लिओ वराडकर यांचा आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा, वराडकरांचे 'महाराष्ट्र कनेक्शन' काय आहे?

लिओ वराडकर

फोटो स्रोत, LEON NEAL/GETTY IMAGES

Published

भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांनी आयर्लंडच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची ओळख करुन देणारा हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

लिओ वराडकर हे मूळचे सिंधुदुर्गातल्या मालवण येथील वराड गावचे आहेत. जून 2017 मध्ये त्यांना पहिल्यांदा आयर्लंडचं पंतप्रधानपद मिळालं होतं. त्यानंतर ते 30 महिने सत्तेत नव्हते. त्यानंतर ते पुन्हा एकदा पंतप्रधान झाले होते. आता त्यांनी राजीनामा दिला आहे.

मग 2020 साली झालेल्या निवडणुकीनंतर वराडकर यांच्या फाईन गेल पक्षानं फिएना फेल आणि ग्रीन पार्टी या पक्षांसह आघाडी सरकार स्थापन केलं होतं. आघाडीच्या अटींनुसार दोन पक्षांनी पंतप्रधानपद वाटून घेतलं होतं. त्यानुसार फिएना फेल पक्षाचे मीहॉल मार्टिन यांची 16 डिसेंबर 2022 पर्यंत पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती.

त्यावेळी उपपंतप्रधानपद लिओ वराडकरांकडे होतं आणि शनिवारी म्हणजे 17 डिसेंबर 2022 ला त्यांची पंतप्रधानपदी नेमणूक झाली होती.

वराडकरांचं महाराष्ट्राशी नातं

लिओ वराडकर

फोटो स्रोत, ANI

लिओ वराडकर यांचे वडील अशोक वराडकर हे पेशानं डॉक्टर होते. ते मूळचे सिंधुदुर्गातल्या वराड गावचे आणि मुंबईतही राहायचे. 1960साली ते भारतातून इंग्लंडला गेले.

इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये काम करताना अशोक यांची आयरिश वंशाच्या आणि पेशानं नर्स असलेल्या मरियम यांच्याशी ओळख झाली. दोघांनी लग्न केलं आणि मग 70च्या दशकात हे जोडपं रिपब्लिक ऑफ आयर्लंडला राहायला गेलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

 18 जानेवारी 1979 रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिन शहरात लियो यांचा जन्म झाला. ते अशोक यांचे सर्वात लहान पुत्र आहेत.

त्यांनी सेंट फ्रान्सिस नॅशनल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतलं. तर 2003 साली डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजमधून त्यांनी मेडिकलची पदवी घेतली.

विद्यार्थी असल्यापासूनच त्यांनी राजकारणात रस घेतला होता. मग वैद्यकीय व्यवसायाकडून त्यांची वाटचाल राजकारणाकडे झाली. 

वयाच्या 20व्या वर्षी लिओ यांनी स्थानिक निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.  2004 साली मात्र त्यांना स्थानिक पातळीवर निवडणूक लढवण्यात यश आलं.

2007 साली ते डब्लिन वेस्टमधून फाईन गेल पक्षाच्या तिकिटावर संसदेत निवडून आले.

2011 ते 2013 या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रिपद भूषवलं.

त्यानंतर 2014 ते 2016 या काळात ते आयर्लंडचे आरोग्यमंत्री होते.

2017 साली एंडा केनी यांच्या राजीनाम्यानंतर वराडकर पहिल्यांदाच फाइन गेल पक्षाचे प्रमुख म्हणून निवडले गेले. त्यांना पंतप्रधान म्हणून निवडण्यात आलं.

तेव्हा 39 वर्षांचे वराडकर हे आयर्लंडचे सर्वात तरूण आणि पहिलेच समलिंगी पंतप्रधान बनले.

 2019 साली त्यांनी सिंधुदुर्गात आपल्या मूळ गावाला भेट दिली होती. त्यावेळी PTI वृत्तसंस्थेशी बोलताना वराडकर म्हणाले होते, "हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. मी माझे आईवडील, माझ्या बहिणी आणि त्यांचे नवरे, काही नातवंडं आणि माझ्या पार्टनरबरोबर इथे आलोय. म्हणजे याला एक मोठ्ठा कौटुंबिक दौराच म्हणता येईल. "

2020 साली फेब्रुवारीमध्ये त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला, पण पुढचे काही महिने ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कारभार पाहात होते.  

ब्रेक्झिट आणि आयर्लंडचा व्यापार

लिओ वराडकर

फोटो स्रोत, Getty Images

आयर्लंड या बेटाच्या दक्षिणेकडील मोठ्या भागावर रिपब्लिक ऑफ आयर्लंड हे राष्ट्र वसलं आहे. तर या बेटाचा उत्तरेकडचा काही प्रदेश म्हणजे नॉर्दन आयर्लंड हा युनायटेड किंग्डम अर्थात युके या देशाचा भाग आहे.

