बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी सत्ताधाऱ्यांसोबत व्यासपीठावर, आयोजक म्हणाले...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रॉक्सी गागडेकर-छारा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
“सामूहिक बलात्कार आणि हत्येसारख्या गंभीर आरोपांमध्ये दोषी सिद्ध झालेल्या व्यक्ती सत्ताधारी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांसोबत व्यासपीठावर बसतात, ते पाहून भीती वाटते.”
गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीत सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या बिल्किस बानो आपली भीती आणि नाराजी व्यक्त करत होत्या.
गेल्या आठवड्यात दाहोदचे खासदार जसवंतसिंह भाभोर यांची एक फेसबूक पोस्ट पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला.
जसवंतसिंह भाभोर हे 25 मार्च रोजी राज्याच्या जयसिंचन विभागाकडून आयोजित एका कार्यक्रमात गेले होते.
या कार्यक्रमात जसवंतसिंह भाभोर यांच्यासोबत व्यासपीठावर त्यांचे भाऊ भाजप आमदार शैलेश भाभोर यांच्यासह बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी शैलेश भट्ट दिसून आले.
व्यासपीठावर पहिल्या ओळीत भट्ट यांना स्थान देण्यात आलेलं होतं.
बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील 14 जणांची हत्या करण्याच्या गुन्ह्यात शैलेश भट्ट यांच्यासह 11 जण दोषी सिद्ध झाले होते.
या सर्वांनी 14 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर गुजरात सरकारने त्यांना गेल्या वर्षी शिक्षेतून माफी दिली. यानंतर सगळे तुरुंगातून मुक्त झाले आहेत.
आता हे सगळे दोषी मुक्त आहेत. पण त्यानंतरचे फोटो पाहून बिल्किस बानो आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत.
स्थानिकांच्या माहितीनुसार, तुरुंगातून सुटल्यानंतर या लोकांना सातत्याने भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि सभांमध्ये पाहिलं गेलं आहे.
हे पहिल्यांदाच घडलं नाही
या प्रकारानंतर बीबीसीने बिल्किस यांचे पती याकूब पटेल यांच्याशी चर्चा केली.
ते सध्या दाहोदमध्ये एका संयुक्त कुटुंबात राहतात. छोटी-मोठी कामे करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “आम्ही सगळे जण मानसिक धक्क्यातच आहोत. हे फोटो पाहिल्यास सरकार दोषींसोबत असल्याचं स्पष्ट होतं. बिल्किस बानो या रमजान महिन्यानिमित्त रोजाचा उपवास करत आहेत. पण फोटो पाहून त्यांची प्रकृती बिघडली आहे.”

फोटो स्रोत, DAHOD DISTRICT INFORMATION DEPARTMENT
याकूब पुढे म्हणतात, “आम्ही दिवसरात्र भीतीच्या सावटाखाली जगत आहोत. आमच्यासोबत कधीही काहीही होऊ शकतं.”
दोषींना मुक्त केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला त्यासंदर्भातील धोरणांबाबत विचारलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER/JASVANTSINH BHABHOR
कोणत्या तरतुदींअंतर्गत बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना सोडलं, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडे केला आहे.
याकूब म्हणाले, “मला आनंद वाटतो की सुप्रीम कोर्टाने आमच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. न्यायपालिकेकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत.”
दोषी भाजपात दाखल झाले आहेत का?
रंधिकपूरच्या स्थानिक नागरिकांच्या मते, बिल्किस बानो प्रकरणातील सर्व 11 दोषी हे कित्येक वर्षांपासून भाजप आणि आरएसएससोबत आहेत. पण त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला का, याविषयी स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.
दाहोदचे भाजप अध्यक्ष शंकर अमलियार म्हणाले, “भट्ट किंवा इतर कुणीही भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी रस दाखवलेला नाही. पक्षाने या कार्यक्रमाला शैलेश भट्ट यांना आमंत्रित केलं नव्हतं. पण ते सर्वसामान्य व्यक्ती म्हणून कार्यक्रमात सहभागी झाले असतील, तर त्यावर आमचं नियंत्रण नाही.”
