दिल्ली पोलिसांचं 150 वर्षं जुनं रेकॉर्ड सापडलं; वाचा, त्यावेळी दिल्लीत कोणत्या प्रकारचे गुन्हे घडायचे

1860 ते 1900 दरम्यान दिल्ली येथे दाखल 30 पोलीस तक्रारींची माहिती मिळाली आहे.

फोटो स्रोत, RAJENDERA KALKAL

फोटो कॅप्शन, 1860 ते 1900 दरम्यान दिल्ली येथे दाखल 30 पोलीस तक्रारींची माहिती मिळाली आहे.
    • Author, झोया मतीन
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, दिल्लीहून
  • Published

सुमारे दीडशे वर्षांपूर्वी म्हणजेच 1876 च्या कडाक्याच्या थंडीची ती रात्र. दिल्लीतील सब्जी मंडी परिसरात मोहम्मद खान यांच्या घरावर टकटक झाली. भारताच्या राजधानीचा हा परिसर चिंचोळ्या गल्ल्यांनी भरलेला होता. दोन दमलेल्या वाटसरुंनी मोहम्मद खान यांचं दार ठोठावून त्यांच्याकडे रात्रीसाठी आसरा मागितला.

खान दयाळू होते, त्यांनी दोन्ही वाटसरुंनी घरात घ्यायचं ठरवलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोन्ही वाटसरु गायब झाले होते. शिवाय त्यांना दिलेलं पांघरूण आणि गाद्या देखील गायब होत्या. आता खान यांना कळून चुकलं होतं की त्यांच्याकडे चोरी झाली आहे..

या घटनेला जवळपास 150 वर्षे उलटून गेली. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या दिल्लीच्या सर्वात जुन्या गुन्ह्यांच्या यादीमध्ये खान यांची ही घटना समोर आली. दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात त्यांच्या वेबसाइटवर या गुन्ह्यांच्या नोंदी अपलोड केल्या आहेत.

या जुन्या एफआयआरमध्ये अशा आणखी 29 घटनांची नोंद आहे, ज्यांची शहरातील पाच प्रमुख पोलीस ठाण्यांमध्ये देखील नोंद झाली आहे. यात सब्जी मंडी, मेहरौली, कोतवाली, सदर बाजार आणि नांगलोई ही पोलीस ठाणी आहेत.

हे एफआयआर 1861 ते 1900 दरम्यान दाखल करण्यात आले होते.

खान यांच्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आणि चोरीच्या गुन्ह्यात त्यांना तीन महिन्यांसाठी तुरुंगात धाडलं.

या एफआयआर शुद्ध उर्दू शिकस्ता लिपीमध्ये हाताने लिहिलेल्या आहेत. यात बरेच अरबी आणि पर्शियन शब्द आहेत.

दिल्लीचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग कलकल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या एफआयआरचं भाषांतर आणि संकलन केलं आहे.

मोहम्मद खान यांनी 1876 साली तिघांविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

फोटो स्रोत, DELHI POLICE

फोटो कॅप्शन, मोहम्मद खान यांनी 1876 साली तिघांविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दिल्ली पोलीस सहाय्यक आयुक्त राजेंद्र सिंग कलकल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, या नोंदी अतिशय बोलक्या होत्या, सतत बदलत असलेल्या आणि विस्तारत असलेल्या शहरातील लोकांच्या जीवनाबद्दल त्यांना जाणून घ्यायचं होतं.

ते सांगतात, "ही एक भूतकाळ आणि वर्तमानाचा वेध घेणारी खिडकीच आहे."

यातल्या बहुतेक तक्रारी या किरकोळ चोरीच्या होत्या. जसं की संत्री, चादर किंवा आईस्क्रीम चोरल्याचे गुन्हे. याकडे आपण एक विनोद म्हणून बघू शकतो.

एक तक्रार मेंढपाळाची होती. एका जमावाने त्या मेंढपाळावर हल्ला करून त्याच्या कानाखाली मारली आणि त्याच्या 110 शेळ्या पळवून नेल्या. दुसर्‍या तक्रारीत एकाने चादर चोरली पण अवघ्या 40 पावलांच्या अंतरावर तो चोर पकडला गेला.

ज्यांना भारतीय इतिहासाची थोडीफार माहिती आहे, त्यांना या गोष्टी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटू शकतात. कारण 1860 चं दशक हे दिल्लीच्या इतिहासातील सर्वात धामधुमीचं दशक होतं.

याच दशकात 1857 चा उठाव झाला होता, ज्याला भारताचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध देखील मानलं जातं. यानंतर ब्रिटिशांनी हा उठाव मोडून मुघल राजवट संपुष्टात आणली.

दिल्ली शहर...जे मुघल शाही स्मारके, कला, सुफी तत्वज्ञान आणि उद्यानांनी भरलेलं होतं, ते या दशकात लुटीचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

सहायक पोलीस आयुक्त कलकल यांनी यांनी या केससंदर्भात व्यंगचित्र काढलं आहे.

फोटो स्रोत, DELHI POLICE

फोटो कॅप्शन, सहायक पोलीस आयुक्त कलकल यांनी यांनी या केससंदर्भात व्यंगचित्र काढलं आहे.

कलाकार आणि इतिहासकार महमूद फारुकी यांच्या मते, त्यावेळी असे गंभीर गुन्हे घडले नाहीत याचं संभाव्य कारण म्हणजे लोक इंग्रजांच्या दडपशाही राजवटीला घाबरले होते.

