ऋषभ पंतला वाचवणाऱ्या बस ड्रायव्हरवर कौतुकाचा वर्षाव

फोटो स्रोत, ANI
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1.ऋषभ पंतला वाचवणाऱ्या बस चालकाचा पानिपत डेपोकडून सत्कार
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला भीषण अपघातामधून वाचवणाऱ्या हरियाणा परिवहन महामंडळाच्या बस चालक आणि वाहकाचा पानिपत डेपोकडून सत्कार करण्यात आला आहे.
सुशील मान आणि परमजीत सिंग अशी या दोघांनी नावे आहेत. दोघांनी पहाटे ऋषभ पंतला अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढत इतर लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
सुशील मान म्हणाला, "मी क्रिकेट पाहत नाही आणि मला माहित नव्हते की हा ऋषभ पंत आहे. पण माझ्या बसमधील इतरांनी त्याला ओळखलं.
"ऋषभला काढून टाकल्यानंतर आणखी कोणी आहे की नाही हे तपासण्यासाठी मी पटकन कारची झडती घेतली. मी कारमधून त्याची निळी बॅग आणि 7 ते 8 हजार रुपये काढले आणि त्याला अॅम्ब्युलन्समध्ये नेऊन दिले."
2. आम्ही त्यांच्या पिताश्रींना घाबरलो नाही मग त्यांना घाबरण्याचा काय विषय?- फडणवीस
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान 32 वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरलं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
“एका 32 वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. त्यामुळे बदनामीचे प्रयत्न होत आहेत. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्री ज्या प्रकरणात सापडले आहेत, त्यावरून आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जात नाही. राज्यपाल आणि घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. 32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं,” असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
आदित्य ठाकरेंच्या या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“आम्ही त्यांच्या पुज्य पिताश्रींना घाबरलो नाही. मग, त्यांना घाबरण्याचा काय विषय आहे. त्यांच्या नाकाखालून 50 लोकं निघून आले, ते काहीच करु शकले नाहीत. तेव्हा सांगत होते, मुंबई पेटणार, मुंबईला आग लागणार. आग सोडा माचीसची काडी सुद्धा जळली नाही. कारण, लोकांना पटलं होतं, ह्यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. एकनाथ शिंदे करत आहेत, ते बरोबर आहे. त्यामुळे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
3.एक जानेवारीपासून या देशांमधून येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य
1 जानेवारीपासून, चीन, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपान येथून येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या कोविड-19 इतिहासासह स्वयं-घोषणापत्रासह RT-PCR नकारात्मक अहवाल अनिवार्यपणे अपलोड करावा लागेल.
यासोबतच त्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून सरकारी संस्था जेव्हा गरज असेल तेव्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करू शकतील, अशा सूचना नागरी उड्डायन मंत्रालयानं विमान कंपन्यांना पत्र लिहून दिल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
प्रवाशांनी कोव्हिड डिक्लेरेशन फॉर्म सादर केल्याशिवाय बोर्डिंग पास केले जाणार नाही याची खात्री करावी, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.
4.चंद्रपूर, गडचिरोलीच्या जंगलात वाढलेले वाघ इतर राज्यांना देणार- मुनगंटीवार
विदर्भातील काही जिल्ह्यांत वाघांनी धुमाकूळ घालत माणसावर हल्ले सुरू केले आहेत. यात काही जणांचे बळीही गेले आहेत. दुसरीकडे वाघांची संख्याही वाढत चालली आहे.
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वाघांची संख्या खूप वाढत आहे. त्यावर काय उपाय? या प्रश्नावर दिव्य मराठीशी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात राज्यांतून वाघ मिळतील का, अशी विचारणा होत आहे. चंद्रपूर, गडचिरोलीत वाढलेले वाघ त्यांना देणार आहे. केंद्राकडून पाच वाघांच्या स्थलांतरणाची परवानगी घेतली आहे. शहरालगतचे वाघ जेरबंद करून दाट जंगलात सोडायचे किंवा वाघांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी द्यायचे असा प्रयोग करीत आहोत.
"नैसर्गिक अधिवासातील वाघांना इतर नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. केंद्राशी चर्चा करून सविस्तर आराखडा तयार करायचा आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
5.2014 पासून सरकारने गंगा स्वच्छतेवर 13,000 कोटी रुपये खर्च
केंद्र सरकारने 2014 पासून गंगा स्वच्छ करण्यासाठी 13,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.
सर्वाधिक खर्च उत्तर प्रदेश राज्याने प्राप्त करत आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) ने शुक्रवारी राष्ट्रीय गंगा परिषदेला माहिती दिली आहे.
इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























