मोबाईल काढताना पडल्यामुळे खडकात 'खाली डोकं वर पाय', 7 तासांनी झाली तरुणीची सुटका

फोटो स्रोत, NSW Ambulance
- Author, फ्लोरा डुरे
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
डोंगर दऱ्यांमध्ये किंवा निसर्गात भटकंती करण्याची आवड अनेकांना असते.
यात जितका आनंद असतो तसाच काही वेळा धोका देखील असतो. अगदी काहीजण मोठ्या संकटात देखील अडकतात. असाच एका तरुणीनं जीवावर बेतणाऱ्या संकटाचा सामना केला.
खडकांमध्ये पडलेला मोबाईल फोन काढण्याच्या प्रयत्नात ही तरुणी खडकात अडकली.
सुदैवानं कित्येक तास संघर्ष केल्यानंतर बचाव पथकाच्या मदतीमुळे ती बचावली. नेमकं काय झालं होतं आणि त्या तरुणीला कसं वाचवण्यात आलं हे जाणून घेऊया.
एक तरुणी दोन खडकांच्या आत कित्येक तास अडकल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. डोंगरावर पायी फिरत असताना तिथल्या खडकांमध्ये असलेल्या फटीमध्ये त्या तरुणीचा मोबाईल फोन पडला.
त्यानंतर तो मोबाईल फोन काढण्यासाठी प्रयत्न करत असताना ही तरुणीही या खडकांमधील फटीत घसरली आणि उलट्या अवस्थेत म्हणजे खाली डोकं आणि वर पाय अशा अवस्थेत तिथेच अडकून पडली.
ही घटना ऑस्ट्रेलियातील असून या तरुणीचं नाव मेटिल्डा कॅम्पबेल असल्याचं बातम्यांमधून समोर आलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ती ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या हंटर व्हॅली परिसरात पायी फिरत होती.
हंटर व्हॅली हा ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या उत्तरेस असलेला प्रदेश आहे. हंटर व्हॅलीला ऑस्ट्रेलियातील वाईन्सचं जन्मठिकाण म्हणूनही ओळखलं जातं. हंटरी नदी आणि तिच्या उपनद्यांनी हा प्रदेश बनला आहे. सुंदर आणि निसर्गरम्य प्रदेश म्हणून त्याची ख्याती आहे. त्यामुळे अनेकजण या प्रदेशात भटकंती करतात.
डोंगर किंवा टेकड्यांवरील खडकांमध्ये अनेकदा बारीक फटी असतात आणि त्या खोलवर गेलेल्या असतात.


तीन मीटर खोल फटीत सात तास अडकली
मेटिल्डा कॅम्पबेल हंटर व्हॅलीत पायी फरत असताना दोन खडकांमधील तीन मीटर खोल फटीमध्ये घसरली आणि तिथेच अडकली. ती तिथे थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल सात तास अडकली होती.
हे सात तास मेटिल्डा कॅम्पबेलसाठी एखाद्या अग्निपरीक्षेसारखे होते. तिला तिथून बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन सेवांना एक आव्हानात्मक बचाव मोहीम हाती घ्यावी लागली.

फोटो स्रोत, NSW Ambulance
यासाठी त्यांना खडकांच्या आजूबाजूचे कित्येक मोठाले दगड आणि खडक देखील यंत्राच्या सहाय्यानं हलवावे लागले.
महत्त्वाचं म्हणजे बचाव पथकानं तब्बल 500 किलो (1,100 पौंड) वजनी खडक बाजूला केल्यानंतर देखील त्यांना मेटिल्डा कॅम्पबेलला बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.
कारण ती "S" आकाराच्या एका बेंडमध्ये वक्राकार स्थितीत अतिशय विचित्रपणे अडकलेली होती.
बचावपथका समोरील आव्हान
"पॅरामेडिक म्हणून माझ्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना मी कधीही केला नव्हता. हे काम अत्यंत आव्हानात्मक होतं. मात्र प्रचंड समाधानकारक होतं," असं पीटर वॅट्स म्हणाले. ते न्यू साऊथ वेल्स (NSW)अॅम्ब्युलन्स सेवेत पॅरामेडिक आहेत. त्यांचं हे वक्तव्यं या अॅम्ब्युलन्स सेवेच्या सोशल मीडिया पेजवरील प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलं आहे.
(पॅरामेडिक म्हणजे डॉक्टर नसलेली मात्र जखमी किंवा आजारी लोकांना हाताळण्याचं प्रशिक्षण असलेली व्यक्ती)
बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी एक तासाहून अधिक काळापासून मतिल्डा कॅम्पबेल खडकातील त्या फटीत उलटी अडकलेली होती. तिच्या मित्रांनी सुरुवातीला त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले होते. मात्र ते अपयशी ठरले होते.
न्यू साऊथ वेल्स अॅम्ब्युलन्स सेवेनं या घटनेचे फोटो शेअर केले आहेत. त्यात मेटिल्डा कॅम्पबेल दोन खडकांच्या मधल्या फटीत पायावर उलटी लटकत असलेली दिसते.

फोटो स्रोत, NSW Ambulance
तरुणीला बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन सेवेच्या बचाव पथकानं आजूबाजूचे खडक बाजूला सरकवले. जेणेकरून तिला बाहेर काढण्याइतपत मोकळी जागा तयार होऊ शकेल.
मात्र हे प्रयत्न अत्यंत गुंतागुंतीचे आणि किचकट स्वरुपाचे होते. कारण असं करत असताना तिथले आजूबाजूचे खडक स्थिर राहावेत, तिथे काही पडझड होऊ नये याची देखील त्यांना खबरदारी घ्यावी लागत होती.
पीटर वॅट्स यांनी नंतर ऑस्ट्रेलियाच्या एबीसीला दिलेल्या मुलाखतीत मेटिल्डा यांचं वर्णन "लढवय्यी, शूर" असं केलं.
"आम्ही तिला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर आम्हा सर्वांच्या मनात विचार आला की, ती तिथे अडकली तरी की आणि आपण त्यांना तिथून बाहेर कसं काढायचं?" असं त्यांनी नमूद केलं.
फोन गेला पण जीव वाचला
महत्त्वाची बाब म्हणजे इतक्या विचित्र स्थितीत कित्येक तास अडकल्यानंतर देखील मेटिल्डा कॅम्पबेलला किरकोळ खरचटलं होतं आणि किरकोळ जखम झाली होती, असं न्यू साऊथ वेल्स (NSW) अॅम्ब्युलन्स सेवेनं सांगितलं.
अर्थात इतकं सर्व होऊनही मेटिल्डा कॅम्पबेलला तिचा फोन काही परत मिळवता आला नाही.
मेटिल्डा कॅम्पबेलने तिचा जीव वाचवल्याबद्दल न्यू साऊथ वेल्स अॅम्ब्युलन्स सेवेच्या बचाव पथकाचे आभार मानले आहेत.
"मला या संकटातून वाचवल्याबद्दल बचाव पथकाला धन्यवाद! तुम्ही खरोखरच जीवन वाचवणारे आहात," असं मेटिल्डा कॅम्पबेलने एका ऑनलाईन मेसेजमध्ये लिहिलं आहे.
"फोनबद्दल खूप वाईट वाटलं, तरी जीवापेक्षा तो मोठा नाही," असंही मेटिल्डाने नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























