'चिन्मय मांडलेकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला, पण त्याहून व्यापक भूमिका घेणं गरजेचं'

चिन्मय मांडलेकर-हमीद दाभोलकर

फोटो स्रोत, Facebook

    • Author, डॉ हमीद दाभोलकर
    • Role, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
  • Published

सिने-नाटक कलाकार चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या पत्नी नेहा जोशी-मांडलेकर यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ ठेवले म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

या विषयी त्या दोघांनी ही सोशल मीडियावर त्यांची मते मांडत, ट्रोलिंगविषयी भावना व्यक्त केल्या.

गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या समाजात धर्माच्या नावावर लोकामध्ये भेद करून इतर धर्माच्या माणसांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसत आहे.तसेच दुसऱ्याला त्रास देऊन त्यामधून विकृत आनंद घेण्याची प्रवृत्तीदेखील वाढलेली दिसत आहे.

आता हा विषय, केवळ ठोस सामाजिक राजकीय भूमिका घेणाऱ्या लोकांच्या पुरता मर्यादित राहिलेला नसून, सगळ्या समाजाला त्याची झळ पोहोचू लागलेली आहे.

एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाला या विषयी विचारपूर्वक भूमिका घ्यायला शिकणे आवश्यक झाले आहे.

जहांगीरच्या नावाच्या निमित्ताने झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपण अशी भूमिका घेणे का आवश्यक आहे? आणि ही भूमिका घेताना काय काय मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत याचा थोडा खोलात जाऊन विचार करण्याचा प्रयत्न करूया.

आपल्या मुलाचे नाव काय असावे हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार

कुणी काय खावे? कुणी काय प्यावे? आपल्या मुलाचे नाव किंवा स्वत:चे आडनाव काय ठेवावे? कुणी कुठे राहावे? कोणाची जोडीदार म्हणून निवड करावी? हे सगळे खरे तर भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकार आहेत. असे असले तरी गेल्या दहा वर्षात ह्या सगळ्या गोष्टींना राष्ट्रीय महत्त्वाचे विषय म्हणून ते जाणीव पूर्वक तापवले जात असल्याचे आपण पाहात आहोत.

‘धर्म खतरेमे’ असल्याचा दावा करून, यामध्ये आणखी आगीत तेल ओतण्याचे कामदेखील करणारी एक यंत्रणा निर्माण झालेली आहे. यापूर्वी अशा गोष्टी घडत नव्हत्या असे नाही, पण त्याला ज्या स्वरूपाचे संघटित रुप आले आहे ते कोणाही संवेदनशील व्यक्तीच्या अंगावर येणारे आहे.

सोशल मीडियामुळे निनावी किंवा नाव बदलून एखाद्या व्यक्तीला ट्रोल करणे हे अगदी सोपे झाले आहे. मुलाचे नाव जहांगीर ठेवले म्हणून ह्याच ट्रोल्सनी चिन्मय आणि नेहा जोशी-मांडलेकर यांना भरपूर त्रास दिल्याने त्यांना उद्वेग वाटणेदेखील स्वाभाविक आहे.

आपल्या मुलाचे नाव काय ठेवावे हा त्यांचा घटनादत्त मुलभूत अधिकार आहे. त्याची गळचेपी होत असताना चिन्मय नेहा आणि जहांगीर यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणे हे आपले कर्तव्यच आहे आणि ते आपण सर्वांनी जरूर करायला हवे.

पण त्याच वेळी हे देखील लक्षात घेतले पाहिजे की या प्रश्नाला केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोचाची एकच बाजू नाही.

चिन्मय मांडलेकर

फोटो स्रोत, HTTPS://WWW.INSTAGRAM.COM/NEHACHINMAYMANDLEKAR/

आपल्या जात-धर्मविषयक भूमिका,आपले व्यापक सामाजिक-राजकीय आकलन आणि भूमिका या देखीलवरील प्रश्नाशी थेट जोडलेल्या आहेत. त्या कशा ते पण समजून घेण्याचा प्रयत्न करू.

नाव-आडनावासोबत जाती आणि धर्माचे संदर्भ

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यामधला पहिला मुद्दा म्हणजे आपल्या व्हीडिओची सुरुवात करताना नेहा जोशी-मांडलेकर आपली माहेरची आणि सासरची जात सांगतात. याचा एक अर्थ नेहा जोशी-मांडलेकर यांच्या माहेरच्या आणि सासरच्या जातींच्याशिवाय इतर जातीतील लोकांना ट्रोल केले तर चालेल असा देखील निघू शकतो.

प्रत्यक्षात नाव आणि आडनाव यांना आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात धर्माच्यासोबत जातीचे संदर्भ देखील जोडले गेले आहेत, हे आपण दुर्लक्षित करू शकत नाही.

जाता-जाता, याचीदेखील आपण नोंद घेतली पाहिजे की भटक्या विमुक्त जमातीतील आणि आदिवासी समाजातील टायर, रिकामी, नकोशी, वजन, इम्पेरीयल अशा नावांनी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत किंवा त्यामुळे आपला धर्म अवनत होतो असे देखील कुणाला वाटत नाही.

तसेच पुढे जाऊन त्या सांगतात की जहांगीर हे नाव मुस्लीम नसून पारशी आहे. हे सांगणे आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठीच्या प्रयत्नात आणि भावनेच्या भरात झाले असू शकते.

