अफगाणिस्तान : प्रत्येक दुसऱ्या मुलीच्या मनात आत्महत्येचा विचार येतोय

योगिता लिमये
    • Author, योगिता लिमये
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, अफगाणिस्तान
  • Published

“माझा आवाज तुम्ही ऐकायला हवा. मला प्रचंड वेदना होताहेत आणि त्या सहन करणारी मी एकटी नाही,” अफगाण विद्यापीठातली एक विद्यार्थिनी तिचे अश्रू आवरत मला सांगत होती.

“माझ्या वर्गातल्या बहुतांश मुलींना आत्महत्येचे विचार येतात. आम्हाला सगळ्यांना नैराश्य आलं आहे. आमची सगळी आशा मावळली आहे.”

विशीतल्या या मुलीने चार महिन्यापूर्वी स्वत:चं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञ उपचार करत आहेत.

तिचे शब्द अफगाणिस्तानातील एका मोठ्या आरोग्य संकटाची ग्वाही देतात.

“अफगाणिस्तानात आत्महत्येच्या विचारांची साथ आली आहे. परिस्थिती अतिशय भीषण आहे आणि कोणीच त्याबद्दल फारसं बोलायला तयार नाही.” असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमल सांगतात.

“तुम्ही भूकबळींच्या बातम्या वाचता, पण मानसिक आरोग्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. हे म्हणजे लोकांना हळूहळू विष दिल्यासारखं आहे. दिवसेंदिवस आम्ही आशा सोडून देत आहोत.”

स्त्रियांना आणि मुलींना विद्यापीठात प्रवेशबंदी केल्यानंतर दोन दिवसात 170 फोन आल्याचं त्या सांगतात.

आता त्यांना रोज दहा तरी फोन येतात. त्यांच्याकडे येणारे बहुतांश फोन तरुण स्त्रिया आणि मुलींचे असतात.

अफगाणिस्तानात गेल्या चाळीस वर्षांत युद्धाने पोखरलं आहे. तिथला समाज पितृसत्ताक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते तिथल्या प्रत्येक दुसऱ्या स्त्रीला मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला त्याच्या आधीपासून ही परिस्थिती आहे.

पण तज्ज्ञांच्या मते तालिबानने स्त्रियांना विद्यापीठात जाण्याची बंदी घातल्यापासून परिस्थिती आणखी चिघळली आहे.

लोकांना आत्महत्येबद्दल बोलायला लावणं अतिशय कठीण आहे. मात्र सहा कुटुंब त्यांची व्यथा सांगायला तयार झाली.

नादीर त्यांच्यापैकी एक आहे. त्यांनी सांगितलं की मार्च महिन्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या मुलीने तिचं आयुष्य संपवलं.

“त्या दिवसापर्यंत तिला असं वाटत होतं की त्यांच्यासाठी शाळा उघडतील. तिला विश्वास होता. पण असं काही झालं नाही. तिला हे सहन झालं नाही आणि तिने जीव दिला.” ते सांगतात.

“तिला शाळा आवडायची. तिला शिकून देशाची सेवा करायची होती. जेव्हा शाळा बंद झाल्या तेव्हा ती अतिशय अस्वस्थ झाली आणि ती सतत रडायची.”

नादीर यांना हे सगळं सांगतानाही फार वेदना होत होत्या.

“आमचं आयुष्य उद्धवस्त झालं आहे. आता मला काहीच चांगलं वाटत नाही. माझी बायको अतिशय अस्वस्थ असते. ज्या घरात आमच्या मुलीने जीव दिला त्या घरात तिला राहवत नाही.”

या लेखासाठी आम्ही ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांचा आम्ही मानसोपचारतज्ज्ञांशी संपर्क साधून दिला.

अफगाणिस्तान
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

विशीत असलेल्या एका मुलीच्या वडिलांशी आम्ही बोललो. मुलीचा जीव जाण्यासाठी ते स्वत: जबाबदार असल्याचं ते सांगतात.

“तिला डॉक्टर व्हायचं होतं. जेव्हा शाळा बंद झाल्या तेव्हा ती प्रचंड अस्वस्थ आणि निराश झाली.” ते सांगतात.

“जेव्हा तिला विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेला बसू दिलं नाही तेव्हा तिच्या अपेक्षा मावळल्या. हे कधीही न भरून येणारं नुकसान आहे.” हे बोलता बोलता ते अचानक थांबले आणि रडू लागले.

यांच्यासारख्याच इतर मुलींच्या कथा आहेत. स्त्रिया आणि लहान मुलींना त्यांच्या आयुष्याचं काय करावं ते कळत नव्हतं. त्यांचं भविष्य अधांतरी झालं होतं.

