समीना दलवाई यांच्याबद्दल जाणून घ्या या गोष्टी, त्यांच्याबद्दल जगभरातील विचारवंत का बोलत आहेत?

फोटो स्रोत, YoutTube/OPJindalGlobalUniversity
हरियाणातील सोनीपतस्थित ओ. पी. जिंदाल ग्लोबल यूनिव्हर्सिटीमधील प्राध्यापिका डॉ. समीना दलवाई यांच्याविरोधात महिलांच्या प्रतिष्ठेची हानी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
मात्र, डॉ. समीना दलवाई यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचं म्हणत, भारतासह जगभरातील 500 हून अधिक प्राध्यापक, संशोधक, विचारवंतांनी पत्रक काढून, डॉ. समीना दलवाई यांना पाठिंबा दिला आहे.
डॉ. समीना दलवाई या कायद्याच्या अभ्यासक आणि प्राध्यापिका आहेत. माजी खासदार हुसैन दलवाई आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या शमा दलवाई यांच्या त्या कन्या आहेत. सामाजिक विषयांवर त्या प्रखरपणे भाष्य करण्यासाठी परिचित आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
23 सप्टेंबर 2023 रोजी प्रा. समीना दलवाई या विधी विभागाच्या तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘जेंडर अँड सोसायटी’ या विषयाअंतर्गत ‘सेक्शुअॅलिटी अँड डिझायर’ हा विषय शिकवत होत्या.
त्यावेळी त्यांनी काल्पनिक नावासह बम्बल या डेटिंग अॅपवर प्रोफाईल उघडून, विद्यार्थ्यांना हे विशद करून सांगत होत्या की, जात, वर्ग, लिंग, धर्म इत्यादींमुळे कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो.
जेव्हा बम्बल अॅपवर प्रोफाईल सक्रिय होते, तेव्हा आजूबाजूच्या विशिष्ट अंतरातील वर्तुळातील प्रोफाईल त्यावर दिसू लागतात. हेच या लेक्चरदरम्यान झालं. त्यानंतर ते बंद करण्यात आलं.
प्रा. समीना दलवाई यांना एका विद्यार्थ्याकडून ईमेल आला आणि त्यात त्याने आपलं प्रोफाईल तिथं दिसल्याचं सांगितलं. त्यानंतर प्रा. दलवाई यांनी विद्यापीठाचे कार्यकारी अधिष्ठाता आणि कुलगुरूंना पत्र लिहून सविस्तर वृत्तांत कळवला.
मात्र, या लेक्चरदरम्यान अज्ञात विद्यार्थ्यानं व्हीडिओ शूट केला होता. हा व्हीडिओ नोव्हेंबरमध्ये ट्विटरवरून समोर आला. याला निमित्त ठरलं राजकीय तज्ज्ञ अचिन वनाईक यांच्या व्याख्यानाचं.
अचिन वनाईक यांनी पॅलेस्टाईन मुद्द्यावरून त्यांच्या व्याख्यानात केलेल्या भाष्यावर काहीजणांनी आक्षेप घेतला. मात्र, समीना दलवाई यांनी त्यांना पाठिंबा दिला.
पाठिंब्याचा ईमेल लीक झाला आणि त्यावर चर्चा सुरू असतानाच, आधी घडलेल्या डेटिंग अॅपसंदर्भातील प्रकरणाचा व्हीडिओही ट्विटरवर शेअर करण्यात आला आणि प्रा. दलवाई यांचं ट्रोलिंग करण्यात आलं.
यानंतर हरियाणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेनू भाटिया यांनी यात उडी घेतली. त्यांनी विद्यापीठात येऊन प्रा. समीना दलवाईंचं लेक्चर झालेल्या वर्गातील विद्यार्थ्यांशी बंद खोलीत संवाद साधला. रेनू भाटियांनी विद्यापीठाच्या कुणाही कर्मचाऱ्यांना तिथं प्रवेश दिला नाही.
त्यानंतर रेनू भाटियांनी पत्रकार परिषद घेतली आणि प्रा. समीना दलवाई दोषी असल्याचा दावा केला. त्याच दिवशी रनू भाटियांनी ट्वीट केलं आणि प्रा. समीना दलवाई विचारधारा आणि धर्माच्या आधारे भेदभाव करतात, असा आरोप केला.

फोटो स्रोत, X/Renu Bhatia
तसंच, विद्यापीठाला रेनू भाटियांनी सांगितलं की, प्रा. समीना दलवाई यांच्यावर कारवाई करावी. यावर प्रा. दलवाईंनी आपली बाजू विद्यापीठाकडे मांडली. मात्र, त्यावर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रा. समीना दलवाईंना उद्देशून वॉर्निंग नोटीस काढली.
याच दरम्यान, हरियाणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेनू भाटियांनी प्रा. समीना दलवाई यांना समन्स बजावले. हे समन्स विद्यापीठाच्या रजिस्ट्रारच्या माध्यमातून ईमेलद्वारे बजावले गेले. त्यावरही प्रा. समीना दलवाईंनी स्पष्टीकरण दिलं.
