समुद्रात मासेमारीला गेले, भरकटले, एका बेटावर अडकून पडले आणि मग...

ऑगस्टीन नेम्यूस, तामिळनाडू, मच्छिमार

फोटो स्रोत, vivek r nair

फोटो कॅप्शन, ऑगस्टीन नेम्यूस
Published

तामिळनाडू राज्यात राहणारे दोन मच्छिमार, एडिसन डेव्हिस आणि ऑगस्टिन नेमस यांनी मासेमारीला जाण्यासाठी म्हणून 27 नोव्हेंबरला अरबी समुद्रात बोटी उतरवल्या. ख्रिसमसपर्यंत बोटी बंदराला लागतील असं कुटुंबियांना सांगून ते आपल्या प्रवासाला निघाले.

त्यांना जाऊन आता बरेच आठवडे उलटले होते, पण त्यांचा काहीच थांगपत्ता नव्हता.

एडिसन डेव्हिस आणि ऑगस्टिन नेमस यांनी यांच्यासोबत आणखीन काही मच्छिमार होते. एकूण 15 मच्छिमारांचा ग्रुप समुद्रात गेला होता. त्यांना परतण्यासाठी सुमारे तीन आठवडे लागतील, असा अंदाज होता.

पण तीन आठवडे उलटून गेले तरी यांचा पत्ता नव्हता. बऱ्याचदा मच्छिमारांचा येण्याचा वेळ मागे पुढे होऊ शकतो, आणि त्यांच्या घरच्यांना या गोष्टींची सवय असते. त्यामुळे घरच्यांनाही सुरुवातीला काळजी नव्हती.

पण एव्हाना ख्रिसमसही येऊन गेला. मच्छीमार घरी परतलेच नाहीत. कुटुंबियांमध्ये घबराट वाढू लागली. 2017 साली आलेल्या ओखी चक्रीवादळात दहा मच्छिमारांचा मृत्यू झाला होता.

या लोकांना ओखी चक्रीवादळाचं दु:ख अजूनही विसरता आलेलं नाही. पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला असावा, असा संशय कुटुंबीयांना होता.

2 जानेवारीला मच्छिमार घरी परतले.

ज्या बोटीतून हे मच्छिमार समुद्रात गेले होते त्या बोटीचं इंजिन बिघडलं होतं. त्यामुळे त्यांना ब्रिटिश हिंदी महासागराचा भाग असलेल्या एका दुर्गम बेटाचा आसरा घ्यावा लागला होता. पण काही दिवसांनी ब्रिटीशांच्या एका जहाजाने त्यांची सुटका केली.

पण हे ब्रिटिश जहाज येईपर्यंत या मच्छिमारांनी त्या निर्जन बेटावर जगण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या

शोधल्या. कधी बेटावर असलेल्या शहाळ्याच्या पाण्याने तर कधी पावसाच्या पाण्याने तहान भागवली.

हे मच्छिमार त्या निर्जन बेटावर पोहोचले कसे?

तामिळनाडू, मच्छिमार,

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, मच्छिमारांची यशस्वी सुटका झाली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तामिळनाडूतील थेंगापट्टणम बंदरातून 'कृष्णा मोल' नावाची लाकडी बोट घेऊन हे मच्छिमार समुद्रात उतरले.

समुद्रात गेल्याच्या सातव्या दिवशी या बोटीचं इंजिन बिघडलं. सहाजिकच इंजिन बिघडलं म्हटल्यावर वाऱ्याच्या वेगाने बोट समुद्रात हेलकावे खाऊ लागली. पण अशातही या मच्छिमारांनी पाच दिवस तग धरला. सरतेशेवटी त्यांना एक श्रीलंकन बोट दिसली.

ऑगस्टीन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "त्या श्रीलंकन बोटीने आमच्या बोटीला 8 मीटर (26 फूट) खोल असलेल्या भागापर्यंत ओढत नेलं. आता आम्हाला थोडं सुरक्षित वाटू लागलं, आम्ही तिथं बोटीचा नांगर टाकला."

श्रीलंकन बोटींना भारताच्या समुद्री हद्दीत प्रवेश नसल्याने, बोटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी इतर भारतीय बोटींना वायरलेसच्या साहाय्याने संपर्क साधून मदत मागावी, असा सल्ला त्या श्रीलंकन लोकांनी दिला.

वायरलेसवरून मदत मागून तीन दिवस उलटल्यावर कुठं प्रतिसाद मिळाला.

दुर्दैवाने कृष्णा मोल खेचण्याएवढी क्षमता त्या बोटीत नव्हती. या 15 मच्छिमारांच्या ग्रुपमध्ये कृष्णा बोटीचे मालक सुद्धा होते. त्यांनी बोटीचा गिअरबॉक्स काढून घेतला, जेणेकरून किनाऱ्याला लागल्यावर पुन्हा ती दुरुस्त करून आणता येईल.

बोटीवरच्या कर्मचाऱ्यांनी बोटीचा नांगर सुद्धा काढला जेणेकरून बोट हलकी होऊन नेणं सोपं होईल.

नांगराची दोरी तुटली..

तामिळनाडू, मच्छिमारी

फोटो स्रोत, vivek r nair

फोटो कॅप्शन, एडिसन डेव्हिड

पण 19 डिसेंबरला अचानक वाऱ्याने जोर धरला. बोटीच्या नांगराला बांधलेली दोरी तुटली. तिसऱ्या दिवशी दुसरी दोरीही तुटली. बोट पुन्हा वाऱ्याने हेलकावे खाऊ लागली.

