ट्रम्प यांनी मोदींना 'ग्रेट प्राईम मिनिस्टर' म्हटल्यानं भारत-अमेरिका संबंधात सुधारणा होईल का?

फोटो स्रोत, THOMAS SHEA/AFP via Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बरेचसे विश्लेषक 'अनप्रेडिक्टेबल' म्हणतात. म्हणजेच असे राष्ट्राध्यक्ष जे कधीही अनेक्षितपणे कोणतंही पाऊल उचलू शकतात, कोणताही निर्णय घेऊ शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ही प्रतिमा कायम राखल्याचं म्हटलं जातं आहे. त्यांच्या या स्वभावाचा आणि वर्तनाचा भाग म्हणून ते मोलभाव करण्याचा, वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करतात.
ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लावला आहे. या मुद्द्याचा दोन्ही देशांच्या संबंधांबरोबरच भारताच्या राजकारणावरही प्रभाव होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही याबाबत चर्चा होत आहेत.
शनिवारी (6 सप्टेंबर) ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी या दोघांनी दोन्ही देशांमधील संबंधांची स्तुती केली.
ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी त्यांचे 'चांगले मित्र' असल्याचं म्हटलं. तर पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या वक्तव्याचं कौतुक केलं.
त्याआधी चीननं शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची (एससीओ) परिषद आयोजित केली होती. तिथे पंतप्रधान मोदी यांची शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली.
भारत कोणत्याही एका गटावर किंवा देशावर अवलंबून नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात आला. अशा परिस्थितीत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर भारतासंदर्भात काही दबाब आहे का? अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांवर याचा किती परिणाम होऊ शकतो?
एससीओ परिषदेतून दिसलेलं चित्र अमेरिकेला किती अस्वस्थ करेल तसंच पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ज्या मैत्रीची चर्चा होत होती, ती आता राहिलेली नाही का?
बीबीसी हिंदीच्या द लेन्स या कार्यक्रमात या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
कलेक्टिव्ह न्यूजरुमचे डायरेक्टर ऑफ जर्नालिझम मुकेश शर्मा यांनी अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत, माजी वरिष्ठ मुत्सद्दी नवतेज सरना आणि वॉशिंग्टनमधील पत्रकार आणि लेखिका सीमा सिरोही यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली.
ट्रम्प यांची शैली आणि नव्या स्वरुपाचं राजकारण
नवतेज सरना यांना वाटतं की, डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पहिल्या कार्यकाळातच अनप्रेडिक्टेबल म्हणजे बेभरवशाचे नेते होते. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात तर यात आणखी वाढ झाली आहे.
सरना म्हणतात, "राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प एक पूर्णपणे वेगळ्याच प्रकारचं सरकार चालवत आहेत. हे खूपच वैयक्तिक स्वरुपाचं झालं आहे. त्यांचे सर्व सल्लागारदेखील पूर्णपणे त्यांच्याशी एकनिष्ठ झाले आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
"त्यांच्यासमोर कोणीही वेगळं मत मांडण्यास, त्यांना सल्ला देण्यास तयार नाही. अनेकांना तर बहुधा व्यूह रचनेचंही आकलन नाही."
सीमा सिरोही याच मुद्द्याकडे इशारा करतात. त्या म्हणतात की, या सरकारमध्ये एकतर्फीपणे धोरणं ठरवली जात आहेत.
"अमेरिकेच्या सरकारमध्ये सध्या जे धोरण आखलं जातं आहे, ते फक्त एकच व्यक्ती बनवतो आहे आणि ती व्यक्ती म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प. यातून तुम्ही दुसरा कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. कारण धोरणं खालून वर येत नाहीये, तर वरून खालच्या स्तरावर जातं आहे," असं त्यांनी म्हटलं.
ट्रम्प भारतावर रागावण्यामागचं कारण
कोणत्याही ठोस कारणाशिवाय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडच्या काळात भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
नवतेज सरना म्हणतात, "ऑपरेशन सिंदूर'मध्ये त्यांनी मध्यस्थी केल्याचं आम्ही स्वीकार केलं नाही, आम्ही नोबेल पुरस्कारासाठी त्यांची शिफारस केली नाही."
