ऑफिसमध्ये रोमान्स करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल ?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images/BBC

फोटो कॅप्शन, अनेक कंपन्यांमध्ये मॅनेजर आणि त्याच्या वा तिच्या हाताखाली काम करणारी व्यक्ती यांच्यातल्या नात्याला परवानगी नसते.
    • Author, प्रतिनिधी
    • Role, टीम बीबीसी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिकेतील 'अ‍ॅस्ट्रोनॉमर' या टेक कंपनीने त्यांच्या सीईओवर कारवाई केली आहे. या सीईओला निलंबित करण्यात आलं आहे.

त्यामागचं कारण आहे ते त्यांच्या सीईओचा एका कॉन्सर्टमधील व्हीडिओ व्हायरल होणं. कोल्डप्ले कॉन्सर्टमधला तो व्हीडिओ तुम्ही पाहिला असेलच.

मॅसॅच्युसेट्समधील जिलेट स्टेडियममध्ये ही कॉन्सर्ट सुरू होती. यामध्ये, कोल्डप्ले कॉन्सर्टमधील किस-कॅमवर एक जोडपं दिसलं आणि ऑफिसमधलं एक अफेअर उघडकीला आलं. त्यानंतर तो व्हीडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला.

मात्र, हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या क्लिपमध्ये झळकलेल्या कंपनीच्या सीईओला राजीनामा द्यावा लागला, शिवाय ती महिला त्याच कंपनीत 'चीफ पीपल ऑफिसर' म्हणजेच एचआर आहे.

पण, यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे ती ऑफिस रोमान्सची, वर्क प्लेस रिलेशनशीपची. म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी समजा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडलात, पुढे तर काय?

ऑफिस किंवा कलिगसोबतच्या रोमँटिक रिलेशनशिपमुळे अनेक उच्चपदस्थांना आपली नोकरी गमवावी लागल्याची उदाहरणे आहेत.

ऑफिसमधील व्यक्तीसोबत कार्यालयाच्या संकुलाबाहेर जरी नातेसंबंध ठेवले तर त्याला कार्यालयातील नातेसंबंधच म्हटले जाते.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, ऑफिसमध्ये कुणावर प्रेम करताय? मग या गोष्टी करू नका, नाहीतर...

बहुतेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या हँडबुकमध्ये किंवा कोड ऑफ कंडक्टमध्ये कामाच्या ठिकाणी तुम्ही कसं वागायला हवं, यासाठीच्या गाईडलाईन्स दिलेल्या असतात.

मग कामाच्या ठिकाणी सूत जुळायला लागलं, नातं खुलायला लागलं तर या काही गोष्टी लक्षात ठेवा.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनी पॉलिसी काय सांगते?

तुम्ही काम करत असलेल्या कंपनीचं याबद्दलचं धोरण काय आहे, ते पाहा. अनेक कंपन्यांची याबद्दल अधिकृत धोरणं असतात.

यामध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी आहे, कोणत्या गोष्टींना नाही, हे सगळं समजायला मदत होते.

म्हणजे उदाहरणार्थ अनेक कंपन्यांमध्ये मॅनेजर आणि त्याच्या वा तिच्या हाताखाली काम करणारी व्यक्ती यांच्यातल्या नात्याला परवानगी नसते.

कारण यामुळे कामाच्या ठिकाणी भेदभाव करणं म्हणजे झुकतं माप दिलं जाणं, यासारख्या गोष्टी होण्याची शक्यता असते.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

काही कंपन्यांच्या धोरणांनुसार एकाच कंपनीत काम करणाऱ्या दोन व्यक्तींनी लग्न केलं तर त्या दोघांनी त्याच कंपनीत काम करण्याची परवानगी नसते. दोघांपैकी एकाला नोकरी सोडावी लागते.

अनेक कंपन्यांना कर्मचाऱ्यांमधल्या नात्यांवर आक्षेप नसतो, पण त्यांना अपेक्षित असतं की कर्मचाऱ्यांनी त्यांच्यातलं असं नातं जाहीर करावं.