विशेषत: बंडानंतरच्या काही वर्षांत इंग्रजांनी अतिशय कडक शासन लादलं. महिला, पुरुष आणि लहान मुले यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अनेकांना दिल्ली सोडून आजूबाजूच्या गावांमध्ये गरिबीत राहावं लागलं. आणि शहरात राहिलेले काही लोक गोळ्या झाडल्या जातील किंवा फासावर जातील या भीतीच्या छायेत जगले.

"तो भयंकर क्रौर्याचा काळ होता. लोक भयभीत झाले होते आणि त्यांनी सहन केलेल्या दडपशाहीचे आघात त्यांना वर्षानुवर्षं सहन करावे लागले."

फारुकी सांगतात की, कोलकातासारख्या इतर शहरांमध्ये आधीपासूनच आधुनिक पोलीस संरचना तयार झाली होती.

परंतु दिल्लीमध्ये मुघलकालीन पोलिसांची बरीचशी 'जुनी' व्यवस्था सुरू ठेवण्यात आली. कारण ती समूळ नष्ट करणं किंवा त्यात बदल करणं कठीण काम होतं.

म्हणून, नोंदींमध्ये विसंगती किंवा तफावत असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

आता दिल्ली पोलीस संग्रहालयात जतन केलेल्या या नोंदी गेल्या वर्षी सापडल्या होत्या. या संग्रहालयाचे पुरातत्व संशोधन आणि संरक्षण विभागाचे प्रमुख असलेले कलकल म्हणाले की, जुन्या संग्रहातून शोध घेत असताना त्यांना एके दिवशी या नोंदी सापडल्या.

भारतीय सैनिकांनी 1857 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध बंड केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय सैनिकांनी 1857 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध बंड केलं होतं.

"मी शेकडो एफआयआर धूळखात पडलेले पाहिले. ते वाचल्यावर मला समजलं की, आज 200 वर्ष झाली तरी त्याचं स्वरूप काही बदललेलं नाही."

कलकल सांगतात की, या गुन्ह्यांच्या निष्कपट स्वरूपाचं मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं. सिगारेट, पायजमा किंवा संत्री यांसारख्या वस्तू चोरणे या आतापर्यंतच्या सर्वात अकल्पनीय गोष्टी असतील.

पण हे सर्व किरकोळ गुन्हे पोलिसांकडे नोंदवले गेले याचा अर्थ त्या वेळी इतर, अधिक गंभीर गुन्हे घडत नव्हते असं नाही. ऐतिहासिकदृष्ट्या, पहिली हत्या 1861 मध्ये झाली असावी.

त्याच दरम्यान ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील पोलीस यंत्रणा ही भारतीय पोलीस कायद्याद्वारे स्थापन झाली होती.

कलकल सांगतात, "हत्येसारखे गंभीर गुन्हे शोधणे हा आमच्या संशोधनाचा उद्देश नाही पण मला खात्री आहे की ते इथेच कुठेतरी असतील."

बर्‍याच प्रकरणांमध्ये खटल्याचा निकाल 'अनट्रेसेबल' म्हणजेच गुन्हेगार पकडला गेला नाही असं म्हटलं गेलंय.

परंतु इतर अनेक प्रकरणं, जसं की खान यांच्या सारख्या इतर खटल्यात त्वरीत शिक्षेची आवश्यकता होती. यात चाबकाचे फटके ते काही आठवडे किंवा काही महिने तुरुंगवासाची शिक्षा होती.

साल होतं 1897.. शहरातील सर्वात प्रतिष्ठित भागातील हॉटेल इम्पीरियलमध्ये गुन्हा घडला होता.

ही कागदपत्रे

फोटो स्रोत, RAJENDERA KALKAL

हॉटेलचा स्वयंपाकी 'इंग्रजीत लिहिलेली तक्रार' घेऊन सब्जी मंडी पोलीस ठाण्यात आला. यात असं लिहिलं होतं की, चोरांच्या एका टोळक्याने हॉटेलच्या खोलीतून वाइनची बाटली आणि सिगारेटचे पॅकेट चोरून नेले आहेत.

हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी चोर शोधण्यासाठी 10 रुपयांचं आकर्षक इनाम जाहीर केलं. मात्र या चोराचा शोध काही लागला नाही.

कलकल सांगतात, "आजकाल गुन्हे इतके गुंतागुंतीचे झालेत की ते सोडवायला काही महिने किंवा वर्षे लागतात. पण तेव्हा लोकांचं जगणं खूप सरळमार्गी होतं. तुम्ही प्रकरणाचा गुंता सोडवू शकत होता किंवा तेव्हा आतासारखी परिस्थिती नव्हती असं म्हणता येईल."

कलकल सांगतात की, या नोंदी संकलित करताना माझ्या पथकाला म्हणावा तितका आनंद झाला नाही कारण भाषांतर करण्याची सुरुवातीची प्रक्रिया थोडी त्रासदायक होती. उर्दू शिकस्ता लिपी वाचताना आणि त्यांचे अर्थ लावताना त्यांना अनेक वेळा अडचणी यायच्या. त्यामुळे आमच्या पथकात शहरभरातून उर्दू आणि पारशी विद्वान आणि मौलवी यांची भरती करावी लागली.

कलकल यांच्या मते, "पण कठोर परिश्रमांचं मूल्य नेहमीच चांगलं असतं."

एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या तपासाचं वर्णन वाचताना कलकल यांना गंमत वाटली. एका चोरीच्या तपास करत असताना आपला आवडत्या घोड्याला कडक उन्हात उभं करायला लागल्यामुळे तो पोलीस अधिकारी चिडला होता.

"या तपशीलवार वर्णनांमुळे आपण किती दूरवर आलोय याचं आश्चर्य वाटतं, नाही का?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)