दाहोदमधील भाजप नेते नरेंद्र सोनी यांनी म्हटलं, “हा लोकांसाठी आयोजित एक सार्वजनिक कार्यक्रम होता. यामध्ये भट्ट यांच्यासोबत अनेक जण सहभागी झाले होते.”

फोटो स्रोत, DAXESH SHAH
पण, भट्ट यांना व्यासपीठावर समोरची खुर्ची कशी मिळाली, या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना याविषयी माहिती नसल्याचं सांगितलं.
यासंदर्भात भाजप खासदार जसवंतसिंह भाभोर आणि आमदार शैलेश भाभोर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न बीबीसीने केला. पण अनेक प्रयत्नांनंतरही दोघांनी याबाबत कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला.
याच घटनेबाबत काही दिवसांपूर्वी शैलेश भाभोर यांनी इंडियन एक्सप्रेसशी चर्चा केली होती. या कार्यक्रमात कोण-कोण सहभागी झाले, याविषयी आपल्याला माहिती नाही, असं ते म्हणाले होते.
पण, बलात्कार प्रकरणातील दोषींना भाजप नेत्यांसोबत पाहिलं गेल्याचं हे पहिलंच प्रकरण नाही.
यापूर्वीही अनेक कार्यक्रमांमध्ये शैलेश भट्ट भाजप नेत्यांसोबत दिसून आले आहेत. 2020 मध्ये तर भट्ट पॅरोलवर बाहेर असतानाही एका कार्यक्रमात दिसले होते, असं याकूब पटेल यांनी सांगितलं.
भट्ट यांना कुणी आमंत्रित केलं?
बीबीसीने भट्ट यांना आमंत्रित करणाऱ्या लोकांविषयी जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या राज्य जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली.
मात्र, पक्ष किंवा सरकार यांपैकी कुणीही त्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
आम्ही कार्यक्रम आयोजित केला, मात्र या कार्यक्रमात पाहुणे म्हणून सहभागी झालेल्या व्यक्तींची माहिती आमच्याकडे नाही, असं दाहोद जलसंधारण विभागाचे उप-इंजिनियर पी. एम. परमार यांनी म्हटलं.
त्यासोबतच दाहोदमधील सिंगवाड गावचे सरपंच लखी वाहोरिया यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही. लखी यांचे चिरंजीव जीवनलाल यांनी बीबीसीशी संवाद साधला. पण भट्ट यांना निमंत्रण दिलं नाही, अशीच भूमिका त्यांनी मांडली.
तज्ज्ञ म्हणतात..
राजकीय तज्ज्ञ घनश्याम शाह यांच्या मते, या माध्यमातून भाजप पक्षामार्फत काही संदेश दिला जात असण्याची शक्यता आहे. आम्ही रक्षकांचा सन्मान करत आहोत, असं त्यांना दर्शवायचं आहे.
या निमित्ताने हिंदुत्ववादी विचारसरणीच्या बाजूनेच भाजप उभा आहे, हे मतदारांवर ठसवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही शाह यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, ani
बिलकिस बानो प्रकरणातील बहुतांश दोषी उच्चवर्णीय आहेत. त्यामुळे राज्याच्या जातीय समीकरणाशीही हे प्रकरण जोडून पाहिलं जात आहे.
राजकीय विश्लेषक विष्णू पांड्या म्हणतात, “या लोकांना कोर्टाने आधीच शिक्षा सुनावलेली होती. 14 वर्षे शिक्षा भोगून ते आता तुरुंगाबाहेर आले आहेत. अशा स्थितीत त्यांनाही सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगण्याचा अधिकारी लोकशाहीत मिळालेला आहे.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