आम्ही मेहर नावाच्या एका शिक्षिकेला भेटलो. तिने तिचं आयुष्य संपवण्याचा दोनदा प्रयत्न केला.

“तालिबानने महिलांसाठी विद्यापीठ बंद केलं. त्यामुळे माझी नोकरी गेली. मी माझ्या कुटुंबात एकटी कमावणारी होती. आता मला घर चालवणं कठीण झालं आहे. त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला.” त्या सांगतात.

“मला घरी बसायला भाग पाडलं त्यामुळे लग्न करण्याचा दबाव वाढू लागला. भविष्यसाठी केलेले सगळे प्लॅन्स बारगळले. मला काहीच कळत नाही. माझ्या आयुष्यात काही उद्दिष्टं राहिलेली नाहीत. म्हणून मी जीव देण्याचा प्रयत्न केला.” त्या पुढे सांगतात.

तिथल्या वर्तमानपत्रात आम्ही आत्महत्येच्या अनेक बातम्या वाचल्या म्हणून आम्ही या मुद्द्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

“ही परिस्थिती अतिशय भीषण आहे. मात्र आम्हाला आत्महत्येशी निगडीत नोंदी करण्यास मनाई आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या नाही असा विरळाच असेल.” असं अफगाणिस्तानातल्या सरकारी रुग्णालयात काम करणारे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.शान यांनी सांगितलं.

हेरत भागात असलेल्या संस्थेने मार्च महिन्यात एक अहवाल सादर केला. दोन तृतीयांश अफगाण लोकांना नैराश्य आल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानतील वाढत्या मानसिक आरोगाच्या समस्या आणि आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणाबद्दल संयुक्त राष्ट्रांनीसुद्धा इशारा दिला आहे.

आत्महत्येची आकडेवारी नोंदवत नसल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. तसंच वाढत्या आकडेवारीबद्दलही ते प्रतिक्रिया देत नाही कारण आत्महत्या हा एक प्रकारचा कलंक आहे असं अनेकांना वाटतं. त्यामुळे अनेक कुटुंबं आत्महत्येची माहिती देत नाही.

“शिक्षणाशिवाय आणि कोणतंही भविष्य नसताना घरात बसणं मला विचित्र वाटतं. इतर कोणत्याच गोष्टीत मला रस वाटत नाही. मला कशाचंच काही वाटेनासं झालं आहे.” एक टीनएजर मुलगी आम्हाला सांगत होती. हे सांगता सांगता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले.

“याच्यापेक्षा वाईट काहीच होऊ शकत नाही म्हणून मी आता बोलते आहे. मी बोलले तर काहीतरी बदल होईल असं मला वाटतं. तालिबान आता कायमच सत्तेत राहणार असतील तर त्यांना अधिकृत ओळख मिळवून द्यावी म्हणजे ते किमान शाळा तरी सुरू करतील.” ती पुढे सांगते.

अफगाणिस्तान

मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अमल म्हणतात स्त्रियांची परिस्थिती बिकट असली तरी पुरुषांची परिस्थिती तितकीशी चांगली नाही.

“अफगाणिस्तानात पुरुष म्हणून जन्माला आलं म्हणजे तुम्ही शक्तिशालीच असायलाच हवे. सध्या अफगाणिस्तानात माणसं त्यांचा आवाज उठवू शकत नाही. ” त्या सांगतात.

“दुर्दैवाने जेव्हा पुरुषांना आत्महत्येचे विचार येतात तेव्हा ते यशस्वी होण्याची शक्यता जास्त असतात कारण त्यांचं नियोजन त्या प्रकारचं असतं.” असं त्या पुढे सांगतात.

अशा परिस्थितीत त्या त्यांच्या रुग्णांना काय सल्ला देतात असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला.

“इतरांना किंवा स्वत:ला मदत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एकटे राहू नका. तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींशी जाऊन बोलू शकता. तुमच्या शेजाऱ्यांशी बोला, तुमच्या पाठीशी उभे राहतील असे लोक जमवा, तुमचे आई वडील, मित्र मैत्रिणी, कोणीही.” त्या म्हणतात.

“मी त्यांना विचारते की तुमचा आदर्श कोण आहे. उदा. नेल्सन मंडेला असतील तर त्यांनी 26 वर्षं तुरुंगात काढली आहेत. पण त्यांच्या मुल्यांमुळे ते तरले, आणि पुढे लोककल्याणाचं काम त्यांनी केलं. अशा पद्धतीने मी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)