ओम राजेनिंबाळकर : वडिलांच्या मृत्यूनंतर अचानक राजकीय प्रवेश ते उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' पर्यंतचा प्रवास

फोटो स्रोत, FB/omprakashrajenimbalkar
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (ओम राजेनिंबाळकर) यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क सुरू होते.
रविवारी त्यांच्या गोवर्धनवाडी गावात कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
राजेनिंबाळकर यांनी हा निर्णय विकासकामांना गती देण्यासाठी घेत असल्याचं सांगितलं.
मात्र त्यांच्या या निर्णयामुळे केवळ पक्षीय समीकरणेच बदलणार नाहीत, तर धाराशिव जिल्ह्यातील अनेक वर्षांची राजकीय स्पर्धा आणि नातेसंबंध पुन्हा चर्चेत आले आहेत.
राजकारणात अचानक प्रवेश
ओम राजेनिंबाळकर यांचा राजकारणातील प्रवेश नियोजित नव्हता. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातील प्रभावी काँग्रेस नेते होते.
3 जून 2006 रोजी नवी मुंबईजवळील कळंबोली परिसरात त्यांची आणि त्यांचे चालक समद काझी यांची हत्या झाली.
या हत्याकांडाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणात तत्कालीन खासदार आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप झाले होते.
ज्यावेळी पवनराजेंची हत्या झाली होती त्यावेळी पद्मसिंह पाटील हे आमदार होते. 2009 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले.
त्यानंतर त्यांच्यावर आरोप दाखल झाले आणि त्यांना जुलैमध्ये अटक झाली होती.
विशेष म्हणजे पवनराजे आणि पद्मसिंह पाटील हे सख्खे चुलत भाऊ होते. नुकतीच या प्रकरणातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली.
राजकीयदृष्ट्या दोघेही एकेकाळी जवळचे मानले जात होते. पद्मसिंह पाटील मुंबईत सक्रिय असताना जिल्ह्यातील राजकीय जबाबदारी मोठ्या प्रमाणावर पवनराजे निंबाळकर सांभाळत होते.
मात्र कालांतराने दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि ते उघड राजकीय संघर्षात बदलले.
2004 ची निवडणूक आणि वाढलेला संघर्ष
पवनराजे निंबाळकर यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून पद्मसिंह पाटील यांना थेट आव्हान दिलं होतं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांचा अवघ्या 486 मतांनी विजय झाला होता.
या निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला. पुढे पवनराजे काँग्रेसमध्ये गेले. मात्र 2006 मधील त्यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळालं.
त्यावेळी अभियंता होण्याचं स्वप्न पाहणारे ओम राजेनिंबाळकर अवघे 22 वर्षांचे होते.
वडिलांच्या निधनानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडून गावी परतावं लागलं आणि याच टप्प्यावर त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली.
स्थानिक निवडणुकांमधून नेतृत्वाची चुणूक
वडिलांच्या मृत्यूनंतर ओम राजेनिंबाळकर यांनी स्थानिक राजकारणातून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या नेतृत्वाखाली तेरणा सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवल्या गेल्या.
या दोन्ही ठिकाणी त्यांना यश मिळालं. त्यामुळे ते जिल्ह्यातील प्रभावी युवा नेते म्हणून उदयास आले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अस्तित्वात होती. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती.
याच पार्श्वभूमीवर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली.
या निवडणुकीत त्यांनी पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांचा 16 हजारांहून अधिक मतांनी पराभव करत पहिल्यांदाच विधानसभा गाठली.
मात्र 2014 मध्ये परिस्थिती बदलली. राज्यात आणि देशात मोदी लाट असतानाही राणा जगजितसिं पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत ओम राजेनिंबाळकर यांचा 10 हजार 806 मतांनी पराभव केला.
'लोकसभेत दमदार पुनरागमन'
2014 ते 2019 या काळात राजेनिंबाळकर फारसे सक्रिय दिसले नाहीत, अशी टीका विरोधकांकडून होत होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दमदार पुनरागमन केलं.
राणा जगजितसिंह पाटील यांचा सुमारे सव्वा लाख मतांनी पराभव करत त्यांनी लोकसभा गाठली.

फोटो स्रोत, Facebook/RanaJagjitSingh
त्यानंतर 2024 च्या निवडणुकीत त्यांनी राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा तब्बल सव्वा तीन लाख मतांच्या विक्रमी फरकाने पराभव केला.
या विजयामुळे त्यांची ओळख जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता राज्यस्तरीय नेते म्हणून निर्माण झाली.
ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय
2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष बदलला. मात्र राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
या भूमिकेमुळे त्यांना 'एकनिष्ठ खासदार' अशी प्रतिमा मिळाली. लोकसभा निवडणुकीतही त्याचा फायदा झाल्याचं राजकीय जाणकार मानतात.

फोटो स्रोत, UGC
राजेनिंबाळकर यांची सहज उपलब्ध असणारा खासदार अशी प्रतिमा आहे. मतदारांचे फोन घेणे, प्रशासकीय कामांमध्ये पाठपुरावा करणे आणि आक्रमक भाषणशैली ही त्यांची बलस्थाने मानली जातात.
दुसरीकडे, विरोधक त्यांच्यावर वडिलांच्या हत्येचा मुद्दा वारंवार पुढे करून भावनिक वातावरण तयार करण्याचा आरोप करत आले आहेत.
आता पुढे काय?
दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
रविवारी ओम राजेनिंबाळकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदारसंघातली कामे होण्यासाठी सत्तेचे पाठबळ आवश्यक आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपला निर्णय जाहीर करताना म्हटले.
ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात महायुतीला बळ मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील शिंदे गटाला गेल्या काही काळात अपेक्षित राजकीय ताकद मिळत नव्हती. गटबाजी आणि स्थानिक नेतृत्वातील मतभेद यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद कमी झाल्याचं बोललं जात होतं.
अशा वेळी राजेनिंबाळकर यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळू शकते.
तसेच त्यांचे सहकारी आणि धाराशिवमधील प्रमुख नेते आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
त्यामुळे राजेनिंबाळकर यांच्यासोबत किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी जातात, याकडे लक्ष लागलं आहे.
याशिवाय, शिंदे गटात प्रवेश केला असला तरी राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी असलेला त्यांचा पारंपरिक राजकीय संघर्ष कायम राहणार असल्याचं ओम राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यांच्या प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यातील महायुती अधिक मजबूत होणार की अंतर्गत संघर्ष वाढणार, हा प्रश्न आगामी काळात महत्त्वाचा ठरणार आहे.
ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचं मात्र निश्चित मानलं जात आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)























