श्रद्धा वालकर : 'तिच्या शरीराचा एक जरी भाग दिला तरी अंत्यसंस्कार करू' वर्षभरात नेमकं काय काय घडलं?

फोटो स्रोत, ANI
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, मुंबई
- Published
“पोलीस दोन महिन्यांपासून सांगत आहेत की हत्या प्रकरणाचा तपास आणि प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे पण अंतिम टप्प्यात म्हणजे किती महिने लागणार आहेत? अजून निकाल का लागला नाही? न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात जबाब अधिक असल्याने वेळ लागतोय पण एकूणच सगळं धीम्या गतीने सुरू आहे असं मला वाटतं.”
श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच श्रद्धा वालकर हत्याकांड उघडकीस आलं होतं. ज्या पद्धतीनं श्रद्धाची हत्या झाली त्याने संपूर्ण देश हादरून गेला होता.
या प्रकरणाला या महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं. परंतु अद्यापही अंत्यसंस्कार करता न आल्याने वालकर कुटुंबियांंनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच वर्षभरानंतरही मुख्य आरोपीला शिक्षा सुनावली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“तिच्या मृतदेहाचा एक तरी तुकटा मिळाला तरी अंत्यसंस्कार करता आले असते,” असं विकास वालकर यांनी म्हटलं आहे.
वर्षभरात बराच तपास आणि न्यायालयीन सुनावण्या पार पडल्या. परंतु तपास पूर्ण व्हायला आणखी किती काळ लागणार? असा प्रश्न श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी उपस्थित केला आहे.
श्रद्धा वालकर 27 वर्षांची होती. ती मुंबईहून दिल्ली येथे आपला लीव्ह-इन पार्टनर अफताब पुनावाला याच्यासोबत राहण्यासाठी गेली.
18 मे 2022 रोजी श्रद्धाची हत्या करण्यात आली. परंतु ही बाब उघड व्हायला सहा महिने लागले आणि नोव्हेंबर महिन्यात श्रद्धाची क्रूर पद्धतीने हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. आजही या प्रकरणाचा खटला सुरू आहे.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा लीव्ह-इन पार्टनर अफताब पुनावाला याला अटक करून आरोपपत्र दाखल केलं आहे.
परंतु खटल्याला एक वर्ष पूर्ण झालं तरी तपास कधी पूर्ण होणार याबाबत काही अंदाज येत नसल्याचं म्हणत विकास वालकर यांनी याबबात नाराजी व्यक्त केली आहे.
श्रद्धाचे वडील विकास वालकर नेमकं काय म्हणाले? आणि आतापर्यंत या प्रकरणात काय-काय घडलं? जाणून घेऊया,
‘...तर आम्हाला अंत्यसंस्कार तरी करता आले असते’
बीबीसी मराठीशी बोलताना विकास वालकर यांनी या खटल्याचा तपास धीम्या गतीने सुरू असल्याचं म्हणत खंत व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, ANI
ते म्हणाले, “न्यायालयीन ट्रायल सुरू आहे पण अद्याप निकाल का लागला नाही असा प्रश्न आहे. या प्रकरणात जबाब अधिक असल्याने वेळ लागतोय पण प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे असं मला वाटतं.
गेल्या दोन महिन्यापासून पोलीस मला सांगत आहेत की, तपास अंतिम टप्प्यात आहे पण अंतिम टप्प्यात म्हणजे किती महिने लागणार अजून, निकाल का लागला नाही असा माझा प्रश्न आहे.”
“ऑक्टोबर महिन्यात निकाल लागेल असं मला सांगितलं होतं मग अजून का लागला नाही. आता आम्हाला सांगितलं जात आहे की, डिसेंबरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.
पण मला अंदाज येत नाही नेमकं काय करावं. किती जबाब बाकी आहेत किंवा काय बाकी आहे मला काहीच कल्पना नाही,” असंही ते म्हणाले.
या प्रकरणात विकास वालकर यांचीही साक्ष नोंदवण्यात आली आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात त्यांनी न्यायालयात साक्ष दिल्याचं सांगितलं.