अनेकदा दोन्ही कर्मचारी एकाच टीममधले असतील, त्यांच्यातलं प्रोफेशनल नातं हे बॉस - कर्मचारी असेल, तर एचआर या दोघांची टीम वेगवेगळी असेल, याची खात्री करू शकतं.

त्यामुळे तुमच्या कंपनीची याबद्दलची धोरणं काय आहेत, हे तपासून घ्या.

'कामाच्या ठिकाणी प्रोफेशनल रहा'

ऑफिसमध्ये नातेसंबंध असणे ही अतिशय नाजूक बाब असते. त्यामुळे त्याकडे संवेदनशीलतेनी पाहतानाच व्यावसायिक मर्यादांचे उल्लंघन कसे होणार नाही हे पाहणे आवश्यक असते. बीबीसी वर्कलाईफने यासंदर्भात एक लेख लिहिला होता आणि त्यात काही गोष्टी त्यांनी अधोरेखित केल्या होत्या.

  • तुमचं टीममधल्या एका व्यक्तीसोबत खास नातं असलं, तरी कामाच्या ठिकाणी ते मध्ये आणू नका. वैयक्तिक वा खासगी गोष्टींची चर्चा ऑफिसमध्ये करू नका.
  • तुमच्यातलं ऑफिसमधलं नातं प्रोफेशनल राहू द्या आणि जाणते-अजाणतेपणी या नात्यामुळे ऑफिसच्या कामावर परिणाम होणार नाही, कामात भेदभाव होणार नाही, याची काळजी घ्या.
  • सुरू होणारं प्रत्येक नातं कायम टिकतंच असं नाही. त्यामुळे ऑफिसमधल्या डेटिंग करत असलेल्या व्यक्तीसोबत ब्रेक-अप झालं, नातं पुढे जाऊ शकलं नाही, तर मात्र गोष्टी संयमाने - प्रगल्भपणे हाताळा. कारण ब्रेकअप वैयक्तिक आयुष्यात झालेलं असलं तरी ती व्यक्ती त्याच ऑफिसमध्ये असणार आहे. अशावेळी खासगी भावना तुम्ही कामाच्या मध्ये आणणं योग्य नाही किंवा वैयक्तिक आयुष्यात जे झालं आहे त्याचा राग प्रोफेशनल आयुष्यात तुम्ही काढू शकत नाही.
ग्राफिक्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑफिसमध्ये रोमान्समुळे कामाच्या ठिकाणी भेदभाव करणं म्हणजे झुकतं माप दिलं जाणं, यासारख्या गोष्टी होण्याची शक्यता असते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या खासगी नात्यांमधून पिळवणूक होऊ शकते, हे देखील लक्षात ठेवा.

विशेषत: हे नातं एका सीनिअर आणि ज्युनिअरमध्ये निर्माण होत असेल तर त्याचा वापर करून दबाव टाकणं, विशिष्ट कामं करून घेणं वा करायला लावणं, असले प्रकार होऊ शकतात.

म्हणून आपल्यात खरंच नातं आहे की नात्याचा वापर केला जातोय, याचीसुद्धा पडताळणी करा.

जर तुम्हाला एखाद्या अशा नात्यात अडकल्यासारखं वाटतंय तर तुमच्या कंपनीच्या एचआरला विश्वासात घेऊन त्यांच्याशी याविषयी सल्लामसलत करू शकता.

कामाच्या ठिकाणी निर्माण होणारे नातेसंबंध योग्यरीतीनं हाताळणं हे तुमच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तुमच्या करियरसाठी - प्रोफेशनल आयुष्यासाठीही महत्त्वाचं असतं.

कारण कंपनीच्या नियमांचं - धोरणांचं उल्लंघन झालं किंवा तुम्ही केलेल्या गोष्टीमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला, कामाला धोका निर्माण होत असेल, तर तुमची नोकरी तर जाईलच पण ही गोष्ट कायमची तुमच्या सिव्हीवर ही राहील.

बीबीसी वर्कलाईफने कामाच्या ठिकाणी नातेसंबंधाबाबत कोणती नैतिक जबाबदारी पाळायला हवी यासंबंधी लेख लिहिला आहे. तो देखील तुम्ही या ठिकाणी सविस्तर वाचू शकता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.