You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, मुंबईतल्या मिठी नदीच्या घोटाळ्याचं हे प्रकरण काय आहे?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
मुंबईत 26 मे 2025 रोजी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या.
मान्सूनपूर्व पावसातच मुंबईकरांची उडालेली तारांबळ पाहता, ऐन पावसाळ्यात काय स्थिती असेल, याचा अंदाज लावण्यास पुरे आहे. या दोन दिवसांच्या पावसानं काही प्रश्नही उपस्थित केले. त्यात प्रामुख्यानं मुंबईतील नालेसफाई आणि मिठी नदी गाळ काढण्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटनांमागे तशी अनेक कारणं असली, तरी प्रामुख्यानं नालेसफाई आणि मिठी नदीची स्वच्छता व्यवस्थित न होणं ही मुख्य कारणं मानली जातात.
त्यात 2017 ते 2021 या वर्षांदरम्यान मिठी नदी गाळ काढण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमधील सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं नाव म्हणजे अभिनेता डिनो मोरिया.
अभिनेता डिनो मोरिया हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. त्यामुळे डिनो मोरियाची देखील आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
अनेक हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केलेल्या डिनो मोरियाचं नाव या प्रकरणात आल्यानं अनेकांना धक्का बसलाय.
डिनो मोरिया काल (26 मे 2025) मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. डिनोची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली.
मिठी नदीतील साफसफाईच्या कथित घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात डिनोला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स जारी केलं होतं. त्यानुसार सकाळी 11 वाजता डिनो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. सायंकाळी 7:30 च्या सुमारास डिनो मुंबई पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला.
डिनोचा भाऊ सँटिनो मोरियाचीही आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केली.
मिठी नदी गाळ उपसाप्रकरणी SIT स्थापन
मिठी नदीच्या गाळ उपसण्याच्या प्रक्रियेत गेल्या 20 वर्षांपासून सुमारे 1200 कोटी रुपयांच्या कथित अनियमितता आणि गैरवापराचा आरोप आहे. विधान परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात चौकशीची मागणी केली होती.
फेब्रुवारी 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या 20 सदस्यांचं विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आलं आहे.
या तपास पथकामध्ये सह पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे.
सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.
नक्की प्रकरण काय आहे?
मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 2005 ते 2021 पर्यंत हा प्रकल्प सुरू होता.
यासाठी 1100 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण 18 कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गाळ काढण्याच्या कंत्राट प्रकरणी यंत्रे आणि गाळ काढण्याची उपकरणे भाड्याने घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे.
या कंत्राटामध्ये अपव्यवहार करण्यात आला आणि मिठी नदीची सफाई व्यवस्थित झाली नसल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी कंत्राटदार, पालिका अधिकारी आणि मध्यस्थ अशा अनेकांची चौकशी करण्यात आली .
आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 471, 120-ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जोशी, कदम आणि पुरोहित मध्यस्थ आहेत.
BMC चे 65 कोटी 54 लाखांचे नुकसान
मुंबईच्या मिठी नदी गाळप्रकरणी आरोपींनी कट रचून पालिकेचे 65 कोटी 54 लाखांंचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणाचा तपास करण्यात सहपोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक विशेष तपास पथकात सहभागी आहेत.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील संबंधित सात ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये चार लोकांना अटक करण्यात आली.
तर मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत सक्त वसुली संचालनालयाकडूनही (ईडी) चौकशी सुरू आहे.
एसआयटीने प्राथमिक चौकशीत एकुण 9 जागांचे सामंजस्य करार (MoU) पडताळणी करण्यात आली.
त्यात काही एमओयूमध्ये कंत्राटदाराच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीने स्वाक्षरी केलेली आहे, काही एमओयूवर कंत्राटदाराची स्वाक्षरीच नाही, काही एमओयूवर तारीख टाकण्यात आलेली नाही.
या एमओयूबाबत जागा मालकांकडे चौकशी केली असता त्यांनी असे कोणतेही करार केलेले नसल्याचे सांगितले. तर काहींनी करारावरील स्वाक्षरी त्यांची नसल्याचे व त्यांच्या जागेवर गाळ टाकण्यात आला नसल्याचे सांगितले आहे.
यावरुन कंत्राटदार कंपन्या अॅक्युट डिझाईन्स, कैलास कंन्स्ट्रक्शन कंपनी, 3) एन.ए. कन्स्ट्रक्शन 4) निखील कंन्स्ट्रक्शन कंपनी 5) जे.आर.एस इन्फ्रास्ट्रक्चर यांनी खोटे आणि बनावट एमओयू सादर केले, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
तसेच, महानगरपालीकेच्या पर्जन्य जल वाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सत्यता पडताळणी न करता कंत्राटदारांशी संगनमत केल्याचा आरोप आहेत.
त्यातील करार करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा 20 वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
मॅटप्रॉप कंपनीने मिठी नदीचा दौरा करून महापालिका अधिकाऱ्यांना केरळ व दिल्ली येथे गाळ काढणी यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवले.
सप्टेंबर 2020 मध्ये महापालिकेचे उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे, तायशेट्टे, प्रशांत रामुगडे आदी अधिकाऱ्यांनी दौरा केला. त्यानंतर या कामासाठी केवळ मॅटप्रॉपच्या मशीनच आवश्यक आहेत असा अहवाल सादर केला.
तसेच तीन कोटीची मशीन खरेदी करण्यापेक्षा ती चढ्या भावाने भाडेतत्त्वावर घेण्याची शिफारस केली. त्यामुळे कंत्राटदार कंपन्यांना केवळ याच कंपनीकडून मशीन घ्याव्या लागल्या. सुरूवातीला त्याचे भाडे आठ कोटी रुपयांपर्यंत भाडे दाखवण्यात आले, त्यानंतर ते 4 कोटीवर ठरले.
2021-22 मध्ये या मशीनसाठी दर वाढवून सादर करण्यात आले. सुरूवातीला 1609 रुपये प्रति टन दर होते. ते चढ्या भावाने म्हणजे 2193 व 2366 रुपये प्रति टन दर आकारण्यात आला त्यामुळे 17 कोटी 7 लाख रुपयांचा महापालिकेचा अतिरिक्त खर्च झाला असे दाखवण्यात आले.
हे सर्वांच्या संगनमताने झाले असल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळे याप्रकरणी अधिकारी, कंत्राटदार, मध्यस्थ आणि यांच्याशी संबंधित असणारे सर्व व्यक्तींची सध्या चौकशी सुरू आहे.
मिठी नदीतील गाळ किती आहे, याचे कोणतेही वैज्ञानिक परीक्षण झाले नाही.
केवळ उपअभियंत्यांच्या अंदाजावर हे प्रमाण निश्चित करण्यात आले आणि त्यानुसार निविदा रकमेत वाढ करण्यात आली. त्याचा फायदा कंत्राटदारांना झाला आणि प्रत्यक्षात मात्र गाळ काही काढण्यात आला नाही असे असे आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीत समोर आले आहे.
डिनो मोरियाचा या प्रकरणाशी काय संबंध?
मिठी नदीच्या कथित घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमनं बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेकदा फोनवरून संभाषण केल्याचे पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत.
त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी मोरियाची चौकशी सुरू केली आहे. मुख्य आरोपीसोबत डिनो आणि त्याच्या भावाचं काय संभाषण झालं होतं? याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.
आरोपीचे कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या काही नोंदीत डिनोचं नाव असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस विविध अँगल्सने डिनो मोरिया याची चौकशी करत आहेत.
आर्थिक गुन्हे शाखा उपयुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सांगितलं की, "याप्रकरणी अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ व दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसआयटीकडून मुंबईत सात ठिकाणी छापे टाकण्यात आले, यामध्ये काहींना अटक करण्यात आली आहे. तर यामध्ये अधिक तपास सुरू आहे."
याप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला असता अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही.
मोरीया यांच्याकडून किंवा त्यांच्या टीमकडून अधिकृत प्रतिक्रिया आल्यास यात अपडेट करण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)