विकास वालकर पुढे म्हणाले, “जबाब नोंदवल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच मी दिल्लीला जाऊन आलो. माझी मागणी होती की, अंत्यसंस्कार करण्यासाठी मला किमान मृतदेहाचा एक तरी तुकडा द्यावा.
अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाचा एक तुकडा दिला तरी मी अंत्यसंस्कार करू शकेन. परंतु त्यासाठी पोलीस आणि न्यायालयाने परवानगी नाकारली. निकाल लागत नाही तोपर्यंत मला थांबवं लागणार आहे.
त्यांच्याकडे मृतदेहाचे 13 पार्ट्स आहेत. एक जरी मला मिळाला असता तर बाकीचे पार्ट्स तुम्ही ट्रायलसाठी तुमच्याकडे ठेऊ शकता, असं माझं म्हणणं होतं पण त्यांनी ऐकलं नाही.”
श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष ‘केस प्रॉपर्टी’ असल्यानं खटला पूर्ण होईपर्यंत कुटुंबीयांकडे सोपवले जाऊ शकत नाहीत, असंही विकास वालकर यांना सांगण्यात आलं.
आतापर्यंतचा घटनाक्रम
- 8 ते 20 मे 2022 - श्रद्धा वालकरची दिल्लीत राहत्या घरी हत्या करण्यात आली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे 20 हून अधिक तुकडे करण्यात आले. यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शरिराचे तुकडे दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी पुरण्यात आले.
- 22 ऑक्टोबर 2022 – श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार वसई येथे नोंदवली. यानंतर हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आलं.
- 10 नोव्हेंबर 2022 – काही महिन्यांपासून बेपत्ता असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या फोनचं लोकेशन दिल्ली असल्याचं स्पष्ट झालं.
- 14 नोव्हेंबर 2022 – श्रद्धा वालकरच्या खुनाच्या आरोपात अफताब पुनावाला याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं.

- 20 नोव्हेंबर 2022 – श्रद्धाच्या मृतदेहाचे काही भाग पोलिसांना दिल्लीतील छत्तरपूर जवळील जंगलात आढळले.
- 9 डिसेंबर 2022 – श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेत अफताबला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
- 4 जानेवारी 2023 – वालकर कुटुंबियांशी श्रद्धा वालकरच्या हाडांची डीएनए चाचणी करण्यात आली. श्रद्धा वालकरच्याच मृतदेहाचे तुकडे असल्याचं यामुळे स्पष्ट झालं.
- 24 जानेवारी 2023 – दिल्ली पोलिसांनी 6 हजार 629 पानांचं आरोपपत्र न्यायालयात सादर केलं.
- 9 मे 2023 – दिल्ली न्यायालयाने मुख्य आरोपी अफताब पुनावाला विरोधात हत्येचा आरोप निश्चित केला.

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण
18 मे 2022 रोजी श्रद्धा वालकरची दिल्लीतील छत्तरपूर येथील तिच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली. तिचा लिव्ह-इन पार्टनर असलेल्या आफताब पुनावाला याच्याविरोधात खुनाचा गुन्हा निश्चित करण्यात आला आहे.
श्रद्धाशी कुठलाही संपर्क होत नसल्याने विकास वालकर यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात श्रद्धाची हत्या झाल्याचं उघड झालं.

फोटो स्रोत, ANI
या प्रकरणात पोलिसांचं म्हणणं आहे की, पुरावे आणि आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच अफताब पुनावाला याच्यावर हत्येच्या गुन्ह्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.
प्रकरण न्यायप्रविष्ठ असून प्रकरणाशी संबंधित शस्त्र, हाडे आणि इतर पुरावे जप्त केले आहेत.
दिल्ली पोलिसांनी अफताबला अटक केल्यानंतर प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याला दिल्लीच्या मेहरोली जंगलात नेण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांच्या मते, आफताबने श्रद्धाच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
पोलिसांनी आरोपपत्रात काय म्हटलं आहे?
दिल्ली उच्च न्यायालयात हा खटला सुरू असून न्यायालयाने अफताब पुनावाला विरोधात खुनाचे आरोप निश्चित केले आहेत.
दिल्ली पोलिसांनी 24 जानेवारी 2023 रोजी श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी न्यायालयात आफताब अमिन पुनावालाविरोधात 6 हजार 629 पानी आरोपपत्र दाखल केलं होतं.
आरोपपत्रानुसार, 18 मे 2022 रोजी आफताब पुनावालानं श्रद्धा वालकरची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 17 तुकडे केले. ते तुकडे फ्रीज आणि कपाटात लपवून ठेवले.
श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला हे लिव्ह-इन पार्टनर म्हणून दिल्लीत राहत होते. आधी चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
श्रद्धाचा मृतदेह जाळून राखेची विल्हेवाट लावली आणि तिच्या हाडांची भुकटी करून ती फेकून दिली, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केल्याचे कबूल केले, असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ज्या ठिकाणी टाकले, त्या ठिकाणी पोलिसांनी आफताब पुनावालाला 15 नोव्हेंबर 2023 रोजी नेलं होतं.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब आणि श्रद्धा वालकर मुंबईत काम करताना एकमेकांच्या जवळ आले होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं.

