पुराणांनुसार महाशिवरात्रीचे महत्त्व काय? व्याध म्हणजे लुब्धकाची आख्यायिका काय आहे?

महाशिवरात्री
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आज महाशिवरात्री आहे. शिवरात्रीच्या शाही स्नानानंतर आज महाकुंभाची देखील सांगता होईल.

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे.

महाशिवरात्री हा हिंदू त्रिमूर्तीपैकी एक देव असलेल्या आणि ब्रह्मांडाचा नाश करणाऱ्या शिवाला समर्पित असणारा हिंदू सण आहे.

रात्र आणि दिवस

भारतीय कालगणनेत एखाद्या महिन्यात चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येते, ती शिवरात्र मानली जाते आणि या दिवशी शंकराची पूजा करतात. माघ महिन्यातली शिवरात्र सर्वात महत्त्वाची आणि महाशिवरात्र म्हणून साजरी होते.

बहुतांश हिंदू सण दिवसा साजरे होतात, पण महाशिवरात्र रात्री आणि दिवसाही साजरी होते.

महाशिवरात्री

फोटो स्रोत, Getty Images

महाशिवरात्रीला विशेष महत्त्व असतं. कारण ही ती रात्र आहे जेव्हा शंकरानं 'तांडव' नृत्य केलं, असं मानलं जातं.

तांडव नृत्य हे शिवाचं ब्रह्मांडीय नृत्य आहे आणि हे नृत्य जीवनाच्या शाश्वत चक्राचं प्रतीक आहे अशी मान्यता आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'महाशिवरात्री' शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणूनही ओळखला जातो.

ही रात्र अंधकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानली जाते. या रात्री शिवाची पूजा करून, भक्त अंधकारातून प्रकाशाच्या आणि अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गावर जातात. शिवाच्या दर्शनानं त्यांच्या जीवनातील दुःख आणि संकटं दूर होतात, अशी मान्यता आहे.

सण

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजास्थळी रात्रभर जागरण करतात.

भगवान शंकराच्या विधीवत पूजेदरम्यान त्या हंगामातील फळं, मुळांच्या भाज्या आणि नारळापासून बनवलेले विशेष अन्न अर्पण केले जाते.

जे महाशिवरात्रीला उपवास करतात, ते दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात. उपवास सोडताना शिवाला अर्पण केलेला प्रसाद (अन्नार्पण) खातात.

महाशिवरात्री

फोटो स्रोत, Getty Images

तर काही ठिकाणी चांगला पती मिळावा म्हणून काही मुली उपवास आणि शिवाची पूजा करतात. भगवान शंकराची स्तुती करण्यासाठी भक्तिगीतं गातात, आणि संपूर्ण रात्रभर पवित्र शास्त्रांचे पठण केले जाते.

मंदिरातील पुजारी किंवा पंडित शास्त्रानुसार पूजा (धार्मिक पूजा) करतात. हे रात्री चार वेळा केलं जातं.

मंदिरांमध्ये शिवलिंगाची पूजा केली जाते. भगवान शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाला स्नान घालण्यासाठी भाविक मंदिरांमध्ये गर्दी करतात.

त्या शिवलिंगाला दूध, पाणी आणि मधानं स्नान घातलं जातं आणि नंतर चंदन लावण्यात येतं. फुलं आणि हारांनी शिवलिंग सजवलं जातं.

महाशिवरात्री

फोटो स्रोत, Getty Images

व्याध तारा आणि लुब्धकाची आख्यायिका

महाशिवरात्री उत्सवाच्या आख्यायिकेनुसार, लुब्धक नावाचा एक गरीब आदिवासी माणूस हा शिवभक्त होता. तो एकदा सरपण गोळा करण्यासाठी घनदाट जंगलात गेला.

अंधार पडल्यामुळं तो जंगलात भरकटला. त्याला घराचा रस्ता सापडत नव्हता.

अंधारात लुब्धक एका बेलाच्या झाडावर चढला. पहाटेपर्यंत सुरक्षित राहण्यासाठी त्यानं झाडाच्या फांद्यांमध्ये आश्रय घेतला.

महाशिवरात्री

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संपूर्ण रात्रभर तो वाघ आणि जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचा आवाज ऐकत होता. तो प्रचंड घाबरला होता. त्यामुळं झाडावरुन उतरायलाही त्याला भीती वाटत होती.

स्वतःला जागं ठेवण्यासाठी त्यांनं शिवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. नामस्मरण करत असताना तो झाडाचे एक-एक पान तोडून टाकत होता.

सूर्योदयापर्यंत त्यानं हजारो पानं एका शिवलिंगावर टाकली होती. अंधारात तिथलं शिवलिंग त्यानं पाहिलं नव्हतं. लुब्धकानं रात्रभर केलेल्या उपासनेमुळं भगवान शंकर प्रसन्न झाले.

शिवाच्या कृपेनं वाघ आणि वन्य प्राणी तिथून निघून गेले. लुब्धक केवळ बचावला नाही तर त्याला 'दैवी आशीर्वाद'ही मिळाला.

या आख्यायिकेच्या दुसऱ्या एका रूपात लुब्धक हा शिकारी म्हणजे व्याध होता. दिवसभर शिकार न मिळाल्यानं त्याला उपवास घडला.

रात्र पडल्यावर त्याला हरिणांची एक जोडी दिसली. लुब्धक त्यांना मारणार, तेवढ्यात हरिणांनी घरी जाण्याची आणि आपल्या पाडसांना शेवटचं पाहण्याची विनंती केली. लुब्धकानं परवानगी दिली, हरिणं पाडसांना भेटून लुब्धकाचं पोट भरण्यासाठी परत आली.

त्यांचा प्रमाणिकपणा पाहून लुब्धकानं त्यांना जीवदान द्यायचं ठरवलं. तेव्हा मध्यरात्र झाली होती.

हरणं परत येईपर्यंतच्या काळात लुब्धक बेलाच्या एका झाडावर बसून पानं खाली टाकत राहिला होता. त्याचा उपवास, नकळत केलेली शिवाची उपासना आणि त्यानं हरणांना दिलेलं जीवदान तसंच हरिणांचा प्रामाणिकपणा यामुळे शंकर प्रसन्न झाले.

त्यांनी लुब्धकासोबतच हरिणांनाही आकाशात ताऱ्याच्या रुपात स्थान दिलं- तेच मृग नक्षत्र आणि व्याध तारा आहेत, असं मानलं जातं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)