तुम्हीही तुमच्या बॉसमध्ये कमतरता आहे म्हणून नोकरी सोडली आहे का?

नोकरी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आदर्श राठोड
    • Role, बीबीसी हिंदी
  • Published

करण सिंग जानेवारी 2020 मध्ये गुरुग्राममध्ये एका सल्लागार स्टार्टअपमध्ये जाॅईन झाले. ही त्यांची पहिली नोकरी होती. त्यांना खूप आनंद झाला पण काही आठवड्यातच त्यांना ही नोकरी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

करण सांगतात की, सुरुवातीला काही गोष्टी मला खटकल्या होत्या. त्यानंतर वातावरण बिघडू लागलं.

ते म्हणतात, “ क्लाइंटच्या असंतोषाबाबत बैठक झाली. मॅनेजरने समस्या सोडवण्याऐवजी अशी परिस्थिती निर्माण केली की टीममधील दोन सदस्य एकमेकांवर आरोप करू लागले."

ते पुढे सांगतात, “एका वरिष्ठ सहकाऱ्यानं नोकरी सोडली. कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होते. मीही काही दिवसांत राजीनामा दिला."

असं आढळून आलं आहे की लोक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्राधान्यांबद्दल गंभीरतेनं विचार करतात आणि जिथे ते आनंदी नाहीत तिथं नोकरी सोडण्यास उशीर करत नाहीत. आता ही नोकरी जरी नवीन असली तरी.

कमी वेळात नोकरी सोडण्याची कारणं

कमी वेळात नोकरी सोडण्याची अनेक कारणं आहेत.

  • मॅनेजरचं कर्मचाऱ्यांच्या कामाकडे अधिक लक्ष देणं
  • भरती दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न होणं
  • विचित्र कार्यालयीन वातावरण
  • लोकांना कंपनीचे नियम आवडत नाहीत, इत्यादी

अमेरिकेतील लेबर मार्केटवर लक्ष ठेवणाऱ्या ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या मते, अमेरिकेत नोकरीत असलेल्या व्यक्तीचा सरासरी कार्यकाळ चार वर्षांचा असतो.

परंतु सप्टेंबर 2022 मध्ये 'लिंक्डइन'नं केलेल्या संशोधनानुसार, अनेक कर्मचाऱ्यांनी एक वर्षापूर्वी नोकरी सोडली. अशी प्रकरणं ऑगस्ट 2021 मध्ये वाढू लागली आणि मार्च 2022 पर्यंत (गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के जास्त) वाढ झाली.

नोकरी

फोटो स्रोत, Getty Images

याचा अर्थ असाही होतो की एका कामात अनेक वर्षं असमाधानी राहण्याऐवजी लोक आता लवकर नोकरी बदलण्यास इच्छुक आहेत.

असं का होत आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपमधील सहाय्यक प्राध्यापक वानिकी जोशी लोहानी या लोक नोकऱ्यांमध्ये का राहतात आणि का सोडतात, त्या याचं स्पष्टीकरण देतात.

त्या म्हणतात की, "ही एक सकारात्मक भावना आहे, ज्याला 'वर्क फॅमिली एनरिचमेंट' म्हणतात. म्हणजेच, आपल्याला कामातून काहीतरी मिळत आहे, ज्यामुळे कुटुंब समृद्ध होत आहे. मग तो पैसा असो वा सकारात्मक दृष्टिकोन.

त्या पुढे सांगतात, “जर कोणी ऑफिसमध्ये आनंदी असेल आणि आनंदाने घरी जात असेलं, त्याला वेळेवर सुट्टी मिळत असेल तर ते त्याच्यासाठी चांगले आहे. त्याला अशा वातावरणात नोकरीत राहायला आवडेल.”

त्यांनी नमूद केलेलं दुसरं कारण म्हणजे 'वर्क फॅमिली कॉन्फ्लिक्ट'

प्रोफेसर वानिकी जोशी लोहानी यांच्या मते नकारात्मक भावना निर्माण होते. ते कामाला एक ओझं मानतात आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही कारण ते ऑफिसची निराशा घरी घेऊन जातात.

त्या सांगतात की, जेव्हा ‘वर्क फॅमिली कॉन्फ्लिक्ट’ हे ‘वर्क फॅमिली एनरिचमेंट’ पेक्षा जास्त होते तेव्हा लोक नवीन नोकरीचे पर्याय शोधू लागतात.

अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीच्या क्वेस्ट्रोम स्कूल ऑफ बिझनेसमध्ये मॅनेजमेंट आणि ऑर्गनाइजेशनचे वरिष्ठ व्याख्याते मोशे कोहेन म्हणतात, “कर्मचारी आणि नोकरी देणारे यांच्यात एक सामाजिक करार आहे जो आता मोडत आहे. आता कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत नाहीत."

ते सांगतात की "कर्मचाऱ्यांना असं वाटतं की त्यांना तात्पुरत्या आधारावर नियुक्त केलं गेलं आहे आणि त्यांना कधीही काढून टाकलं जाऊ शकतं, अशा परिस्थितीत, ते देखील नोकरी देणाऱ्या कंपनीशी कोणतीही बांधिलकी ठेवत नाहीत. ते नवी नोकरी शोधत राहतात."

नोकरी

फोटो स्रोत, Getty Images

कोहेन यांच्या म्हणण्यानुसार, आजकाल रिमोट वर्क म्हणजे 'वर्क फ्राॅम होम' किंवा कुठूनही बसून काम करण्याचा ट्रेंड वाढला आहे, परंतु कर्मचारी काम करत आहेत की नाही याची काळजी मॅनेजरला असते. अशा परिस्थितीत ते अधिक पाळत ठेवू लागतात. यामुळे मॅनेजर आणि टीम सदस्यांमधील विश्वास कमी होत आहे.

