राहुल गांधींची RSS वर टीका, 'हल्लीचे कौरव हाफ पँट घालतात नि शाखेत जातात' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook/Rahul Gandhi
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा...
1. आधुनिक काळातले कौरव हाफपँट घालतात - राहुल गांधी
"21 व्या शतकातले कौरव कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? 21 व्या शतकातले कौरव हाफ पँट घालतात आणि शाखेत उपस्थिती लावतात. त्यांच्या हातात लाठी असते. त्यांच्या बाजूने देशातले दोन ते तीन अब्जाधीश या कौरवांच्या बाजूने आहेत," असं म्हणत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल बोलत होते. यात्रा सध्या हरियाणात आहे, तिथे राहुल बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
"संघाच्या लोकांची घोषणा तुम्ही ऐका ते कधीही हर हर महादेव म्हणत नाहीत. कारण भगवान शंकर हे तपस्वी होते. मात्र हे लोक भारताच्या तपस्येवर हल्ला करत आहेत. त्यांनी जय सीताराम या घोषणेतून सीता मातेला एकदम शिताफीने वगळलं. त्यांनी जय श्रीराम ची घोषणा देऊन दहशत पसरवली. हे लोक भारताच्या संस्कृतीच्या विरोधात काम करत आहेत", असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
2. शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

फोटो स्रोत, SHIVSENA
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाची आज, 10 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगात परीक्षा पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आज सुनावणी होणार आहे. निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दोनही गटापैकी कोणाला मिळणार या संदर्भात पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे.
महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुवाहाटीला गेलेल्या 16 आमदारांना तुमच्यावर कारवाई का करू नये? याबाबत 48 तासात उत्तर द्यायची नोटीस पाठवली होती.
या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले. संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोराने आणि चिमणराव पाटील या 16 आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आला असल्यामुळे ते आम्हाला अशी नोटीस पाठवू शकत नाहीत, असा दावा शिंदे गटातल्या आमदारांनी केला, यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. या प्रकरणी आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.
3. धर्मांतराला राजकीय रंग देऊ नका, न्यायालयाने सुनावले

फोटो स्रोत, Getty Images
धर्मातर ही ‘गंभीर समस्या’ असून तिला राजकीय रंग देऊ नका, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केली. त्याचबरोबर बळजबरीने होणारे धर्मातर रोखण्यासाठी राज्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने महान्यायवादी आर. व्यंकटरमणी यांच्याकडून मदतीची अपेक्षाही केली. 'द हिंदू'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
‘‘धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि धर्मातराचा अधिकार यात फरक आहे’’, असे न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने नमूद केले.
धमकावणे, भेटवस्तूंचे प्रलोभन आणि पैशांचे आमिष इत्यादी मार्गानी धर्मातर करण्याच्या प्रकारांना प्रतिबंध करण्याची आग्रही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या संदर्भात महान्यायवादी व्यंकटरमण यांनी न्यायालयाला न्यायमित्र (अॅमिकस क्युरी) म्हणून मदत करावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
फसवणुकीतून होणाऱ्या धर्मातरावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्यांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका भाजपचे नेते अॅड. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केली आहे. त्यावर खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने 23 सप्टेंबरला या याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते.
सक्तीचे धर्मातर राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकते आणि नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यात बाधा आणू शकते, अशी चिंता सर्वोच्च न्यायालयाने या आधीच्या सुनावणीत व्यक्त केली होती. त्याचबरोबर ही ‘‘अत्यंत गंभीर’’ समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असेही खंडपीठाने म्हटले होते. फसवणूक, आमिष आणि धमकावून धर्मातर करणे थांबवले नाही तर अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवेल, असा इशाराही न्यायालयाने दिला होता.
4. औरंगाबादच्या दोन विद्यार्थ्यांचा काशीद येथे बुडून मृत्यू
सहलीसाठी रायगडमधील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या औरंगाबादचे दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. चार विद्यार्थी समुद्रात बुडाले, यापैकी दोघांना वाचवण्यात यश आलं असून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल काशीद इथे आली होती. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
काशिद समुद्र किनाऱ्यावर पाण्यात उतरुन विद्यार्थी आनंद घेत होते. त्यापैकी काही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळं ते पाण्यात बुडाले. ही बाब समोर येताच खळबळ उडाली होती. स्थानिक बचाव पथकांनी प्रयत्न केल्यानं दोन जणांना वाचवण्यात आलं आहे. कृष्णा पाटील आणि कृष्णा वाघ यांना वाचविण्यात यश आले आहे. प्रणय कदम आणि रोहन संतोष बेडवाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.
5. मी भजन म्हटलं तरी लोक मला ट्रोल करतील - अमृता फडणवीस

फोटो स्रोत, FACEBOOK/AMRUTA FADANVIS
मी भजन गायले तरी लोक मला ट्रोल करतील असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. पती देवेंद्र फडणवीस यांना हे गाणं आवडल्याचंही त्यांनी सांगितलं.
अमृता फडणवीसांचं 'मूड बन लिया' हे गाणं रिलीज झालं होतं.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, "मला खूप आनंद होतोय. लोकांना गाणं आवडलं, स्वीकारलं त्याचे रिल्स होत आहेत. माझा विश्वास आहे. कोणीही काही बोलले तरी काम करत राहिले. ट्रोल होण्याची सवय झाली मला, त्याने मला फरक पडत नाही."
'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