पण त्याचा अर्थदेखील म्हणजे परत मुस्लीम नाव असेल तर ट्रोलिंग चालेल, पण पारशी नावाला काय ट्रोल करायचे? असादेखील अर्थ लागू शकतो ज्या कालखंडात मुसलमानांना टार्गेट करणे आणि या विरोधात बोलणाऱ्या लोकांना धर्मद्रोही आणि देशद्रोही ठरवणे हा एक प्रमुख अजेंडा असतो, त्यावेळेस अशी विधाने आपण अधिक काळजीपूर्वक केली पाहिजेत.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

असाच तिसरा मुद्दा आहे चिन्मय मांडलेकर याने मी आता या पुढे शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही या घोषणेचा.

खरे तर शिवाजी महाराजांचे असंख्य विश्वासू सहकारी मुस्लीम होते ह्याची इतिहासात नोंद आहे. केवळ तेवढेच नाही तर शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचे बंधूंचे नाव शरीफजी होते.

या देशात मुस्लिमांचे सरसकट द्वेष करण्यासाठी इतिहासाची मोडतोड करून शिवाजी महाराजांच्या नावाचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला करण्यात आला हे वास्तव आहे.

या प्रकाराला पाठबळ देणाऱ्या गोष्टींच्यामध्ये चिन्मय मांडलेकर याने शिवाजी महाराजांची भूमिका केलेले बहुतांश सिनेमे आले हे देखील खेदाने नमूद करायला हवे. त्यामुळे आपल्याला व्यवसायाला सोयीचे तेथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि बाकीच्या वेळी मात्र द्वेषाला बळ देणाऱ्या भूमिका करणे या मधला विरोधाभास आहे हे आपण समजून घेणे आवश्यक आहे.

या तिन्ही गोष्टींचा विचार एकत्रित केला तर आपल्या हे लक्षात येऊ शकते की,सकृतदर्शनी तरी चिन्मय मांडलेकर आणि नेहा जोशी-मांडलेकर हे या गोष्टीकडे केवळ आपल्या अभिव्यक्तीच्या हक्कावर आलेली गदा म्हणून बघत आहेत, पण त्या विषयाचे व्यापक राजकीय-सामाजिक संदर्भांचा त्यांनी फारसा खोलात विचार केलेला दिसत नाही.

नाव ठेवण्याच्या प्रक्रियेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सोबत जातवास्तव, वर्ग वास्तव आणि धर्माचे संदर्भ हे सगळे आहे.

व्यापक दृष्टिने विचार आवश्यक

खरे तर आपण सगळ्यांनीच याचे भान ठेवणे आवश्यक आहे, पण वेगळा रस्ता चोखाळू इच्छिणाऱ्या लोकांनी तर हे भान ठेवायलाच हवे.

जर तुम्ही स्टालिनच्या रशियामध्ये राहात असाल तर तुमची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई ही विचारधारेच्या नावावर केलेल्या दमनशाही विरोधात भूमिका घेतल्या शिवाय पुढे जाऊ शकत नाही तसेच सध्याच्या भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई ही संघटीत धर्मकारण आणि जातव्यवस्था यांना टाळून पुढे जाऊ शकत नाही.

माझे वडील डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि आई डॉ. शैला दाभोलकर यांनी विचारपूर्वक माझे नाव हमीद ठेवले. ते मुस्लीम धर्मातील एक महत्वाचे धर्म सुधारक हमीद दलवाई यांच्या नावावरून ठेवले होते. माझे नाव हमीद ठेवण्यावरुन तेव्हाही गदारोळ झाला होता.

माझ्या नावाच्याच अनुषंगाने मी माझी भूमिका मांडणारा 'माझ्या हमीद असण्याचा अर्थ' हा लेख साधना युवा दिवाळी 2016 अंकात मी लिहिला होता.

सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतील अनेक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आपल्या मुलामुलींची नावे ठेवली त्यांना त्यावेळी देखील कमी अधिक प्रमाणात त्रासाला सामोरे जायला लागले आणि आजदेखील लागते. पण ती नावे एका व्यापक समाज निर्मितीच्या स्वप्नाशी जोडली होती त्यामुळे अशी प्रत्येक चर्चा त्या अनुषंगाने समाजात होणाऱ्या घुसळणीची संधी होती.

आज पैगंबर शेखसारखे मुस्लीम धर्मसुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असलेला तरुण सर्व विरोध सहन करुन आपल्या मुलीचे नाव ‘आकांक्षा’ ठेवतो हा एक मोठा क्रांतिकारी बदल यामधून होताना दिसत आहे.

पैगंबर शेख/FACEBOOK

फोटो स्रोत, पैगंबर शेख/FACEBOOK

या पार्श्वभूमीवर चिन्मय आणि नेहाला किंवा चिन्मय आणि नेहाच्या वाटेने जाऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना हा व्यापक सामाजिक राजकीय विचार करावा लागेल असे मला वाटते.

जर भूमिकाच घ्यायची असेल तर केवळ त्रागा म्हणून मी इथून पुढे शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही अशी भूमिका घेण्यापेक्षा मी चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अथवा समाजात द्वेष पसरवणाऱ्या इतर कोणत्याही भूमिका करणार नाही अशी भूमिका कदाचित जास्त संयुक्तिक होईल.

नावात बरेच काही आहे. यापलीकडे जाऊन आपल्या दृष्टीने ह्या प्रकरणातील एक मोठा धडा असा की आपण जाणते-अजाणतेपणाने अथवा तात्कालिक फायद्या साठी इतिहासाचे विकृतीकरण करणे, जाणीवपूर्वक द्वेष पसरवणे, ‘आपली ती अभिव्यक्ती! दुसर्याचे ते ट्रोलिंग!’ ही प्रवृत्ती, कोणत्याही बाजूने थेट पोलरायजेशन वाढवणारी भाषा या पासून आपल्याला विचारपूर्वक दूर व्हायला पाहिजे.

‘लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है हे’ या राहत इंदोरी यांच्या ओळी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत.