डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, प्रचारसभेत नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबाराची घटना घडली आहे.पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात ही घटना घडली.
हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ठार केलं असून, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनीही या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.
पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेत भाषण करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला, ट्रम्प गोळीबारानंतर कानाला हात लावत खाली झुकताना दिसले आणि नंतरच काही क्षणातच सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवत, घटनास्थळापासून दूर नेलं.
हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ठार केलं असून, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवलं जात असताना ते उपस्थित लोकांकडे बघून अभिवादन करताना दिसून आले. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या प्रचार यंत्रणेतील लोकांनी दिली आहे.
या सभेत उपस्थित असलेल्या लोकांनी बीबीसीला सांगितलं की सभास्थळापासून जवळ असणाऱ्या एका इमारतीवर एका माणसाला रायफल घेऊन रांगत असताना त्यांनी पाहिलं होतं.
या घटनेनंतर जो व्हिडिओ समोर आला त्यात असं दिसत आहे की गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर ट्रम्प खाली झुकले आणि ते पुन्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्या गालावर रक्त दिसून येत होतं.
सिक्रेट सर्व्हिसने दिलेल्या निवेदनात असं सांगितलं आहे की डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.






