लाखोंच्या चोऱ्या करायचा, पण सगळी लूट वाटून टाकायचा...कोण होता हा खरा 'रॉबिनहूड'?

- Author, शंकर वरीसेट्टी
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
- Published
तुम्ही रॉबिनहूडबद्दल ऐकलं आहे का?
इंग्रजीमध्ये अशा कथा आहेत ज्यात असे लोक केंद्रस्थानी आहेत, जे श्रीमंतांना लुटतात आणि ती संपत्ती गरिबांना वाटून देतात. त्यांच्यावर अनेक चित्रपट आणि मालिका आल्या.
रॉबिनहूड हे नावही अशाच हॉलिवूड चित्रपटांमुळे गाजले.
आंध्र प्रदेशातील स्टुअर्टपुरम येथील लोक गोकरी नागेश्वर राव नावाच्या चोराला 'टायगर', तर काहीजण त्याला आंध्रचा 'रॉबिन हूड' म्हणतात.
आता टायगर नागेश्वर राव नावाचा एक सिनेमा येत आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेता रवी तेजा नायकाच्या भूमिकेत आहे.
'टायगर' नागेश्वर राव यांची कथा
पोलिसांच्या नोंदीनुसार, गोकरी नागेश्वर राव हा स्टुअर्टपुरममधील सर्वात प्रसिद्ध दरोडेखोरांपैकी एक होता. त्याच्यावर अनेक खटले होते. अनेक चोरींमध्ये तो प्रमुख होता. तो चोरांच्या टोळीचा म्होरक्या असल्याचेही सांगितलं जायचं.
24 मार्च 1980 ला पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वीही तो अनेकवेळा पोलिसांच्या हातून निसटला होता. अखेर 23 मार्च 1980 च्या त्या रात्री तो एका महिलेसोबत असताना पोलिसांनी त्याच्या घराला घेराव घातला.
त्या चकमकीत पोलिसांनी त्याला ठार मारलं आणि 24 तारखेला मृत घोषित केलं.
नागेश्वर राव यांना वयाच्या 27 व्या वर्षी लोकांमध्ये ओळख मिळाली. नागेश्वर राव यांचे बंधू प्रभाकर राव सांगतात की, त्यामागचं कारण त्यांचं 'कर्म' आहे.
"माझ्या वडिलांच्या आधीपासून आमच्या घरातले लोक चोऱ्यामाऱ्या करायचे. आम्हीही अनेक चोऱ्या केल्या आहेत आणि दरोडे टाकले आहेत. माझा धाकटा भाऊ नागेश्वर राव देखील त्याच तालमीत तयार झालेला. पण जे काही कमावलं ते तो सर्वांना दान करायचा. सगळ्यांनी मिळून लुटलं तरी त्यातला वाटा तो सगळ्यांना द्यायचा. त्याने चोरी करायला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन एकर जमीन विकत घेतली होती. आता माझ्याकडे फक्त तितकीच जमीन उरली आहे," असं प्रभाकर राव यांनी स्पष्ट केलं.
सध्या स्टुअर्टपुरममध्ये एका छोट्या घरात राहणाऱ्या प्रभाकर राव यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांनी केलेल्या चोरी लाखोंच्या घरात आहेत आणि त्यांच्या धाकट्या भावानेही त्या लपवण्याचा विचार केला नसता असं त्यांना वाटतं.
लोकांना चोरीचा माल वाटून दिल्यानेच त्यांनी पोलिसांपासून पळून जाण्यास मदत केली आणि शेवटी जेव्हा तो पकडला गेला तेव्हा गोळ्या झाडल्यानंतरही लोकांच्या मनात संतापाची लाट उसळली, असं ते पुढे सांगतात.
बनगानापल्ले दरोड्यामुळे खळबळ

1974 मध्ये आजच्या नंद्याल जिल्ह्यातील बनगानापल्ले येथे एका बँकेवर दरोडा पडला होता. त्यावेळी देशभरात खळबळ उडाली. कडेकोट बंदोबस्त असतानाही दरोडेखोरांनी बँक लुटली. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व दागिने चोरीला गेले. त्यावेळी या दरोड्यात 35 लाख रुपये लुटल्याचं सांगण्यात येतं.
मध्यरात्री बँक फोडून कर्मचाऱ्यांना ठार मारून सर्व संपत्ती चोरून नेल्याची घटना संपूर्ण देशात चर्चेचा विषय झाली.
" बनागनपल्ले दरोड्यात आमच्या टोळीचे एकूण दहा सदस्य सहभागी झाले होते. ती बँक पोलिस ठाण्यासमोर असल्याने आम्ही सर्व खबरदारी घेतली. मध्यरात्री बँकेचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तिजोरी तोडून आम्ही ती स्मशानभूमीत नेली.
त्यात 14 किलो सोनं आणि 50,000 रुपये रोख होती. तेथून ते आणल्यानंतर, टोळीतील सर्व सदस्यांनी ते वाटून घेण्यापूर्वी आमच्या गावाला पोलिसांनी घेरलं. मात्र, नागेश्वर राव पळून गेला. मी आत्मसमर्पण केलं," प्रभाकर राव यांनी बीबीसीला सांगितले.
तुरुंगातून पलायन
नागेश्वर राव 1970 च्या दरम्यान प्रभाकर राव यांच्या टोळीत सामील झाले, जे आधीच अनेक प्रकरणांमध्ये सामील होते. सुमारे 15 वर्षांपासून अनेक मोठ्या चोऱ्यांमध्ये नागेश्वर राव सक्रिय सहभाग होता.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दरोडे टाकूनही तो पोलिसांच्या गोळीबारातून बचावला म्हणून नागेश्वर राव यांच्या अनुयायांनी त्याला 'टायगर' ही उपाधी दिली.
नागेश्वर राव यांनी पोलिसांना गुंगारा दिल्यावर तो अधिक लोकप्रिय होऊ लागला. मात्र यामुळे पोलिसांच्या संतापाला पारावार उरला नाही.
"आम्हाला 1976 च्या सुमारास तामिळनाडूमध्ये अटक करण्यात आली. आम्हा दोघांना वेगवेगळ्या तुरुंगात टाकण्यात आलं. आम्ही कोर्टात हजर राहण्यासाठी भेटलो. तो म्हणाला की, मी तुरुंगात राहू शकत नाही आणि मी पळून जाईन. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याने तुरुंग अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि पळून गेला. तेव्हा तामिळनाडू पोलीस म्हणाले मला सांगितलं की तुझा भाऊ खरोखरच वाघ आहे,” प्रभाकर राव यांनी त्या दिवसाच्या घटना आठवत सांगतात.
स्टुअर्टपुरम नाव सगळीकडे पोहोचले तेव्हा...

1980 च्या दशकापर्यंत स्टुअर्टपुरम हे चोरलुटारुंचं गाव म्हणूनच प्रसिद्ध होतं...स्टुअर्टपुरमचे लोक अनेक टोळ्या तयार करून वेगवेगळ्या भागात चोरी करायचे.
वास्तविक पाहता, स्टुअर्टपुरम हे 1874 च्या सेटलमेंट कायद्यांतर्गत विविध भागात चोरी करणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यासाठी तयार केलेलं गाव होतं. त्यामुळे कुठलाही गुन्हा घडला तरी याच गावातल्या लोकांवर संशय व्यक्त केला जायचा.
1911 ते 1914 या काळात विविध गुन्ह्यांशी संबंधित लोकांना एकत्र करून 'स्टुअर्टपुरम' नावाने स्थायिक करण्यात आलं. तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीचे सदस्य हॅरोल्ड स्टुअर्ट यांच्या नावाने 1913 मध्ये या गावाची स्थापना झाली.
रोजगाराअभावी जे चोर झाले आणि अधिकाधिक गुन्हे केले आहेत ते सर्व एकाच ठिकाणी असल्यास त्यांना निगराणीखाली ठेवता येईल, अशी व्यवस्था या गावात करण्यात आली होती.
'टायगर' नागेश्वर राव समोर आल्यानंतर त्याच्या अनुयायांसह केलेल्या गुन्ह्यांमुळे स्टुअर्टपुरमचं नाव खराब झालं. त्यांना पकडणं पोलिसांसाठीही आव्हानात्मक झालं होतं. जे चोर तयार झाले त्यांच्यात बदल व्हावा म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले होते.
गावाची प्रतिष्ठा पणाला