त्यानतंर 4 डिसेंबर 2023 रोजी रेनू भाटियांनी पुन्हा एकदा समन्स बजावले आणि दोन दिवसांनी म्हणजे 6 डिसेंबरला महिला आयोगासमोर हजेरीचे आदेश दिले.
मात्र, समीना दलवाई यांनी घरगुती कार्यक्रमानिमित्त मुंबईला असल्यानं व्हीडिओद्वारे उपस्थितीची परवानगी मागितली. मात्र, ही परवानगी नाकारली गेली. मग प्रा. दलवाई यांचे वकील तिथे उपस्थित राहिले.
यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रेनू भाटियांनी थेट पत्रकार परिषद घेत, प्रा. समीना दलवाई यांच्यावर FIR दाखल करण्याची शिफारस पोलिसांना केली.
त्यानुसार 22 डिसेंबर 2023 रोजी हरियाणा पोलिसांनी समीना दलवाई यांच्याविरोधात महिलांच्या प्रतिष्ठेची हानी (कलम 509 अंतर्गत) केल्याचा FIR दाखल केला आहे.
500 हून अधिक बुद्धिजीवी, प्राध्यापक, संशोधकांचा पाठिंबा
प्रोफसर समीना दलवाई यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचं म्हणत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावीरल 500 हून अधिक बुद्धिजीवी, प्राध्यापक आणि संशोधकांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी केलीय. डॉ. समीना दलवाई यांना पाठिंबा देण्यासाठी पत्रक काढण्यात आलं आहे.
इतिहास संशोधक डॉ. रामचंद्र गुहा, प्रा. नलिनी सुंदर, निवेदिता मेनन, चमण लाल, नंदिता नरेन यांसह महाराष्ट्रातील प्राध्यापक, विचारवंतांचाही समावेश आहे. त्यात परिमल माया सुधाकर, प्रतिमा जोशी, अविनाश कदम, श्रद्धा कुंभोजकर, यशवंत झगडे यांसह अनेकांचा समावेश आहे.
डॉ. समीना दलवाई यांच्या पाठिंब्यासाठी जारी केलेल्या या पत्रकात म्हटलंय की, डॉ. समीना दलवाई यांच्याविरुद्ध राजकीय अजेंड्याने कारवाई केली जात आहे. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया यात पार पाडली जात नाहीय.
ओ. पी. जिंदाल ग्लोबल यूनिव्हर्सिटी प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. त्यांनी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कुठलीही विहित प्रक्रिया पार पाडली नाही, हे पाहणं त्रासदायक आहे.
तसंच, या पत्रकात असंही म्हटलंय की, डॉ. समीना दलवाई या मानद प्राध्यापिका आहेत. त्या स्त्रीवादी लेखिकाही आहेत. त्यांनी जात-धर्म-वर्गाच्या पलिकडे जात महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. अशा व्यक्तीवर महिलांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचा आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे.
या 500 हून अधिक बुद्धिजीवी, प्राध्यापक, संशोधकांनी हरियाणा पोलीस आणि न्यायव्यवस्थेला आवाहन केलंय की, डॉ. समीना दलवाई यांच्याविरोधातील ही जाणीवपूर्वक करण्यात येत असलेली कारवाई थांबवावी.
समीना दलवाई यांचा परिचय
समीना दलवाई या सध्या हरियाणातील सोनीपतस्थित ओ. पी. जिंदाल ग्लोबल यूनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. लिंगभाव, लैंगिकता आणि कायदा (Gender, Sexuality and Law) या विषयात त्यांनी संशोधन, अभ्यास करून विशेषत्व प्राप्त केलं आहे.
‘मुंबईतील डान्सबार बंदी’ या विषयावर त्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. याच विषयावर त्यांचं ‘बॅन्स अँड बार गर्ल्स’ हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे. तसंच, 'Babri Masjid, 25 Years On' हे संपादित, तर ‘भटकभवानी’ हा त्यांच्या लेखांचा संग्रहही प्रसिद्ध आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील मानवाधिकारासाठी लढणाऱ्या संघटनांसोबत वकील म्हणून काम केलं आहे. डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूटच्या त्या प्रमुखही होत्या.
साताऱ्यातील प्रसिद्ध माणदेशी महिला बँकेसोबत त्यांनी रिसर्च कन्सल्टंट म्हणूनही काम केलं आहे. या बँकेमार्फत ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याचं काम केलं जातं.
राज्यसभेतील काँग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाई हे त्यांचे वडील, तर स्त्रीवादी कार्यकर्त्या शमा दलवाई या त्यांच्या आई. तसंच, ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका नलिनी पंडित या त्यांच्या आजी.
मुस्लीम सत्यशोक मंडळाचे संस्थापक आणि मुस्लीम समाजातील सुधारक हमीद दलवाई हे समीना दलवाईंचे काका होत.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























