मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही - गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील

फोटो स्रोत, Facebook

Published

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही - गुलाबराव पाटील

“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यांना माहिती आहे, त्यांनी यावर बोलावं. शिवरायांबाबात वाकडं तिकडं बोललं, तर कोणत्याही पक्षाचा असो माफ केलं जाणार नाही. शिवाजी महाराज हे देवाचे देव आहेत. शिवरायांच्याबद्दल बोलण्यासाठी एक आचारसंहिता करण्याची गरज आहे,” असं मंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले.

तसंच, “महाराजांच्या नखाची बरोबरी या नालायकांकडून होऊ शकत नाही. मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही,” असा इशाराही गुलाबराव पाटलांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानं केली जात आहेत. सर्वात आधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, त्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेलं वक्तव्य वादाचं कारण बनलं.

या वक्तव्यांमुळे आधीच विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठत असताना, आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यानेच टीका केल्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय. गुलाबराव पाटलांच्या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, पाहणं महत्त्वाचं ठरेल.

2) मनसे नेते वसंत मोरेंना अजित पवारांचं राष्ट्रवादीत येण्याचं जाहीर आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात येण्यासाठी जाहीर आवाहन केलंय. लोकमतनं ही बातमी दिलीय.

‘तात्या, कधी येता, वाट पहातोय’, अशा शब्दात अजित पवार यांनी मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या या प्रस्तावाला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला. मात्र, पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

पुण्यातील एका विवाह सोहळ्यासाठी वसंत मोरे आणि अजित पवार उपस्थित होते. या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यानंतर ‘तात्या, कधी येताय, वाट पहातो,’ अशी विचारणा अजित पवार यांनी केली.

वसंत मोरे

फोटो स्रोत, Facebook

राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची आमदार निलेश लंकेंशीही भेट झाली होती. त्यावेळीही वसंत मोरे नाराज असल्याने ते मनसेला रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी त्याला विरोध केला होता. तेव्हापासून शहर पदाधिकारी विरोधात वसंत मोरे असे चित्र दिसण्यास सुरुवात झाली आहे. मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही यापूर्वी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते.

दीपक केसरकर

फोटो स्रोत, Facebook

3) कधीही निवडणूक घेतली तरी आमची तयारी – दीपक केसरकर

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.

“सत्ता गेल्यानंतर आज दारोदारी फिरत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साधे भेटत देखील नव्हते,” असा हल्लाबोल केसरकर यांनी केला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

त्यांनी यावेळी निवडणुकांवरही प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणूक कधी घ्यायची याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेत असतं. निवडणूक कधीही घेतली तरी त्याला सामोरे जाण्याची भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीची तयारी आहे. निवडणूक आम्हीच जिंकणार,” असा विश्वासही दीपक केसरकरांनी व्यक्त केला.

4) माध्यमांमधील माझ्या प्रतिमेमागचं सत्य, राहुल गांधींनी केला व्हीडिओ शेअर

काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी यूट्यूबवर व्हीडिओ शेअर करत भाजप आणि माध्यमांवर टीका केलीय. आधी कौतुक करणारी माध्यमं नंतर माझ्या वैयक्तिक हल्ले करू लागल्याची खंत आणि टीका राहुल गांधींनी व्यक्त केलीय. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

या व्हीडिओमध्ये राहुल गांधी मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना दिसतायत आणि माध्यमं, भाजपनं कशाप्रकारे आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला, याबाबत सांगताना दिसतायत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

‘माध्यमांमधील माझ्या प्रतिमेमागचं सत्य’ असं म्हणत राहुल गांधींनी हा व्हीडिओ शेअर केलाय.

भूसंपादनादरम्यान गरिबांच्या जमीन हक्काचा मुद्दा उचलल्यानंतर माध्यमांनी माझी प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप राहुल गांधींनी या व्हीडिओत म्हटलंय.

5) गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमची गिनिज बुकमध्ये झाली नोंद

गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने विश्वविक्रम केलाय.

हा सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या संख्येनं या मैदानाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. बीसीसीआय आणि जय शाह यांनी हा विश्वविक्रम झाल्याची माहिती ट्विट करत दिली आहे.  

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

आयपीएल फायनल सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी विश्वविक्रम केलाय. यासाठी याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

हे जगातील एकमेव क्रिकेट स्टेडिअम आहे, जिथे टी-20 सामना पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली. 29 मे रोजी गुजरात आणि राजस्थान यांच्यामध्ये अहमदाबाद स्टेडिअममध्ये फायनल सामना झाला होता. या सामन्यात गुजरातने सात विकेट्सनं बाजी मारली होती.