युके युरोपियन युनियनचा भाग होता, तेव्हा दोन्ही देशांतील आयरीश लोकांमध्ये सुलभतेनं व्यवहार होत होते. पण युकेनं ब्रेक्झिटचा निर्णय घेतला.

ब्रेक्झिट लागू होण्याच्या काळात लियो वराडकर रिपब्लिक ऑफ आयर्लंडचे पंतप्रधान बनले.

वराडकर यांच्या नेतृत्त्वात रिपब्लिक ऑफ आय़र्लंडनं युकेसोबत वाटाघाटी केल्या, जेणेकरून सीमेच्या दोन्ही भागांत आयरिश लोकांच्या येण्याजाण्यावर कडक निर्बंध लागणार नाहीत. 

कोव्हिड काळातलं काम

2020 साली वराडकर देशाच्या उपपंतप्रधानपदी होते आणि जगाप्रमाणेच आयर्लंडनंही कोव्हिडचा सामना करावा लागला.

2013 मध्ये वराडकारांनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस सोडली होती, पण कोव्हिड काळात ते पुन्हा वैद्यकीय पेशात परतले.

कोव्हिडचा सामना करण्यासाठी डॉक्टर्सची कमतरता पाहता, त्यांना आठवड्यातून एक दिवस लोकांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. ते या काळात फोनवरून लोकांना गरज पडल्यास वैद्यकीय सल्लाही द्यायचे.

साहजिकच वराडकर यांच्या लोकप्रियतेतही तेव्हा वाढ झाली.  

18 सप्टेंबर 2020 रोजी कोव्हिड काळातल्या निर्बंधांविषयी डब्लिनमध्ये बोलत असताना कोणीतरी त्यांच्या अंगवार ज्यूस टाकला होता. त्यावर वराडकर म्हणाले होते, की त्यांच्याकडे कपड्यांचा आणखी एक जोड आहे आणि ते आपलं काम सुरू ठेवतील. सुरक्षा वाढवण्यासही त्यांनी तेव्हा नकार दिला होता.

आयर्लंडचे पहिले 'गे' पंतप्रधान

लिओ वराडकर

फोटो स्रोत, PA Media

युरोपातल्या सर्वात परंपरावादी आणि सनातनी देशांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयर्लंडमध्ये वराडकर हे उदारमतवादाचा चेहरा म्हणून समोर आले आहेत.

आयर्लंडमध्ये 1993 पर्यंत समलैंगिकता हा गुन्हा मानला जाई. 2013 साली झालेल्या एका सार्वमत चाचणीनंतर हे चित्र बदल.

मे 2015 मध्ये समलिंगी विवाहांना मान्यताही मिळाली. सार्वमताचा कौल समलैंगिक विवाहाच्या बाजूने यावा, यासाठी लिओ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

जानेवारी 2015 मध्येच वराडकर यांनी आयर्लंडच्या सरकारी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत  आपण समलैंगिक असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा ते आयर्लंडचे आरोग्यमंत्री होते.

"मी एक समलिंगी व्यक्ती आहे आणि माझ्यासाठी समलैंगिक असणं ही फार मोठी बाब नाही. मला आशा आहे की दुसऱ्या कुणासाठीही ही फार मोठी बाब नसेल. असायला पण नको," असं त्यावेळी लिओ यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर गर्भपातविरोधी कायद्यात बदल व्हावा म्हणून लिओ प्रयत्नशील होते आणि आता यासंदर्भातल्या सार्वमताचा निकालही त्यांच्या बाजूनं लागला होता.

गर्भपाताविषयी सार्वमतात महत्त्वाची भूमिका

आयर्लंडच्या घटनेतील आठव्या कलमामध्ये कोणत्याही स्वरूपाचा गर्भपात न करण्यासंबंधीचा उल्लेख होता. पण 2018 साली या कायद्यात बदल करण्यात आले, त्यात वराडकर यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली.

भारतीय वंशाच्या सविता हलप्पनावार या 31 वर्षीय महिलेला 2012मध्ये गर्भपाताला नकार देण्यात आला. प्रकृती गंभीर झाल्यानं सविता यांचा आयर्लंडमध्ये मृत्यू झाला.

यानंतर 2017मध्ये गर्भपाताशी निगडीत कायद्यातील बदलांसंबंधी आयर्लंड सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

यासंदर्भात 26 मे 2018 रोजी आयर्लंडमध्ये घेतलेल्या सार्वमतात जवळपास 66.4 % आयरिश लोकांनी गर्भपातासंबंधीच्या कायद्यात बदल करावा, या बाजूनं मत दिलं तर 33.6 टक्के लोकांनी कायद्यात बदल होऊ नये, या मताचे होते.

"एका आधुनिक देशासाठी एका आधुनिक राज्यघटनेची गरज आहे, असं लोकांनी आज दिलेल्या कौलावरून स्पष्ट होतं," असं मत सार्वमतानंतर वराडकर यांनी व्यक्त केलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)