आंध्र प्रदेश स्फोट : अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, काय आहे स्फोटामागचे नेमके कारण?

आंध्र प्रदेश

फोटो स्रोत, UGC

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) परिसरातील एस्सेन्टिया अ‍ॅडव्हान्स सायन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रिअ‍ॅक्टरमधअये स्फोट झाल्यानं इमारतीचा काही भाग कोसळला.

या स्फोटात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलंय.

आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालपुडी अनिथा यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी हा स्फोट झाला.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. स्फोटातील मृतांच्या संख्येबाबत त्यांनीच माहिती दिली.

पवन कल्याण यांच्या माहितीपूर्वी अनाकापल्ली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनीही या दुर्घटनेबाबत माहिती दिली होती.

या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेता, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

आंध्र प्रदेश

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना दुपारच्या वेळेस झाली असून, त्यावेळी अनेक कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ होती. स्फोटानंतर सर्वत्र धुराचं साम्राज्य निर्माण झालं.

स्फोटानंतर इमारतीचा भाग कोसळला. या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी दबले असण्याची भीती व्यक्त केली जातेय.

स्फोटाच्या दुर्घटनेवेळी फॅक्टरीमध्ये 300 हून अधिक लोक हजर होते.

अनाकापल्ली जिल्ह्यात सुमारे 10 हजार एकरांवर विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) पसरलेले आहे. यापैकी तीन हजार एकर जमीन फार्मा कारखान्यांसाठी आहे.

या भागाला अच्युतपुरम फार्मा एसईझेड म्हणतात.

रिअ‍ॅक्टरचा स्फोट नाही

आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालपुडी अनिथा यांनी या अपघाताचं कारण सांगितलं.

गृहमंत्री अनिथा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ""कंपनीमध्ये सॉल्व्हंट्सची गळती होत असते. ही गळती थांबवण्यासाठी टीबीई गॅस फार्म बांधण्यात आला. हा गॅस पाइपलाइनमधून एसीमध्ये जातो आणि वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यापर्यंत पसरतो. याच गॅसजवळ इलेक्ट्रिक स्पार्क झाल्याने हा स्फोट झाला," असं त्यांनी सांगितलं.

 वंगालपुडी अनिथा

फोटो स्रोत, SCREEN GRAB/BBC

फोटो कॅप्शन, आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालपुडी अनिथा

गृहमंत्री म्हणाल्या की, "अनेकांनी रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं म्हटलं आहे. पण फक्त गॅस गळती झाल्यामुळे हा स्फोट झाला आहे. तपासाअंती हे स्पष्ट होईल की, हा अपघात मालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे की खरोखरच हा अपघात आहे."

"या स्फोटामुळे संपूर्ण इमारत कोसळली नाही. इमारतीच्या भिंती आणि छत कोसळलं. मी तिथे जाऊन बघून आले. आता इमारतीचे पिलर्स तिथे तसेच उभे आहेत. काही जणांचा गॅस गळतीमुळे मृत्यू झाला तर काही जण राडारोड्याखाली दबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. बचावपथकं हा राडारोडा हटवण्याचं काम करत आहेत," असंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

अच्युतपुरम दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत टेलिकॉन्फरन्स घेतली. त्यांनी जखमींना दिल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती घेतली.

सर्व विभागांचे डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत. आणि अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

बचावकार्य
फोटो कॅप्शन, बचावकार्य

अपघाताची माहिती समजल्यानंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कारखाने, अग्निशमन विभाग, पेट्रोलियम, स्फोटक सुरक्षा संघटना आणि कामगार विभाग यांच्यासमवेत समन्वय बैठक घेऊन सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले.

सुरक्षा मानके आणि नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही पवन कल्याण यांनी दिल्या आहेत.

अनकापल्ली जिल्ह्यातील विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) सुमारे 10,000 एकरवर आहे, त्यापैकी 3,000 एकर फार्मा SEZ साठी निश्चित करण्यात आलं आहे. ज्या कारखान्यांमध्ये रसायने तयार केली जातात आणि साठवली जातात तेथे आगीच्या दुर्घटना घडतात.

लंच ब्रेक दरम्यान अपघात

एस्सेन्टिया अ‍ॅडवान्स्ड प्रा. लिमिटेड या कंपनीत 381 कामगार दोन शिफ्टमध्ये काम करतात.

दुपारी जेवणाच्या सु्ट्टीदरम्यान कंपनीत मोठा स्फोट झाला. धुराचे लोटही मोठ्या प्रमाणात होते. जखमींना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

स्फोटामुळे कंपनीच्या इमारतीचा एक मजला कोसळल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून जखमींना योग्य उपचाराच्या सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश दिले.

जखमींना बाहेर काढण्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर करण्याच्या सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तर आरोग्य सचिवांना तत्काळ अच्युतपुरम येथे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

ज्या कंपनीत हा स्फोट झाला तिथे रसायने आणि औषधनिर्माणसामुग्रीची निर्मिती केली जाते. ही कंपनी एप्रिल 2019 साली 200 कोटी रुपये गुंतवणूक करून सुरू करण्यात आली होती.

बीबीसी

अग्निशमन दलाची एकच गाडी

स्थानिक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक रुग्णालयात दोन मृतदेह असून आणखी दोन मृतदेह अँब्युलन्सद्वारे नेण्यात आले आहेत

एकच अग्निशामक गाडी

अनाकापल्ली जिल्ह्यातील या सेझ झोनमध्ये बहुतांश औषधनिर्माण कंपन्या आहेत. गतवर्षी येथे एका कंपनीत चार कामगारांचा मृत्यू झाला होता.

या सेझ झोन मध्ये एकून 208 कंपन्या असून केवळ एकच अग्निशामक गाडी आहे. त्यामुळे काल लागलेली ही आग विझविण्यासाठी आजूबाजूच्या अग्निशामक केंद्रांवरून गाड्या पाचारण करण्यात आल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

कायम धोकादायक स्थिती

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अनाकापल्ली जिल्ह्याच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (SEZ)असलेल्या रसायननिर्मिती आणि साठवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये कायम आगीच्या घटना घडत असतात.

गेल्या 10 वर्षात घडलेल्या घटना :

27 डिसेंबर 2014 रोजी माईलान कंपनीत मोठा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला होता.

8 एप्रिल 2019 रोजी एशियन पेंट कंपनीत अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला होता.

14 जानेवारी 2020 रोजी सनवीरा लिमिटेड कंपनीत एका चिमणी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

23 जुलै 2021 रोजी वशिष्ठ फार्मा कंपनीत स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला.

2022 च्या जून आणि ऑगस्टमध्ये झालेल्या विषारी वायूगळतीमुळे 500 पेक्षा अधिक महिला बाधित होऊन आजारी पडल्या होत्या.

22 ऑक्टोबर 2022 रोजी सेंट ग्लोबिन कंपनीत वायू गळती होऊन एकाचा मृत्यू झाला होता.

11 जानेवारी 2023 रोजी जीएमएफसी या औषधनिर्माण कंपनीच्या प्रयोगशाळेत स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला होता.

फेब्रुवारी 2023 मध्ये मिथन फेरोस या औषधनिर्माण कंपनीत झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

जून 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात अभिजीत फेरो या कंपनीत अपघात होऊन एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

30 जून 2023 रोजी साहित्य फार्मा कंपनीत झालेल्या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)