निसर्गाच्या सान्निध्यात फक्त 20 मिनिटं आणि आरोग्याला होतो मोठा फायदा, जाणून घ्या त्यामागची 4 कारणं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, यास्मीन रूफो
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
बागेत फेरफटका मारल्यावर किंवा जंगलात फिरल्यावर तुम्हालादेखील शांत वाटतं का? मन प्रसन्न होतं का? मग ही फक्त तुमची मानसिक अवस्था नाही किंवा फक्त तुम्हालाच तसं वाटत नाही, तर यामागे विज्ञान आहे.
बाहेरच्या मोकळ्या वातावरणात राहिल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. उदाहरणार्थ, तणाव वाढवणारे हार्मोनचं शरीरातील प्रमाण कमी होतं, रक्तदाब संतुलित होतो आणि पचनशक्ती चांगली होते.
हे सर्व फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला तासनतास ट्रेकिंग करण्याची आवश्यकता नाही. निसर्गात फक्त 20 मिनिटं राहिल्यावर हा परिणाम होऊ शकतो.
म्हणजेच दुपारी जेवल्यावर बागेत फिरायला जाणं आणि कधी-कधी बाकड्यावर बसून सँडविच खाणं, याचादेखील तुमच्या शरीर आणि मनाला फायदा होऊ शकतो.
निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यामुळे तुमच्या आरोग्याला कसा फायदा होतो, यामागची चार कारणं जाणून घेऊयात.

तुम्ही जेव्हा हिरवीगार झाडं पाहता. पाइन किंवा इतर कोणत्याही झाडांचा सुगंध अनुभवता, पानांच्या सळसळण्याचा आवाज आणि पक्षांचा किलबिलाट ऐकता, तेव्हा तुमचं ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टम म्हणजे कोणताही विचार न करता अनेक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शरीरातील नसांची व्यवस्था, लगेचच सक्रिय होते.
हा अनुभव किंवा हाच परिणाम तुम्हाला तुमच्या जवळपासच्या बागेत किंवा पार्कमध्ये फेरफटका मारल्यावर देखील मिळू शकतो.
बॅरोनेस कॅथी विलिस, ऑक्सफर्ड विद्यापीठात बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेचे प्राध्यापक आहेत.
त्यांनी बीबीसी रेडिओ 4 च्या 'व्हॉट्स अप डॉक्स' पॉडकास्टमध्ये सांगितलं की, "यातून आम्हाला शरीरात अनेकप्रकारचे बदल होताना दिसतात. उदाहरणार्थ रक्तदाब संतुलित होणं, ह्रदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता कमी होणं आणि ह्रदयाची धडधड कमी होणं असे परिणाम दिसतात. हे सर्व शरीर शांत होण्याची चिन्हं आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटनमध्ये जवळपास 20 हजार लोकांवर एक अभ्यास करण्यात आला होता. त्यात आढळलं की जे लोक दर आठवड्याला किमान 120 मिनिटं हिरवळीवर घालवतात, त्यांच्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याची शक्यता कितीतरी अधिक होती.
निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचे फायदे इतके स्पष्ट आहेत की अनेक ठिकाणी 'ग्रीन सोशल प्रिस्क्राइबिंग' उपक्रम सुरू झाले आहेत. म्हणजेच लोकांना निसर्गाशी जोडणं. जेणेकरून त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल.
सुरुवातीच्या टप्प्यात या प्रयोगातून आनंद आणि आरोग्य या दोघांच्या बाबतीत फायदा होत असल्याचं दिसून आलं.

जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता, तेव्हा तुमची हार्मोनल सिस्टमदेखील या विश्रांतीच्या प्रक्रियेचा एक भाग होते.
प्राध्यापक विलिस म्हणतात की, निसर्गात किंवा बाहेर मोकळ्या वातावरणात राहिल्यामुळे शरीरातील एंडोइनक्राइन सिस्टम सक्रिय होते. तसंच तणाव वाढवणाऱ्या कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालिनसारख्या हार्मोनची पातळी कमी होऊ लागते.
एका अभ्यासातून असं आढळलं आहे की, जे लोक लागोपाठ तीन दिवस हॉटेलच्या खोलीत जपानी सायप्रस म्हणजे हिनोकी ऑईलच्या सुंगधात राहिले, त्यांच्या शरीरातील ॲड्रेनालिन हार्मोनची पातळी बरीच खाली आली आणि रक्तातील नैसर्गिक किलर सेल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
नैसर्गिक किलर सेल्स म्हणजे अशा पेशी ज्या शरीरातील विषाणूंशी लढतात. अभ्यासातून आढळलं की सुंगधाच्या संपर्कात आल्यानंतर दोन आठवड्यांपर्यंत शरीरातील या पेशींची पातळी वाढलेली होती.

युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयमधील प्राध्यापक मिंग कुओ म्हणतात, "निसर्ग त्या भागाला शांत करतो, ज्याला शातंतेची आवश्यकता असते आणि त्याला भागाला मजूबती देतो, ज्याला मजबूत होण्याची आवश्यकता असते."
त्या म्हणतात की, निसर्गाच्या सान्निध्यात तीन दिवस राहिल्यानंतर त्याचा विषाणूंशी लढण्याच्या आपल्या व्यवस्थेवर खोलवर परिणाम होतो. एक महिन्यानंतर देखील ती सामान्यपेक्षा जवळपास 24 टक्के अधिक सक्रिय राहते.
त्यांनी असंही सांगितलं की थोड्या कालावधीसाठी निसर्गात राहिल्यामुळे देखील छोट्या प्रमाणात मात्र कायमस्वरुपी परिणाम होतो.

निसर्गाला पाहणं किंवा त्यातील वेगवेगळे आवाज ऐकणं हे जितकं परिणामकारक असतं, तितकंच परिणामकारक असतं निसर्गाचा सुगंध अनुभवणं.
झाडांच्या आणि मातीच्या सुगंधात अनेकप्रकारचे जैविक घटक असतात. ते रोप किंवा झाडांमधून निघतात आणि तुमच्या श्वासांद्वारे शरीरात जातात. त्यातील काही अणू थेट तुमच्या रक्तात जातात.

फोटो स्रोत, Getty Images
विलिस सांगतात की पाइन वृक्ष हे त्यांच उत्तम उदाहरण आहे. त्या म्हणाल्या, "पाइनच्या जंगलाचा सुगंध फक्त 90 सेकंदात तुम्हाला शांत करू शकतो. हा परिणाम जवळपास 10 मिनिटं राहतो."
तुम्हाला वाटेल की ही शांतता किंवा विश्रांती फक्त मानसिक स्वरुपाची आहे. मात्र एका अभ्यासातून असं आढळलं आहे की खूप लहान मुलं, ज्यांना कोणताही सुंगध लक्षात नसतो, ते देखील खोलीत 'लिमोनीन' नावाची शांतता देणारा सुगंध पसरवल्यानंतर शांत झाले.

निसर्गामुळे फक्त मनालाचा शांतता, विश्रांती मिळत नाही तर, शरीरातील सूक्ष्मजीवांची व्यवस्था म्हणजे मायक्रोबायोमदेखील मजबूत होतं. माती आणि रोपट्यांमध्ये असलेले जिवाणू आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.
विलिस म्हणतात, "हे चांगले जिवाणू असतात. यांच्यासाठी आपण प्रोबायोटिक औषधं किंवा पेयांवर पैसे खर्च करतो."

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक मिंग कूओ यांनी या जिवाणूंमुळे संसर्गाची शक्यता आणि मानसिक आरोग्य यांच्यावर होणाऱ्या परिणामावर अभ्यास केला आहे.
त्यांचं म्हणणं आहे की काही नैसर्गिक जिवाणू श्वासाद्वारे आत गेल्यावर मूड चांगला होतो. रोपांमधून निघणाऱ्या अँटीमायक्रोबियल रसायनांना 'फायटोनसाइड्स' असं म्हणतात. ही रसायनं आजारांशी लढण्यास मदत करतात.
संसर्ग वैज्ञानिक डॉ. क्रिस वॅन टुलकेन म्हणतात, "निसर्ग म्हणजे असं वातावरण असतं, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला सक्रिय करतं."
मातीतील हे कण, नाक किंवा तोंडामार्गे शरीरात जावेत म्हणून ते त्यांच्या मुलांना जंगलात मातीत खेळू देतात.

तुम्ही नेहमीच बाहेर जाण्याची आवश्यकता नसते. विलिस म्हणतात की घरी देखील निसर्गाचा झालेला छोटासा स्पर्श परिणामकारक ठरू शकतो.
पांढऱ्या किंवा पिवळ्या गुलाबांसारख्या फुलांचा मेंदूला शांत करणारा परिणाम होतो असं आढळून आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सुगंधासाठी पायनिनसारख्या इसेन्शियल ऑईलचा डिफ्यूजर वापरावा. त्यातून मनाला शांतात, विश्रांती मिळण्यास मदत होते.
मात्र हे शक्य नसल्यास, जंगल किंवा हिरवळीचे फोटो पाहिल्यानंदेखील फायदा होऊ शकतो.
संशोधनातून आढळलं आहे की लॅपटॉपवर निसर्गाचे फोटो पाहिल्यानं मेंदू शांत होऊ शकतो आणि तणाव कमी होऊ शकतो.
प्राध्यापक मिंग कूओ म्हणतात, "निसर्गाचा प्रत्येक छोटा भाग मदत करतो."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