फोटो स्रोत, ANI
श्रद्धाचे कुटुंबिय मुंबईलगतच्या वसई येथे राहणारे आहेत. कुटुंबियांच्या नाराजीमुळे ते दोघेही दिल्लीत आले आणि छत्तरपूर भागात घर भाड्याने घेऊन राहायला लागले, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी सांगितलं की, मुलीने जेव्हा आफताबला लग्नासाठी आग्रह करायला सुरूवात केली, तेव्हा दोघांमध्ये वाद व्हायला लागले.
18 मे 2022 रोजीही त्या दोघांमध्ये लग्नावरूनच भांडण सुरु झालं आणि चिडलेल्या आफताबने गळा दाबून तिची हत्या केली.
दिल्लीचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त (दक्षिण) अंकित चौहान यांनी माहिती दिली होती की,
“प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचं आफताबने कबूल केलं आहे. मृतदेहामधून दुर्गंध येऊ नये म्हणून त्यानं एका मोठ्या आकाराचा फ्रीज खरेदी केला आणि त्यात ते तुकडे ठेवले.
रात्रीच्या वेळी तो थोडे थोडे तुकडे घेऊन जायचा आणि वेगवेगळ्या भागात जंगलामध्ये टाकून द्यायचा.”
हत्येनंतर तपास कसा सुरू झाला?
हत्या केल्यानंतर आफताबने श्रद्धाचा फोन फेकून दिला होता. पोलिसांनी त्या फोनचा तपास सुरू केला. मे महिन्यात श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब जूनपर्यंत तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होता जेणेकरून लोकांना वाटेल की ती अद्याप जिवंत आहे.
खून करण्यासाठी त्याने इंटरनेटवरून रसायनं मागवली होती, असंही त्यावेळी पोलिसांनी सांगितलं होतं.
आफताब ने 18 दिवस तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि एकेक तुकडा तो जंगलात फेकत राहिला. हत्या करण्याच्या आधी त्याने डेक्स्टर ही वेबसिरीज पाहिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्या होत्या.
श्रद्धा आणि आफताब एका डेटिंग अपच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते. 2018 मध्ये श्रद्धा एका कॉल सेंटर मध्ये नोकरी करत होती.
श्रद्धा तिच्या आईबरोबर रहायची. तिचे वडील वेगळे राहत होते. 2019 मध्ये श्रद्धाने तिच्या आईला आफताब बद्दल सांगितलं आणि त्याच्याबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मात्र धर्म वेगळा असल्याने आईने या प्रस्तावाला नकार दिला होता. श्रद्धा नाराज होऊन घर सोडून गेली आणि आफताबसोबत राहू लागली.
काही दिवसानंतर श्रद्धाने तिच्या आईला सांगितलं की आफताब तिच्याबरोबर मारहाण करतो. काही काळाने श्रद्धाच्या आईचं निधन झालं. तेव्हा श्रद्धाने ही सगळी हकिकत वडिलांना सांगितली. त्यांची भेट घेतली आणि आफताब बद्दल सांगितलं.
दोन महिने श्रद्धाशी काहीच संपर्क झाला नाही तेव्हा श्रद्धाच्या मित्राने ही माहिती तिच्या भावाला दिली.
त्यानंतर पोलिसांनी श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली. मुंबई पोलिसांच्या तपासात तिच्या फोनचं शेवटचं लोकेशन दिल्लीच्या मेहरोली भागात मिळालं होतं.
हे ही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