एक मोठं कारण असंही सांगितलं जातं आहे की, भारतानं व्यापार करारात कृषी आणि डेअरी क्षेत्रात अमेरिकेला सूट देण्यास नकार दिला.
"चीन रशियाकडून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो, तसंच युरोपदेखील रशियाकडून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूची आयात करतो," हेही सरना यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
सरना म्हणतात, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा भारतावर बराच राग आहे आणि तो राग ते काढत आहेत."
सीमा सिरोही यांनाही वाटतं की, परिस्थिती अचानक बदलली असून त्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत.
त्या म्हणतात की, "गेल्या 3-4 महिन्यांमध्ये भारत-अमेरिका संबंध अचानकपणे बदलले आहेत. मैत्रीचं रुपांतर जणू शत्रुत्वात झालं आहे."
त्या नमूद करतात की, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतानं उमेदवार असलेल्या ट्रम्प यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते शक्य झालं नव्हतं.
त्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात भारतानं स्पष्ट सांगितलं की, पाकिस्तानबरोबर झालेल्या शस्त्रसंधीमध्ये ट्रम्प यांची कोणतीही भूमिका नाही.
भारत-अमेरिका संबंध कोणत्या दिशेनं?
गेल्या दोन दशकांच्या कालावधीत भारत आणि अमेरिकेमधील संबंध सुधारले होते. दोन्ही देशांमधील जवळीक वाढली होती आणि विश्वास निर्माण झाला होता.
मात्र, नवतेज सरना यांच्या मते, "गेल्या 20-25 वर्षांच्या परिश्रमातून दोन्ही बाजूनं विश्वास निर्माण झाला होता. प्रेडिक्टिबिलिटी आणि व्यूहरचनात्मक तर्क हा या संबंधांचा आधार होता. मात्र, आता तो विश्वास बऱ्याच अंशी कमी झाला आहे."
त्यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोणत्याही ठोस कारणाशिवाय भारतीय अर्थव्यवस्था आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर हल्ला चढवला आहे.
"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंधांवर हल्ला केला आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला केला आहे, आपल्या संबंधांवर हल्ला केला आहे," असंही सरना म्हणतात.
अमेरिकेतील धोरणात्मक वर्तुळातदेखील याविषयी चिंता व्यक्त केली जाते आहे.
सीमा सिरोही यांच्या मते, "ज्या लोकांनी गेली 25 वर्षे दोन्ही देशांच्या संबंधांवर काम केलं आहे, ते म्हणतायेत की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ही मोठी चूक आहे. ते दोन्ही देशांमधील संबंध संपवत आहेत."
अमेरिकेच्या धोरणांवर भारतीय वंशाच्या लोकांचा प्रभाव?
अनेकदा म्हटलं जातं की, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या समुदायाचा राजकीय प्रभाव आता खूप वाढला आहे. भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यामध्ये हे लोक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र याबाबतीत नवतेज सरना यांचा वेगळा दृष्टीकोन आहे.
"आपल्याला वाटतं की, आपला भारतीय समुदाय अमेरिकेत राजकीयदृष्ट्या खूप शक्तीशाली झाला आहे, खूप सक्रिय झाला आहे. याची आपण इतक्या वेळा पुनरुक्ती केली आहे की बहुधा आपल्याला ते खरं वाटू लागलं आहे," असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, SAUL LOEB/AFP via Getty Images
नवतेज म्हणतात की, प्रत्यक्षात अमेरिकेतील भारतीय वंशाचे बहुतांश लोक त्यांच्या व्यवसायात, पेशात आणि आयुष्यात व्यस्त आहेत.
काहीजण कधीतरी राजकीय नेत्यांना देणगी देतात. मात्र एक संघटित राजकीय शक्ती म्हणून भारतीय वंशाच्या लोकांचा प्रभाव मर्यादित आहे.
