Video : ब्रेकअपनंतर तरुणाने तरुणीवर हल्ला करत केली हत्या; नंतर स्वतःचेही जीवन संपवले
मुंबईतील लालबाग–काळाचौकी परिसरात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. ब्रेकअपमुळे मानसिक तणावाखाली असलेल्या एका तरुणाने आपल्या 24 वर्षीच्या मैत्रिणीवर दिवसाढवळ्या चाकूने हल्ला केला.
त्यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे.
आंबेवाडी येथील रहिवासी सोनू बराय आणि या मुलीचं आठ–दहा दिवसांपूर्वी संशयावरून वाद झालेला. तेव्हापासून सोनू मानसिक तणावाखाली होता आणि पुन्हा मैत्री प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता.
शुक्रवारी सकाळी त्याने त्या तरुणीला भेटायला बोलावलं. भेटीत वाद वाढला आणि संतापलेल्या सोनूने तिला बेदम मारहाण करून चाकूने वार केले.
जीव वाचवण्यासाठी तरुणी जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये धावली, पण सोनू तिच्या मागे गेला आणि तिथेच पुन्हा तिच्यावर हल्ला केला. नर्सिंग होममधील कर्मचारी आणि नागरिकांनी या तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, सोनूने स्वतःचाच गळा चिरून घेतला.
दोघांनाही तातडीने KEM रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान सकाळी सोनूचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या मुलीचं नंतर जे.जे. रुग्णालयात निधन झालं.
घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी आणि पोलिस उपायुक्त आर. रागसुधा यांनी घटनास्थळी धाव घेतली. नर्सिंग होममध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून, पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






