अमेरिकेतील सिएटलमध्ये गोळीबार; 2 जणांचा मृत्यू, तर अनेक जखमी

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिकेतील सिएटल शहरात गोळीबाराची घटना घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ही घटना सिएटलमधील प्रसिद्ध स्थळ असलेल्या स्पेस नीडलजवळच्या सिएटल सेंटरमध्ये घडली.

सिएटल अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सिएटल सेंटरमध्ये झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला असून किमान 5 जण जखमी झाले आहेत.

दोन्ही पीडितांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जखमींमध्ये 2 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका 56 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

आणखी एका पीडिताला किरकोळ दुखापत झाली असून त्याने रुग्णालयात जाण्यास नकार दिला आहे. अग्निशमन दलाने अद्याप इतर पीडितांच्या दुखापतींविषयी कोणतीही अतिरिक्त माहिती जाहीर केलेली नाही.

सिएटल सेंटर येथे 'द बाईट ऑफ सिएटल फूड फेस्टिव्हल' आयोजित करण्यात आला होता. या वार्षिक कार्यक्रमात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि 'लाईव्ह म्युझिक' कार्यक्रमांचा समावेश असतो. या फेस्टिव्हलला लाखो लोक उपस्थित राहतात.

सिएटल सेंटर गोळीबार प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सिएटलच्या महापौर केटी विल्सन यांनी दिली.

"घटनास्थळावरून 2 संशयितांना ताब्यात घेणाऱ्या सिएटल पोलीस अधिकाऱ्यांचे मी आभार मानू इच्छिते," असे केटी विल्सन यांनी आपल्या निवेदनात म्हटले.

मात्र, या वेळी संशयितांच्या ओळखीबाबत कोणतीही अतिरिक्त माहिती देण्यात आलेली नाही.

महापौर विल्सन यांनी या घटनेला "भयानक हिंसेचे कृत्य" म्हटले.

"बाधित कुटुंबे त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहेत आणि संस्कृती, नातेसंबंध आणि आनंद साजरा करण्यासाठी आयोजित केलेला एक कार्यक्रम अखेरीस गोळीबारात कसा बदलला, हे संपूर्ण समाज समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

त्या पुढे म्हणाले, "आमच्या संवेदना त्या लोकांसोबत आहेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, जे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत आणि जी कुटुंबे त्यांच्या पाठीशी उभी आहेत."

"सिएटल तुमच्या दुःखात तुमच्यासोबत आहे आणि पुढील कठीण दिवसांमध्येही तुमच्या पाठीशी उभे राहील," असंही त्यांनी नमूद केलं.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

द सिएटल टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी रविवारी (26 जुलै) स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार 27 जुलैला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास) अनेक गोळीबारांचे आवाज ऐकल्याचे सांगितले. एका उपस्थिताने त्या घटनेचं वर्णन "पूर्णपणे गोंधळाचे" असे केले.

इतर प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्यांनी अनेक गोळीबाराचे आवाज ऐकले.

"सुरुवातीला मला वाटलं की ते फटाके आहेत आणि मग सगळे आमच्या बाजूने धावत जाऊ लागले," असे स्थानिक रहिवासी निक बेट यांनी किरो टीव्हीला सांगितले.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ती बागेतून धावत गेली आणि लपण्यासाठी खाली वाकली.

आणखी एक प्रत्यक्षदर्शी लिन कोल्स म्हणाल्या, "सगळेच धावू लागले, म्हणून आम्हीही धावू लागलो. आम्ही गर्दीसोबत धावत राहायचं ठरवलं. आपण कुठे आहोत हे पाहण्यासाठी मी स्पेस नीडलकडे वर बघत होते. ते खरंच खूप भीतीदायक होतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)