अमेरिकेतही होत आहे विरोध
अमेरिकेतील अनेक प्रभावशाली लोक आणि माजी अधिकारी भारताबरोबरचे संबंध बिघडवणं योग्य नाही अला इशारा देत आहेत.
जॉन बोल्टन, जेक सुलिवन आणि निकी हेली यासारख्या लोकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सरना सांगतात की, "ट्रम्प यांच्या जवळच्या सल्लागारांमध्ये असं कोणीही राहिलेलं नाही, जे भारताच्या संदर्भात धोरणात बदल करण्याची आवश्यकता आहे, हे त्यांना सांगेल. बोल्टन किंवा हेली सारखे लोक आता बाजूला झाले आहेत."
"टीव्हीवर वक्तव्यं करण्याव्यतिरिक्त त्यांचा मुद्द्याचा ट्रम्प यांच्यावर प्रत्यक्ष परिणाम होत नाही. माझ्या मते सध्या तिथे कुणातही एवढं धाडस नाही."

फोटो स्रोत, Getty Images
सीमा सिरोही म्हणतात, "ज्या लोकांनी गेली 25 वर्षे या संबंधांवर काम केलं आहे, ते म्हणातयेत की यात सर्वात मोठी चूक ट्रम्प यांची आहे. ते दोन्ही देशांमधील संबंध पूर्णपणे संपवत आहेत."
"हे संबंध इतक्या परिश्रमानं निर्माण झाले होते. यामागचं मुख्य कारण हेच होतं की, चीनबरोबर संतुलन साधायचं आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संबंध बिघडवत आहेत."
त्या म्हणतात, "तुम्ही पाहिलं असेल की अमेरिकेतील सर्वात मोठे मुत्सद्दी परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, भारताबरोबरचे संबंध महत्त्वाचे आहेत याबाबत बोलत राहिले. मात्र त्यांचं कोणीही ऐकत नाही."
एससीओ परिषद: भारताकडे पर्याय असल्याचा संदेश
अशा परिस्थितीत, अलीकडेच चीनमध्ये झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेतील दृश्यांवर मोठी चर्चा झाली.
या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटले.

फोटो स्रोत, narendramodi/x
नवतेज सरना म्हणतात, "एससीओ परिषद ठरलेली होती आणि ती होणारच होती. मात्र सद्यपरिस्थितीत पंतप्रधान मोदींचं त्या परिषदेला जाणं आणि या नेत्यांबरोबर हसताना दिसणं, हा एक वेगळ्या प्रकारचा डिप्लोमॅटिक इशारा ठरला."
ते असंही म्हणाले, "जर ट्रम्प यांचा भारतावरील हल्ला पूर्णपणे चुकीचा असेल, विनाकारण असेल, तर आपल्याला पूर्ण अधिकार आहे की, आपण आपल्याला वाटेल त्याच्याशी चर्चा करावी, हवं त्याच्याशी संबंध दृढ करावेत."
भारताची व्यूहरचना काय आहे?
अमेरिकेच्या या धोरणाबद्दल भारतात देखील नाराजी दिसून येते आहे. अनेक ठिकाणी मागणी करण्यात आली की, जर अमेरिका 50 टक्के टॅरिफ लावत असेल तर भारतानं देखील अमेरिकेवर टॅरिफ लावावं. मात्र नवतेज सरना यांना ही भावनात्मक प्रतिक्रिया वाटते.
नवतेज सरना म्हणतात, "अमेरिकेवर प्रत्युत्तरादाखल कारवाई करणं, हे माझ्या मते थोडीशी भावनात्मक प्रतिक्रिया असेल.
आपलं दीर्घकालीन हित यातच आहे की, दोन्ही देशांमधील संबंधांवर जे काम झालं आहे, जे फायदे झाले आहेत, ते जितकं शक्य असेल तितकं वाचवलं पाहिजे."

फोटो स्रोत, Sergio Flores/Getty Images
ते म्हणतात, "रशिया असो की अमेरिका, कोणत्याही एका देशावर इतकं अवलंबित्व असता कामा नये. चीनवर देखील आपलं खूप अवलंबित्व आहे. जेव्हा एखादी समस्या येते, तेव्हा ते आपल्यासाठी संकट ठरावं इतकं अवलंबित्व असता कामा नये."