ऑगस्टीन सांगतात, "आम्ही समुद्राच्या मधोमध अडकलो होतो. जिवंत राहण्यासाठी आता देवाकडे धावा करण्याव्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बोट कुठं निघालीय आम्हाला समजत नव्हतं. मला माझ्या नजरेसमोर माझी दोन लहान लेकरं आणि बायको दिसत होती."

एडिसन सांगतात, बोटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नेव्हिगेशन चेक केलं. जीपीएसने 29 नॉटिकल मैल दूर असलेलं एक बेट दाखवलं. हे बेट ब्रिटिश हिंदी महासागरातील सोलोमन बेटांपैकी एक होतं.

कृष्णा बोटीवरील कर्मचाऱ्यांनी बोटीला बांधलेली एक छोटी बोट म्हणजेच डिंगी काढली, यात नऊ मच्छिमार बसले आणि त्या बेटाच्या दिशेने निघाले. त्यांनी सोबत तांदूळ आणि जेवणाचं इतर साहित्य सुद्धा घेतलं.

कृष्णा बोटीत उरलेल्या मच्छिमारांना घेऊन जाण्यासाठी दोन मच्छिमार परत आले पण बोट तिथे नव्हतीच. ती वाऱ्याने हेलकावे खात दुसरीकडे कुठेतरी गेली होती.

एडिसन सांगतात, ही बोट शोधायला जवळपास एक तास गेला.

शेवटी सगळे मिळून कसेतरी त्या बेटावर पोहोचले. तिथे पोहोचायला त्यांना सुमारे पाच तास लागले.

निर्जन बेट

तामिळनाडू, मच्छिमारी

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, होड्या

या बेटावर पोहोचल्यावर आता दुसऱ्या समस्या आ वासून त्यांच्यापुढं उभ्या होत्या. घरी जाण्याची काहीतरी सोय होईपर्यंत त्यांना याच बेटावर राहावं लागणार होतं. बेट तसं निर्जन होतं. त्यांच्याजवळ जेवणाचंही मोजकच सामान शिल्लक होतं.

10 दिवस पुरेल इतकंच जेवणाचं साहित्य त्यांच्याजवळ शिल्लक होतं. शिवाय प्यायला पाणी नव्हतं.

मग या मच्छिमारांनी निसर्गाचीच मदत घ्यायला सुरुवात केली. समुद्राच्या पाण्याचा वापर करून त्यांनी जेवण बनवलं. तहान लागल्यावर बेटावर असलेल्या शहाळ्याच्या पाण्याने तहान भागवली. जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा हे मच्छिमार जमिनीवर प्लास्टिकच्या शिट्स अंथरायचे आणि पाणी जमा करायचे.

ऑगस्टीन सांगतात, "आम्ही मृत्यू अनुभवला होता. तिथं ना झोप येत होती ना पोट भरत होतं. दिवस ढकलण्यासाठी म्हणून पोटाला आधार मिळेल एवढंच अन्न आम्ही खायचो. आता जेवणाचं साहित्य सुद्धा संपत चाललं होतं. आम्ही कुठं होतो, तिथं किती दिवस राहावं लागणार याचा काहीच अंदाज नव्हता."

असेच पाच दिवस गेले. 27 डिसेंबरला दूरवर एक ब्रिटिश जहाज दिसलं.

मदत मिळावी या आशेने मच्छिमारांनी बेटावरील एका झाडाला लाल कापड बांधून ठेवलं होतं.

एडिसन यांनी पुढे सांगितलं की, "जहाजातील लोकांनी आम्हाला पाहावं म्हणून आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले. शेवटी दोन तासांनंतर जहाजातील चार क्रू मेंबर्स फळं आणि पाणी घेऊन आमच्यापर्यंत आले. आम्ही ठीक आहोत का म्हणून आमची विचारपूस केली."

नंतर मच्छीमारांना डिंगीत बसवून ब्रिटिश जहाजापर्यंत नेण्यात आलं.

जहाजावर चढल्यानंतर मच्छीमारांनी अनेक दिवसांनी आंघोळ केली. ब्रिटिश जहाजावरील कर्मचाऱ्यांनी या मच्छिमारांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यांना खाऊपिऊ घालून नवीन कपडे देण्यात आले.

अखेर भारताचा किनारा गाठला..

2 जानेवारी रोजी ब्रिटिश जहाजाने मच्छिमारांना त्रिवेंद्रमजवळील विझिंजम बंदरात भारतीय सुरक्षा दलांच्या स्वाधीन करण्यात आलं.

ओळख पडताळणी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी एक दिवस गेला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

ऑगस्टीन सांगतात की, "मी घरी पोहोचल्यावर माझ्या मुलांनी मला मिठी मारली आणि विचारलं तुम्ही कुठे होता? तुमच्यासोबत काय घडलं होतं? त्यावेळी मी त्यांना एक गोष्ट सांगितली, आमच्या धाडसाची गोष्ट सांगितली. मला आठवतही नाही की, मी त्यांना किती वेळा ही गोष्ट सांगितली. जेव्हा आम्ही त्या बेटावर अडकलो होतो तेव्हा आमच्यातल्या कोणालाच असं वाटलं नव्हतं की आम्ही पुन्हा कधी आमच्या घराकडे परतू."

ऑगस्टीन सांगतात, तो भयानक अनुभव मी कधीही विसरणार नाही आणि यापुढे मच्छिमारीसाठी कधीही दूर समुद्रात जाणार नाही.

पण एडिसन यांना असं वाटत नाही.

ते म्हणतात, "हे माझं काम आहे, हे माझं नशीब आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)