स्टॅलिन यांच्या ‘सनातन’ वक्तव्याबद्दल धार्मिक जाणकार आणि इतिहासकारांचं काय मत आहे?

उदयनिधी स्टॅलिन तामिळनाडू सरकारमध्ये मंत्री आहेत

फोटो स्रोत, UDHAY/X

फोटो कॅप्शन, उदयनिधी स्टॅलिन तामिळनाडू सरकारमध्ये मंत्री आहेत
    • Author, दीपक मंडल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे चिरंजीव आणि तामिळनाडू राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी 'सनातन धर्मा'वर केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरूच आहे.

द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी 2 सप्टेंबरला तामिळनाडूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सनातन धर्माला अनेक 'सामाजिक दुष्कृत्यांसाठी' जबाबदार धरलं होतं. सोबत याला समाजातून हद्दपार करायला हवं असंही म्हटलं होतं.

ते म्हणाले होते, "सनातन धर्म हा जाती आणि धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पडतो. हा विचार संपवणं म्हणजे मानवता आणि समता वाढवणं."

ते असंही म्हणाले होते की, "ज्याप्रमाणे आपण डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना संपवतो तसं सनातन धर्माला केवळ विरोध करणं पुरेसं नाहीये. याला समजातून पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे."

या वक्तव्यावर आरएसएस, भाजप आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले की, "हा आमच्या धर्मावर हल्ला आहे."

दुसरीकडे, भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया एक्स (ट्विटर) वर लिहिलंय की, "उदयनिधींनी सनातन धर्माचा संबंध मलेरिया आणि डेंग्यूशी जोडलाय. त्यांचं म्हणणं आहे की याला विरोध करून चालणार नाही तर तो संपवून टाकला पाहिजे. थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की, भारतातील 80 टक्के लोकांना संपवलं पाहिजे. कारण हे लोक सनातन धर्माचे पालन करतात."

पण उदयनिधी म्हणाले की, सनातन धर्मामुळे जे पीडित आणि उपेक्षित लोक आहेत त्यांच्या बाजूने त्यांनी आवाज उठवला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्यांवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिंदुत्ववादी संघटनांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्यांवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे

ते म्हणाले, "मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आणि कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरं जाण्यास तयार आहे. द्रविड भूमीतून सनातन धर्म हटवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यापासून आम्ही तसूभरही मागे हटणार नाही."

संघाच्या नेत्यांनी सनातन धर्माची केलेली व्याख्या

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

उदयनिधींनी सनातन धर्मातील समाजकंटकांसाठी संपूर्ण धर्मालाच जबाबदार का धरलं? असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय.

त्यांना सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म असं म्हणायचं होतं का?

हिंदू धर्माप्रमाणेच सनातन धर्म देखील वर्णाश्रम म्हणजेच जातिव्यवस्था आणि पितृसत्ताक पद्धतीचं समर्थन करतो का?

हिंदू धर्म ब्राम्हण्यवादासाठी पर्यायी शब्द आहे का?

उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही नेत्यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सनातन धर्म हा तत्वज्ञानाशी निगडित

असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर ही एक भारतीय सभ्यतेच्या मूल्यांशी निगडित शाश्वत जीवनशैली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

सोबतच संघाने अनेकवेळा सनातन धर्माला हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र या संकल्पनेशी जोडले आहे.

सनातन धर्म हा अनादी काळापासून चालत आलाय असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सांगतात.

हिंदू धर्म देखील याचंच एक रूप आहे. जे लोक याचा संबंध ब्राम्हण्यवादाशी जोडत आहेत त्यांना याविषयी माहिती नाही.

इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्स्प्रेस' सोबत बोलताना संघाशी संबंधित एका नेत्याने सांगितलं की, ब्राम्हण्यवाद ही देखील एक काल्पनिक संकल्पना आहे. जे याचा संबंध ब्राम्हण्यवादाशी जोडत आहेत ते अज्ञानी आणि स्वार्थापोटी हे करत आहेत.

संघाचे नेते म्हणतात की, भारतात उदयास आलेले धर्म आणि त्यांच्या परंपरा लोकांमधील समानता आणि सहअस्तित्वाबद्दल बोलतात. तर बाहेरून आलेले धर्म भेदभाव आणि वेगळेपणाविषयी बोलतात.

देवदत्त पटनायक यांची पोस्ट

फोटो स्रोत, X

फोटो कॅप्शन, देवदत्त पटनायक यांची पोस्ट

सनातन धर्मात भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं संघाशी संबंधित नेत्यांचं म्हणणं आहे.

पण उदयनिधी स्टॅलिन यांनी आपल्या भाषणात या भेदभावाचा उल्लेख केला आहे. यासाठी ते सनातन धर्म संपवला पाहिजे असं म्हणत आहेत.