सीमा सिरोही म्हणतात, "जर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फोनवर चर्चा केली. तर याची काहीही शाश्वती नाही की, ती चर्चा कोणत्या दिशेनं जाईल. ती चर्चा अतिशय खराबही असू शकते आणि चांगलीही असू शकते."
मोदी-ट्रम्प यांच्या वैयक्तिक संबंधांवर काय परिणाम?
एक वेळ होती जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीची, चांगल्या संबंधांची खूप चर्चा व्हायची.
'हाऊडी मोदी' सारख्या कार्यक्रमांपासून ते मोठ्या व्यासपीठांवर एकमेकांची स्तुती करण्यापर्यंत दोघांमधील संबंधांना खास गती मिळाली होती. मात्र सद्यपरिस्थिती तशी राहिलेली नाही.
नवतेज सरना म्हणतात, "हे तर उघड आहे की, वैयक्तिक संबंध आणि जवळीक संपलीच आहे. अर्थात अजूनपर्यंत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वैयक्तिक पातळीवर फारसं काही म्हटलेलं नाही, ही चांगली गोष्ट आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"मात्र त्यांचे जे वैयक्तिक संबंध होते, ते सध्याच्या परिस्थितीत पूर्ववत होणं थोडंसं अशक्यच वाटतं."
सीमा सिरोही म्हणतात, "देशांमधील संबंध पूर्णपणे वैयक्तिक स्वरुपाचे नसतात. एका मर्यादेपर्यंत वैयक्तिक संबंध महत्त्वाचे ठरतात. दोघांचे संबंध खूप चांगले होते हे मान्य आहे. मात्र जेव्हा अमेरिकेच्या हिताचा मुद्दा असतो, तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यालाच महत्त्व देतात."
त्या म्हणतात, "'ऑपरेशन सिंदूर'संदर्भात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची इच्छा होती की, भारतानं त्यांची भूमिका मान्य करावी. मात्र भारतानं खूप कठोर भूमिका घेतली आणि सांगितलं की, शस्त्रसंधी पाकिस्तानच्या मागणीवरून झाली. यात अमेरिकेबरोबरच्या व्यापाराचा संबंध नव्हता आणि ट्रम्प यांची वैयक्तिक मध्यस्थीदेखील नव्हती."
दोन्ही देशांमधील संबंधांच्या बाबतीत पुढे काय?
नवतेज सरना यांच्या मते, "हे प्रदीर्घ आणि गुंतांगुंतीचे संबंध आहेत. खूप व्यापक संबंध आहेत, त्यात संरक्षण, सुरक्षा, व्यापार, जनसंपर्क, शिक्षण, आरोग्य आणि अंतराळ या क्षेत्रांचा समावेश आहे."
"आता हे पाहावं लागेल की, प्रॉडक्टिव्ह असलेल्या कोणत्या क्षेत्रांमधील काम विना अडथळा पुढे सुरू राहील. मात्र जिथे नव्यानं मोठी प्रगती होणार होती, ती बहुधा आता होणार नाही."
ते असंही म्हणतात, "जर व्यापार करार झाला, तर सन्मानजनक अटींसह झाला पाहिजे. भारताच्या हितांना बाधा न येता.
मात्र आता असं वातावरण तयार झालं आहे की, भारत त्याच्या मूलभूत हितांशी तडजोड करू शकत नाही. तसंच असं चित्रही निर्माण होऊ देऊ शकत नाही की भारत ट्रम्प यांना घाबरला आहे."
सीमा सिरोही म्हणतात, "जर तुम्हाला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणात, दृष्टीकोनात काही बदल घडवून आणायचा असेल तर बिगर पारंपअमेरिकेतील सर्वात मोठे मुत्सद्दी रिक पद्धतीनं काम करावं लागेल."
त्या म्हणतात, "प्रयत्नं सुरू आहेत, मात्र अद्याप कोणताही ठोस परिणाम दिसलेला नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























