 तर शुबमनने 40 धावा केल्या.
तिसरी लढत 24 जानेवारीला इंदूर इथे होणार आहे.
गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा डाव 108 धावांतच गुंडाळला. न्यूझीलंडच्या आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये धडाकेबाज सलामीवर फिन अलनला शून्यावरच बाद केलं. सहाव्या ओव्हरमध्ये सिराजच्या गोलंदाजीवर हेन्री निकोल्स शुबमन गिलच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्याला केवळ 2 धावा करता आल्या.
पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने स्वत:च्याच गोलंदाजीवर डॅरेल मिचेलला अफलातून झेल टिपत बाद केलं. त्याने एका धावेचं योगदान दिलं.
शमीप्रमाणेच हार्दिक पंड्याने स्वत:च्याच गोलंदाजीवर डेव्हॉन कॉनवेचा झेल टिपत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडलं. कर्णधार लॅथमकडून संघाला अपेक्षा होत्या पण शार्दूल ठाकूरच्या फसव्या चेंडूवर तोही गिलकडे झेल देऊन तंबूत परतला. लॅथम बाद होताच न्यूझीलंडची अवस्था 15/5 अशी झाली.
मायकेल ब्रेसवेल आणि ग्लेन फिलीप्स यांनी सहाव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. शमीच्या उसळत्या चेंडूवर पूलचा फटका खेळण्याचा ब्रेसवेलचा प्रयत्न विकेटकीपर इशान किशनच्या हातात जाऊन विसावला. ब्रेसवेलने 22 धावा केल्या.
फिलीप्सला मिचेल सँटनरची साथ मिळाली आणि या जोडीने सातव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने सँटनरला त्रिफळाचीत केलं. वॉशिंग्टने सुंदरने फिलीप्सला माघारी धाडलं. त्याने 36 धावा केल्या. ही जोडी फुटताच भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांना स्थिरावू दिलं नाही.
भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने 18 धावांत 3 विकेट्स पटकावल्या. हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत शमीला चांगली साथ दिली. मोहम्मद सिराजने 6 ओव्हर्समध्ये फक्त 10 धावा देत एक विकेट पटकावली.
जेव्हा रोहित गोंधळतो...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि टॉम लॅथम मैदानात उतरले. सामनाधिकारी जवागल श्रीनाथही पोहोचले. टॉस झाला पण त्यानंतर एक अनोखा गोंधळ पाहायला मिळाला.
रोहितने टॉस जिंकला. त्यानंतर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी रोहितला काय निर्णय घेणार असं विचारलं पण तो गोंधळून गेला.
श्रीनाथ आणि न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम दोघेही रोहितच्या निर्णयाची प्रतीक्षा करत राहिले. १० सेकंदानंतरही रोहित ठरवू शकला नाही तेव्हा तेही चक्रावून गेले. अखेर रोहित शर्माने गोलंदाजी करणार असल्याचं सांगितलं.
भारतीय संघाने हैदराबाद इथे झालेली लढत जिंकून मालिकेत आघाडी घेतली. रायपूर इथे पहिल्यांदाच वनडे होत आहे. संध्याकाळनंतर दव पडत असल्याने गोलंदाजांना चेंडू ग्रिप करणं कठीण होतं. क्षेत्ररक्षकांनाही त्रास होतो. प्रचंड धावसंख्येचा बचावही करता येईल का अशी परिस्थिती निर्माण होते.
पहिल्या सामन्यातही 349 धावा करुनही भारतीय संघाला 17 धावांनीच विजय मिळवता आला होता. शुबमनने द्विशतकी खेळी करत भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला होता पण मायकेल ब्रेसवेलने 140 धावांची तडाखेबंद खेळी करत न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या.
यातून बोध घेत काय निर्णय घ्यायचा याबाबत रोहित गोंधळात सापडला.
रोहितचा गोंधळ पाहून समालोचक रवी शास्त्री यांनी त्याला विचारलं. तो म्हणाला, “टॉस जिंकून काय करायचं याबाबत आम्ही खूप चर्चा केली. त्यामुळे नेमकं काय करायचं हे मी विसरुन गेलो. रायपूरच्या या मैदानावर ही पहिलीच वनडे आहे. त्यामुळे खेळपट्टी कशी असेल याबाबत क्युरेटरने आम्हाला सांगितलं आहे. संध्याकाळनंतर दव पडतं. तो मुद्दाही होता. आधीच्या लढतीत आम्ही प्रथम फलंदाजी केली. आज आम्ही गोलंदाजी करत आहोत. आम्हाला हे आव्हान स्वीकारलं आहे”, असं रोहितने सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)