मात्र, या वादानंतर त्यांच्या भूमिकेत थोडी नरमाई आली असून मी हिंदुत्व आणि हिंदूंच्या विरोधात काहीही बोललो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. "सनातन धर्मामुळे ज्या दुष्ट प्रथा आणि विषमतेला प्रोत्साहन मिळते त्याचा मी निषेध केला आहे. या दुष्ट शक्तींनी मला त्यांच्या विरोधात बोलण्यापासून रोखलं तरीही मी सनातन धर्मावर पुन्हा पुन्हा बोलत राहीन."

सनातन धर्माविषयी तज्ञांना काय वाटतं?

सध्या तरी या वादाचं मूळ समजून घेण्यासाठी सनातन धर्म म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे ? यात विषमतेसारख्या वाईट प्रथांना जागा आहे का?

पौराणिक कथा विश्लेषक आणि लेखक देवदत्त पटनायक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून याचा अर्थ सांगितला आहे.

पटनायक म्हणतात, " 19व्या शतकात समाजात सर्व जाती आणि स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणं सुरू होतं. मात्र स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेणाऱ्या परंपरावाद्यांनी या गोष्टीला विरोध केला. हे लोक जातिव्यवस्था आणि पितृसत्ताक पद्धतीला चालना देणार्‍या प्राचीन परंपरांचं पालन करत होते."

ते पुढे सांगतात की, "सनातन धर्माचा पहिला उल्लेख श्रीमद भागवत गीतेत आढळतो. याचा अर्थ शाश्वत अशा आत्म्याचं ज्ञान. यात पुनर्जन्मासंबंधी पण विवेचन केलं आहे आणि याला शाश्वत म्हटलंय. सनातन हा शब्द जैन आणि बौद्ध धर्मातही वापरला जातो, कारण हे धर्म देखील पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. पण तेच इस्लाम, यहुदी आणि ख्रिश्चन धर्मात या शब्दाचा उल्लेख आढळत नाही कारण ते पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाहीत. सनातन हा शब्द वेदांमधून आलेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांपैकी एक असलेले केशव बळीराम हेडगेवार यांचे चरित्रकार राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांच्याशी बीबीसी हिंदीने संपर्क साधला. त्यांना, उदयनिधी स्टॅलिन यांनी जातीव्यवस्थेसह अनेक सामाजिक दुष्कृत्यांसाठी सनातन धर्माला जबाबदार धरल्याच्या मुद्द्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली.

धर्म

फोटो स्रोत, Getty Images

त्यावर उत्तर देताना खासदार राकेश सिन्हा म्हणाले, "सनातन हे पुरोगामी प्रक्रियेचं नाव आहे. समता, समरसता आणि विविधता ही सनातन धर्माची मूलभूत परिमाणं आहेत. जर या परिमाणांमध्ये विविधता नसती तर उपनिषदांमध्ये 'नेति-नेति' म्हणजेच 'हे ही नाही, ते ही नाही' सांगितलं नसतं. सनातन धर्मात समतेची प्रवृत्ती नसती, तर व्यवस्थेला विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे 'नेति-नेति'चा प्रश्नच उद्भवत नाही."

ते म्हणतात, "समाजात पंथांचा, जीवनपद्धतीचा आणि विविधतेचा निरंतर प्रवाह सुरू असतो. आणि त्याकडे कोणीच अस्वस्थपणे पाहत नाही. त्यामुळेच सनातन आणि हिंदू धर्मात फरक करणं देखील चुकीचं आहे. कारण हिंदू धर्माचा जो मूळ आत्मा आहे तो सनातन धर्मच आहे."

राकेश सिन्हा पुढे सांगतात, "गांधी आणि सनातन धर्मात कोणतेही मतभेद नव्हते. गांधी हरिजनांसाठी काम करायचे, हरिजन नावाचे मासिक प्रकाशित करायचे. आणि त्यांच्या या कार्याला हिंदू समाजातून व्यापक समर्थन मिळालं होतं."

सनातन धर्म भेदभाव करतो का?

यावर राकेश सिन्हा म्हणतात, "सनातन धर्माला मलेरिया आणि डेंग्यू म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना हे माहितीच नाही की तमिळ संस्कृती आणि भाषेचा आधार म्हणजे सनातन धर्म आहे."

ते म्हणतात की, "एका प्रस्थापित आध्यात्मिक धारणेप्रमाणे भगवान शंकराने अगस्त्य मुनींना तमिळ भाषा शिकवली होती. शिवाय तमिळ संस्कृती आणि भाषेच्या संवर्धनासह उत्तर - दक्षिण भारताच्या ऐक्यासाठी कार्य करणारे अगस्त्य मुनीच होते. उदयनिधींसारख्या लोकांना तमिळ संस्कृती आणि भाषेचा आधारच माहीत नाही. त्यामुळे ते विरोध करून भारतीयांच्या आत्म्याच्या मुळावर आघात करत आहेत."

पण इतिहासकार अशोक कुमार पांडे म्हणतात त्याप्रमाणे, अनादी काळापासून चालत आलेला तो सनातन, असा त्याचा अर्थ आहे. बौद्ध आणि जैन धर्म देखील स्वतःला सनातन म्हणवतात. वेदांमध्ये सनातन या शब्दाचा उल्लेख नाही.