सुरुवातीच्या ब्रिटिश राजवटीत ख्रिश्चन धर्माद्वारे चोरीवर नियंत्रण ठेवण्याचा काही प्रयत्न केला गेला. परंतु प्रत्येक पिढीचा इतिहास पाहता हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत असंच दिसतंय.
त्यावेळी पोलीस आणि सरकारबरोबरच स्वयंसेवी संस्थाही मैदानात उतरल्या. विशेषत: नास्तिक केंद्राच्या प्रशासक हेमलता आणि त्यांचे पती लवणम यांच्या प्रयत्नांमुळे काहींमध्ये बदल झाला.
प्रभाकर राव आणि इतरांनी हेमलता आणि त्यांचे पती लवणम यांसारख्या लोकांवर विश्वास टाकला आहे, ज्यांनी 1970 च्या दशकापासून स्टुअर्टपुरममध्ये सारख्या मोठ्या दरोड्यांनंतर प्रयत्न सुरू केले.
बगानपल्ला येथे 1970 च्या दशकानंतर झालेल्या दरोड्यानंतर हेमलता आणि त्यांचे लवणम यांनी तिथे सुधारणेसाठी बरेच प्रयत्न केले.
तुरुंगात असताना या दोघांनी नागेश्वर राव यांची भेट घेतली आणि पत्रांच्या माध्यमातून त्यांच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. स्टुअर्टुपरमच्या इतिहासावर संशोधन करणाऱ्या कोमपल्ली सुंदर यांनी सांगितले की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्यांना जमीन आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि उपजीविकेसाठी केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसून आले.
"हेमलता आणि लावणम यांच्या अथक परिश्रमामुळे स्टुअर्टपुरममध्ये बदल झाला आहे. सुरुवातीला सर्वांना वाटले की प्रभाकर रावांबरोबरच नागेश्वर राव यांच्यातही काही बदल होत आहे. पण समाजाकडून त्यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही.
मागील गुन्ह्यांमुळे नागेश्वर रावच्या जीवनाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या प्रयत्नांना लगेच अडथळा निर्माण झाला. शेवटी तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळला आणि पोलिसांच्या गोळीबारात त्याचा बळी गेला,” प्रभाकर राव यांनी बीबीसीला सांगितलं
जखमा पुन्हा उगाळू नका

स्टुअर्टुपुरवर यापूर्वी अनेक चित्रपट आले आहेत. चोरीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दुसरीकडे, टॉलीवूडनेही दरोडेखोरांची चरित्रे दाखवण्याची बॉलीवूड संस्कृती स्वीकारली असून 'टायगर' नागेश्वर राव या नावाने चित्रपट तयार केला आहे.
हा चित्रपट वामसी कृष्णा दिग्दर्शित करत असून शूटिंगच्या टप्प्यात आहे. नागेश्वर राव यांच्या कथेवर चित्रपट बनत असताना स्टुअर्टुपुरममधील रहिवाशांची वेगवेगळी मते आहेत.
प्रभाकर राव यांनी बीबीसीला सांगितले की, "चित्रपट युनिटने माझ्याशी चर्चा केली. त्यांनी तपशील विचारला. पण आवश्यकतेनुसार चित्रपटात काही गोष्टी टाकण्याची शक्यता आहे. पण इतिहासाचा विपर्यास होऊ नये असं मला वाटतं," प्रभाकर राव यांनी बीबीसीला सांगितलं.
"जेव्हा आम्ही स्टुअर्टपुरममध्ये शिकलो होतो, तेव्हा लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. एक चुकीची धारणा होती. आता ती कमी होत आहे. गावात अनेक बदल झाले आहेत. अनेक लोक आहेत ज्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे आणि अनेक ठिकाणी स्थायिक झाले आहेत. आता स्टुअर्टपुरममधील जुनी आणि नवी पिढी जुन्या जखमा विसरली आहे,” शारदा म्हणाल्या.
शारदा या गावातील रहिवासी आहेत.
तिने सांगितले की, ती सध्या चेन्नईमध्ये आयटी क्षेत्रात काम करत आहे. अशा चित्रपटांमुळे गैरसमज निर्माण होण्याचा धोका आहे, अशी चिंता तिने बीबीसीकडे व्यक्त केली.
1990 च्या दशकापर्यंत चोरांचे घर असलेल्या स्टुअर्टुपुरम गावात नंतर परिस्थिती बदलली. जे तरुण सुशिक्षित झाले आहेत ते नोकरीत स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टुअर्टपुरममध्ये आता गुन्हेगारी कमी झाली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