काही लोक या परिस्थितीला बळी पडत नाहीत. नोकरी त्यांच्या अपेक्षेनुसार किंवा गरजेनुसार नाही किंवा वातावरण चांगले नाही असं त्यांना वाटलं तर ते लगेच तेथून निघून जातात.

लगेच नोकरी सोडणं कितपत योग्य आहे?

उशिरा नोकरी सोडण्याऐवजी विचारपूर्वक नोकरी सोडणं हा योग्य निर्णय असू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कॅलिफोर्नियातील पेपरडाइन ग्राझिया बिझनेस स्कूलमधील वर्तणूक शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक बॉबी थॉमसन यांचा विश्वास आहे की, “जेव्हा तुम्हाला असं वाटतं की गोष्टी योग्य नाहीत, तेव्हा ती नोकरी सोडणं हे एक आत्मविश्वासपूर्ण निर्णय आहे.

जर कर्मचार्‍यांना असं वाटत असेल की कंपनीतील नकारात्मक वातावरण खूप जास्त आहे आणि परिस्थिती बदलणं त्यांच्या क्षमतेच्या बाहेर आहे, तर त्यांनी ही नोकरी लवकर का सोडावी, आणि हे समजण्यासारखं आहे."

शिवाय अशा नोकरीत गुंतून राहिल्यानं चांगल्या संधी गमावतात.

पण करण सिंह सांगतात की, नवीन नोकरीच्या शोधात असताना, त्यांना विचारण्यात आलं की, त्यांनी एवढ्या लवकर जुनी नोकरी का सोडली? तसचं मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या लोकांना नोकरी सोडणं सोप नसतं.

ते सांगतात, "मी इंटरव्यू दिले आणि महिनाभरात नोएडामधील एका नवीन कंपनीत रुजू झालो. इथला पगार चांगला आहे आणि वातावरणही.”

पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला असं स्वातंत्र्य नसतं. जेएनयूमधील सहायक प्राध्यापक वानिकी जोशी लोहानी सांगतात की, प्रत्येक उद्योगाची परिस्थिती वेगळी असते.

नोकरी

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या मते, टेक्सटाईल, टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे लोक नोकरी सोडण्याचं टाळतात, तर आयटी, कन्सल्टन्सी, मार्केटिंग इत्यादी क्षेत्रात अधिक बिझनेस आहे, इथं नोकरीच्या ऑफर देखील उपलब्ध आहेत.

कंपन्यांनी काय करावं ?

कंपन्या नेहमीच चुकीच्या असतात असं नाही. कर्मचाऱ्यांनी तत्काळ नोकरी सोडण्यानं कंपन्यांचं नुकसान होतं.

क्वेस्ट्रोम स्कूल ऑफ बिझनेसचे वरिष्ठ प्रवक्ते कोहेन म्हणतात की काही लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या इच्छेने खूप 'शॉर्ट-टर्मिस्ट' बनले आहेत, म्हणजेच ते सर्वकाही त्वरित मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ते सांगतात, “अनेकांना आर्थिक लाभाव्यतिरिक्त काहीतरी नवीन शिकायचं असतं, ऑफिसमध्ये काम करताना लवचिकता असावी, असं त्यांना वाटतं. पण अशा अपेक्षा पहिल्याच दिवशी पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यांना असं वाटतं की ते येताच त्यांना काही महत्त्वाचं काम दिलं जाईल किंवा ते असं मत बनवतात की काही कमतरता असलेला बॉस हा वाईट बॉस असतो. पण त्यांना वाटतं तसं नसतं."

तुमची नोकरी सोडण्यास घाबरू नका असा सल्ला कोहेन यांनी दिला आहे. "पण थोडा वेळ थांबा, घाईघाईनं कोणताही निर्णय घेऊ नका."

प्रोफेसर वानिकी जोशी लोहानी म्हणतात की कंपन्यांनी त्यांचा 'रिटेन्शन रेट' म्हणजे कर्मचारी नोकरीत टिकून राहण्याचा दर आणि 'अट्रिशन रेट' म्हणजे नोकरी सोडण्याचा दर काय आहे, हे पाहावं. यानंतर, रीटेंशन वाढवण्यासाठी आणि अट्रीशन कमी करण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारून आवश्यक बदल केले पाहिजेत.

नोकरीत नकारात्मकता आल्यास काय करावं ?

पण नोकरीच्या अगदी सुरुवातीला कंपनी किंवा तिथल्या वातावरणाबद्दल नकारात्मक चिन्ह दिसू लागतात तेव्हा काय करावं?

नोकरी

फोटो स्रोत, Getty Images

पेपरडाइन ग्राझिडिओ बिझनेस स्कूलमधील सहाय्यक प्राध्यापक बॉबी थॉमसन या नोकरी सोडण्यापूर्वी थोडा विचार करण्याचा सल्ला देतात.

कर्मचार्‍यांनी त्यांचं काम आणि जबाबदाऱ्यांबद्दल उच्च अधिकार्‍यांशी चर्चा केली पाहिजे आणि संस्थेच्या इतर सदस्यांशी संबंध सुधारले पाहिजेत. जुना सहकारी, सल्लागार किंवा करिअर कोच यांची मदत घेऊन तुमचा दृष्टीकोन बदलण्यासाठी मदत घेतली जाऊ शकते.

थॉमसन सांगतात की लोकांच्या तर्क क्षमतेवर त्यांचा विश्वास आहे, विशेषत: जेव्हा त्यांनी विचारपूर्वक त्यांची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याच्या परिणामांचा त्यांनी खूप विचार केलेला असतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.