ते सांगतात, "19व्या आणि 20व्या शतकात हिंदू धर्मात सुधारणावादी चळवळ सुरू झाली. त्या दरम्यान उच्चवर्णीय, विशेषत: ब्राह्मणांनी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवून घेण्यास सुरुवात केली. थोडक्यात इथे सनातनी हा हिंदूचा समानार्थी शब्द नसून हिंदू धर्मातील एक समूह आहे."

अशोक कुमार पांडे पुढे सांगतात की, "स्वतःला सनातनी हिंदू म्हणवणारे हेच लोक जातीव्यवस्थेचं समर्थन करत होते. ज्यावेळी महर्षी दयानंदांनी वेदांकडे परत चला असं म्हटलं, अंधश्रद्धा आणि काही प्रमाणात जातीभेदाचा निषेध केला, तेव्हा सनातनी लोकांनी त्यांना कडाडून विरोध केला."

ते म्हणतात, "जेव्हा महात्मा गांधींनी अस्पृश्यताविरोधी मोहीम सुरू केली, तेव्हा त्यांच्यावर पहिले हल्ले सनातनी लोकांनी केले. याच हिंदू समाजातील एक मोठा वर्ग या अमानवी प्रथेच्या विरोधात उभा राहिला होता."

धर्म

फोटो स्रोत, Getty Images

"सनातन्यांनी अनेक ठिकाणी अस्पृश्यताविरोधी चळवळीला विरोध केला आणि ही मोहीम चालवणाऱ्या लोकांवर हल्ले केले. विशेष म्हणजे महात्मा गांधींसोबत यात काम करणारे सर्व लोक हिंदू होते. ते जातिभेदाला विरोध करणारे हिंदू असल्याने सनातनी त्यांच्यावर चिडले होते."

आरएसएस आणि सनातनी

अशोक कुमार पांडे म्हणतात, "संघ ही अशाच सनातनी लोकांची संघटना आहे. या संघटनेच्या उच्च पदांवर कायम परिवर्तनविरोधी आणि सुधारणाविरोधी ब्राह्मणांनी ताबा मिळवला होता. आणि याच कारणामुळे संघाने संविधानाच्या जागी मनुस्मृती लागू करावी अशी मागणी केली होती. त्यांनी हिंदू कोड बिलाला विरोध केला आणि आरक्षण लागू केल्यामुळे डॉ.आंबेडकरांच्या विरोधात प्रचारही केला."

सनातनी विचारांवर द्रविड आणि दलितांचं काय मत आहे?

दलित विषयांचे तज्ञ आणि द्रविड चळवळीचे जाणकार चंद्रभान प्रसाद सांगतात की, उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी जे भाष्य केलंय ते अगदी 100 टक्के बरोबर आहे.

बीबीसी हिंदीशी बोलताना त्यांनी सांगितलं किझ "भगवद्गीतेमध्ये धर्माची व्याख्या जातीच्या उतरंडीच्या आधारे करण्यात आलेली आहे. यात प्रत्येक जातीविषयी सांगण्यात आलंय. यात असं सांगितलंय की, प्रत्येक जातीने आपल्या विहित धर्माचं पालन केलं पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात की, युद्ध सुरू आहे म्हणून तू लढू नकोस तर तू क्षत्रिय आहेस म्हणून तू लढ."

चंद्रभान प्रसाद पुढे सांगतात, "1909 मध्ये पहिल्यांदाच प्रकाशित झालेल्या श्रीमद भागवत गीतेच्या प्रस्तावनेत स्वामी स्वरूपानंद यांनी लिहिलंय की, लोकांनी आपल्या आपल्या धर्माचं पालन करून मोक्ष मिळवावा असं गीता सांगते आणि हेच त्याचं सार आहे. रामकृष्ण मिशन या भगवद्गीतेचा प्रचार करते. यामध्ये श्रीकृष्णाने जे सांगितले आहे त्याला आधुनिक हिंदू सनातन धर्म म्हणतात. म्हणजेच जातीच्या आधारावर विहित केलेली कार्य करूनच मोक्ष प्राप्त होतो."

चंद्रभान प्रसाद म्हणतात, "गीतेमध्ये वर्णाश्रम पद्धतीत समाविष्ट असलेल्या सर्व वर्णांबद्दल माहिती दिली आहे. आणि यात शुद्रांविषयी अपमानजनक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत."

उदयनिधी सनातनी नरसंहारावर काही बोलले का?

उदयनिधी यांच्याविरोधात आत्तापर्यंत देशभरात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

धर्म

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे त्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया एक्सवर स्पष्टीकरण देताना लिहिलंय की, मी सनातनी नरसंहारावर कधीच बोललेलो नाही. मी केवळ हेच म्हणालोय की, सनातन धर्म हा एक असा विचार आहे जो लोकांना जाती आणि धर्माच्या नावाखाली वेगळं करतो. आणि सनातन धर्म संपवणे म्हणजेच मानवतेचं समर्थन करणे आणि लोकांमध्ये समानता आणणे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.